Lokmat Sakhi >Mental Health > पुन्हा Online शाळा सुरु होणार; घरात कोंडल्या मुलांसाठी शिकणं मजा ठरेल की शिक्षा?

पुन्हा Online शाळा सुरु होणार; घरात कोंडल्या मुलांसाठी शिकणं मजा ठरेल की शिक्षा?

आता शाळा ऑनलाइनच सुरू होणार हे उघड आहे, मात्र ऑनलाइन शिक्षण देताना गेल्या वर्षी जे चुकलं ते निदान यंदा तरी दुरुस्त करता येईल? तासंतास स्क्रीनसमोर बसणं कमी होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 02:38 PM2021-06-02T14:38:47+5:302021-06-02T14:42:19+5:30

आता शाळा ऑनलाइनच सुरू होणार हे उघड आहे, मात्र ऑनलाइन शिक्षण देताना गेल्या वर्षी जे चुकलं ते निदान यंदा तरी दुरुस्त करता येईल? तासंतास स्क्रीनसमोर बसणं कमी होईल?

Online school, e -learning, remote education, Will learning be fun or punishment for children at home? | पुन्हा Online शाळा सुरु होणार; घरात कोंडल्या मुलांसाठी शिकणं मजा ठरेल की शिक्षा?

पुन्हा Online शाळा सुरु होणार; घरात कोंडल्या मुलांसाठी शिकणं मजा ठरेल की शिक्षा?

Highlightsगेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षण देताना ज्या गोष्टी लक्षात आल्या, ज्यात त्रुटी दिसल्या त्या बदलायचा या वर्षी तरी प्रयत्न व्हायला हवा.

- डॉ. श्रुती पानसे

आता यंदाही जूनमध्ये पुन्हा शाळा सुरू होतील. शाळा ऑनलाइनच असणार आहे हे आता सर्वांनाच कळून चुकलेलं आहे. मागच्या वर्षी सगळं नवं होतं; पण या वर्षी आता आपल्याला ऑनलाइनशिक्षण म्हणजे काय हे कळून चुकलेलं आहे. ते आपल्याला हवं असो किंवा नसो तेच आणि तसंच घ्यायची सक्ती ही तशी सर्वांवरच असणार आहे. मात्र या सर्व संदर्भात ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आणि शाळेच्या व्यवस्थापकांनी मुलांचं वय लक्षात घेऊन आता त्यामध्ये काही बदल करायला हवेत. पालकांनीही त्याकडं लक्ष द्यायला हवं.
त्यातले काही बदल मला इथे सुचवावेसे वाटतात. अर्थात हे मागच्या वर्षी काही शाळांनीसुद्धा राबवलेले
होते आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत.

हे बदलता येईल..?

१. महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मुलांना जास्त वेळ लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलसमोर न बसवणं आणि त्याऐवजी जे उपक्रम मुलांनी करायचे आहेत त्या उपक्रमांची एक फाईल बनवणं आणि ती फाईल पालकांपर्यंत पोहोचवणं. शाळांनी हे केलं तर मुलं फार कमी वेळेला ऑनलाइन येतील आणि बाकी उपक्रम पालकांना आणि मुलांना जमतील तसे त्यांनी करावेत आणि ते केल्यानंतर ते शाळांपर्यंत पोहोचवावेत. यामुळे शाळांमध्ये पालकांचीसुद्धा गर्दी होणार नाही आणि मुलांकडून शाळांना जसे अपेक्षित आहेत तसे उपक्रम करून घेतले जातील.
२. प्रत्यक्ष फाईल न देता ज्या पालकांना शक्य आहे त्या सर्व पालकांच्या ईमेलवर जर अशी फाईल पाठवली आणि उपक्रम मुलांनी करून घ्यावेत असं सांगितलं तरीसुद्धा चालू शकतं. या पद्धतीने शाळांना जे हवे आहेत ते सर्व उपक्रम मुलांकडून करून घेतले जातील.
३. मागच्याच वर्षी हे लक्षात आलेलं होतं की लहान मुलं जास्त वेळ ऑनलाइन बसत नाहीत. स्क्रीन ऑफ कसा करायचा हे मुलांना माहिती आहे आणि तसंच करून मुलं तिथून निघून जातात.
वरच्या वर्गातल्या ज्या मुलांना सर्व तास ऐकावे लागतात ती मुलं एका जागेवर तासंतास बसून कंटाळतात आणि त्यांचं अभ्यासातून लक्ष उडतं. हे मागच्या वर्षीच्या अनुभवातून आपण शिकलेलो आहोतच. ते यंदा टाळायला हवे.
४. त्यासाठी अजून एक गोष्ट इथे शिक्षकांना सुचवावीशी वाटते ती म्हणजे ज्याप्रमाणे आपण वर्गामध्ये प्रत्यक्ष समोरासमोर बसलेलो असताना शिकवत होतो त्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. आठवड्यातून एकदा मुलांशी गप्पा मारायला येणं आणि उर्वरित पाच-सहा दिवसांत मुलांनी काय करायचं आहे हे मुलांना सांगणं हासुद्धा एक पर्याय असू शकतो.
५. वयाने लहान मुलांसाठी तर त्यांना पूर्णवेळ ऑनलाइन बसवणं हे खूपच चुकीचं आहे. त्यामुळे शिक्षिकेनं स्वतःजवळ उपक्रम ठेवावेत आणि जरी मुले ऑनलाइन असतील तरीसुद्धा मुलं जास्त वेळ स्क्रीनसमोर असणार नाहीत अशा पद्धतीने त्यांचे उपक्रम घ्यावेत. उदाहरणार्थ घरातून एखादी वस्तू घेऊन ये, कागदाची घडी करून दाखव, आज ही गणितं सोडव, असे काही उपक्रम हे मुलांनी आपले आपले करून शिक्षकांना फक्त दाखवायचे अशाही पद्धतीने शिकवावे लागेल.
६. मुलांच्या हातात आपण मोबाइल देतो. सतत मोबाइल बघून त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहे. या सुट्टीमध्ये असं दिसून आलं आहे की मुलांना मोबाइलवर अभ्यास करायचा नसतो किंवा शिक्षकांनी जे सांगितलं ते ऐकायचं नसतं; पण मुलं या सुट्टीमध्ये मोबाइलवर गेम मात्र खेळू लागलेली आहेत आणि त्यांना मोबाइलची सवय होऊ लागलेली आहे. किंबहुना झाली आहे असं म्हटलं तरी चालेल. यासाठी पालकांपेक्षा शिक्षकांनीच यामध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम असे शोधून काढायचे आहेत की ज्यामुळे मूल स्क्रीनसमोर कमीतकमी वेळात येईल.
७. एकूणच मागच्या वर्षामध्ये जी एक वेगळ्याच प्रकारची दिशा शिक्षणाने घेतली त्यामुळे ज्या मुलांना मोबाइल किंवा लॅपटॉप काहीच परवडत नाही अशी मुलं किंवा ज्या मुलांना पालकांच्या रोजंदारीमुळे शाळा सोडावी लागली, अशा शालाबाह्य मुलांना पुन्हा शाळेत आणावं लागेल.
८. या सर्व प्रकरणात मुलं अनेक तास बसून राहतात हे लक्षात आल्यामुळे त्यांच्या हालचाली कशा होतील हे पाहायला हवं. मुलांच्या हालचाली होण्यासाठी काही व्यायाम, काही खेळ, त्यांना आवडेल अशा पद्धतीने नाच अशा काही गोष्टी पालकांनी अवश्य करून घ्याव्यात. यामुळे मुलांची हालचाल होईल. त्यांच्या मेंदूला ऑक्सिजन मिळेल. मुलांची चिडचिड थोडी कमी होईल. या पद्धतीने मुलांची काळजी घ्यावी लागेल.
९. शिक्षकांनी आणि पालकांनी या काळात पाठ्यपुस्तकावर भर देण्याबरोबरच अवांतर वाचन, इतर छंद जोपासणे यावर जास्त भर दिला तर ऑनलाइन शिक्षणाचा कंटाळा काही प्रमाणात तरी कमी होईल. कारण अशा पद्धतीने शिक्षण घेणं हे वयाच्या पाचवी-सहावीपर्यंत तरी कंटाळवाणंच आहे. त्या पुढच्या वयातली मुलं कदाचित या नव्या साधनांशी जुळवून तरी घेतील. पण त्याआधीचा वयोगट मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी योग्य नाही, असंच पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं.
१०. गेल्या वर्षी ऑनलाइन शिक्षण देताना ज्या गोष्टी लक्षात आल्या, ज्यात त्रुटी दिसल्या त्या बदलायचा या वर्षी तरी प्रयत्न व्हायला हवा.

(लेखिका मेंदू अभ्यास तज्ज्ञ आणि समुपदेशक आहेत.)
drshrutipanse@gmail.com

Web Title: Online school, e -learning, remote education, Will learning be fun or punishment for children at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.