Join us  

मनातलं बोलावं-काही सांगावं असं कुणीच नाही आयुष्यात? मग अशावेळी करायचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2024 8:00 AM

मनातलं बोला असा गजर सगळीकडे असतो पण बोलायचं कसं आणि कुणावर ठेवायचा भरवसा?

ठळक मुद्देआपले प्रॉब्ल्मस आपल्याला फार मोठे वाटतात. आपली वेदना फार मोठी वाटते. 

मनातलं बोलावं, आपलं म्हणून काही सांगावं असं कुणीच नाही आयुष्यात असं येतं तुमच्या मनात? वाटतं भडभडून बोलावं पण मग कुणी सल्ले देतं, कुणी ऐकून घेत नाही, कुणी जज करतं तर कुणी गावभर करेल अशी भीती वाटते. जीवाभावाची म्हणावी अशी माणसं खूप पण मनातलं बोलावं असं कुणी नाही असं वाटून जीव तुटतो आतल्याआत?

आणि अवतीभोवती, सोशल मीडियात लोकांचा गजर सुरु असतो. मनातलं बोला-बोलाच. असं कसं बोलणार मनातलं कुणाशीही. अगदी जवळच्या माणसालाही कसं सांगणार काय खुपतंय ते? तसं पाहता दुसऱ्यांच्या दुःखावर, दुसऱ्यांच्या प्रश्नांवर आपल्याकडे  उत्तरं तयार असतात. पण आपले प्रॉब्ल्मस आपल्याला फार मोठे वाटतात. आपली वेदना फार मोठी वाटते. 

 

(Image :g00gle)

मुळात मनातलं बोला म्हणजे काय करा, किती बोला, कोणाशी आणि कधी बोला हे तरी आपल्या कुठं चटकन लक्षात येतं? "तुला म्हणून सांगतो/सांगते" असं करत कुणाशी आपण बोललोच तर आपली कशी आख्खी "कुंडली" त्यांना माहिती आहे असंही काहीजण वागू लागतात. त्यावर भरपूर चर्चा केल्या जातात. नको ती माहिती सर्वत्र पसरवली जाते.

आपल्या मनातलं योग्य व्यक्तीपाशी, योग्य वेळी, नेमक्या शब्दांत बोलता येणं ही एक कला आहे. मनातलं चुकून काही बोललं गेलं, तर दुसरा काय विचार करेल हे मोठं दडपण असतं. अमक्याशी बोलून काय फायदा होईल, काय तोटा होईल, ह्याचे अंदाज देखील आपण बांधत असतो. आपलं आणि त्याचं पटतंय तोवर ठीक. पण काही भांडण झालं, तर तीच माहिती कोणी आपल्याविरुद्ध वापरेल,याची प्रचंड भीती मनात असते. अनेक शंका असतात. 

प्रत्येकाच्या मनात अनेक गुंतागुंतीचे, मन पोखरणारे प्रश्न असतात. ते शब्दांत मांडायला धाडस लागते आणि मनाची तयारी व्हावी लागते. हे सारं एकदम जमत नाही. आपण इतरांशी मनातलं बोलण्यासाठी आधी आपण इतरांचं ऐकून घ्यायला हवं. त्यांचं सिक्रेट जपायला हवं.मनातलं सांगताना अतीविश्वास न दाखवता काय मदत हवी ते सांगायला हवं.आणि समजलं आपलं गुपीत कुणाला तर समजलं म्हणत मनावरचं ओझंही उतरुन ठेवायला हवं.

टॅग्स :मानसिक आरोग्य