- सेजल डावरे (समुपदेशक)
आजकाल आपण अनेक मोटिव्हेशनल व्हिडीओ पाहतो, मेेसेज वाचतो. अनेकजण वजन कमी करतात, काहीतरी ट्रेक करतात, पुस्तकंच पुस्तकं वाचतात. सांगतात, मला जमलं तर तुलाही जमेल. आपणही सुरू करतो की जमेल आपल्याला; पण नव्याचे नऊ दिवस. मग परत सगळे बंद पडते. आपण स्वत:लाच दोष देतो की, आपण सुरू करतो पण आपल्याला काहीच जमत नाही. आपल्यात ती तडफडच नाही. गोल सेटिंग वगैरे आपल्याला जमतच नाही, असं म्हणतो. आपण उत्साहाने सुरू केलेली अनेक कामं पेंडिंग राहतात. कामंच कामं दिसतात; पण पूर्ण काही होत नाही. रिझल्ट्स काही मिळत नाहीत. अजून नैराश्य येतं.
आता यावर उपाय काय?
१. एकदम मोठं टार्गेट डोळ्यांसमोर ठेवलं तरी त्याचे लहान-लहान, रोज एका दिवशी काय करता येईल याचे तुकडे करा.
२. रोज तेवढंच करा. एक दिवस नाही जमलं, दुसऱ्या दिवशी करा.
३. मी करणारच, असं स्वत:ला म्हणा. नाही जमलं एखादा दिवस तर माफ करा. दुसऱ्या दिवशी करा.
४. मी अमुक करणार अशी गावभर दवंडी न पिटता एक-दोन जवळच्या माणसांना सांगा की, मला रोज विचारा अमूक केलं का? रिपोर्ट घ्या. त्यांनी तुम्ही रिपोर्ट करा.५. या सगळ्यांचा फायदा असा होतो की, माणसाला रोज जो एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट अर्थात मी केलं, मला जमलं असं वाटणारी भावना असते ती मिळते. त्यामुळे उत्साह वाढतो. हुरूप येतो. तो उत्साह आपल्या अन्य कामांतही दिसू लागतो.
६. हळूहळू एकेक पाऊल आपण पुढे सरकतो आहोत. एकेक गोष्ट जमतेय याचा आनंद मनाला उमेद देतो की जमेल. काही नाही जमलं तर अगदी मी आज माझ्या आवडीचा पदार्थ करून खाणार एवढंच म्हणा. ते करा.
७. जमायला लागली गाडी एकदा की जशी आपण सुसाट चालवू शकतो तसंच हे स्वयंप्रेरणेचंही असतं. ती जमेपर्यंत आपण तिला सोबत करायची, मग ती आपलं काम करू लागतेच.