Join us  

फक्त ५ गोष्टी, घरातला-जगण्यातला आणि मनातलाही पसारा चटकन कमी करून टाकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 2:56 PM

प्रभात पुष्प : शिस्त लावली जगण्याला तर किती सोप्या होतील गोष्टी, पण हा जगण्यातला पसारा कसा आवरायचा?

ठळक मुद्देमला माहीत आहे सांगणं सोपं आहे. पण करून बघूया.

अश्विनी बर्वे

तुम्ही लहानपणी एकाच अक्षरावरून बोलण्याचा खेळ खेळला आहे का? म्हणजे जसं की “च” अक्षर घेतलं की फक्त त्यावरून सुरू होणारे शब्द जास्तीत जास्त वापरायचे. असं आव्हान आम्ही लहानपणी एकमेकांना द्यायचो. पण, त्यामुळे आम्ही शब्दांची खूप मजा अनुभवली. खूप हसलो. कारण खाण्यासाठी काही पदार्थ हवा असेल तर कोणता पदार्थ मागायचा? मग चवळी, चमचम, चिकुल्या असं काहीही म्हणायचो. तो पदार्थ तर घरात नसायचा. पण, असं म्हणून आम्ही आम्हांला हवा तो पदार्थ पानात वाढून घ्यायचो आणि वेड लागल्यासारखं हसायचो. कारण म्हणायचं चवळी आणि घ्यायचा वरण-भात. फार मजा यायची. आमच्या हास्याच्या धबधब्याने घरातली मोठी मंडळीही हसू लागायची. पण, मग आम्हाला शिस्तीत ठेवण्यासाठी काही नियम घालायची.तर तुम्हाला माहिती आहे का ते नियम? ती शिस्त होती जपानची पंचसूत्रे. “स/एस”पासून सुरू व्हायची. ती पंचसूत्रे अशी होती –सेरी, सेटन, सेसो, सीकेत्सू आणि शित्सुकी. स पासून सुरू होणाऱ्या शब्दांची आम्हाला खूप मजा वाटायची.

(Image : Google)

आता ते नियम आठवले की वाटतं हसत हसत किती छान गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्या.

१. पहिला शब्द होता “सेरी”चा अर्थ आहे वर्गीकरण करणे. कोणती गोष्ट गरजेची, महत्त्वाची ते ठरवणे. त्यानुसार त्याचे वर्गीकरण करणे. आवश्यक असलेल्या गोष्टी सहज मिळतील अशा ठेवणे, अनावश्यक असलेली गोष्टसुद्धा अशा जागी ठेवणे की हवी तेव्हा ती आपल्याला मिळायला हवी. डोळे बंद केले तरी वस्तू जागेवर सापडायला हवी. म्हणजे अंधारातसुद्धा आपल्याला वस्तू सापडायला हवी.२. दुसरे सूत्र म्हणजे कोणती गोष्ट कोठे ठेवली आहे, ती गोष्ट हवी असेल तेव्हा ती वस्तू आपल्या हाताशी असणे. अनेक गोष्टी जागच्या जागी लावून ठेवतात. त्याला म्हणतात सेटन.

३. ‘सेसो’. नेटकेपणासाठी हा शब्द वापरला जातो. स्वच्छता, नेमकेपणा, मोजक्या, गरजेपुरत्या आवश्यक त्याच वस्तू आपल्याजवळ ठेवणे. यामुळे फाफट पसारा होत नाही. नेमक्याच वस्तू असल्याने त्या निगुतीने वापरल्या जातात. त्यांचा वापर नीट होतो आणि स्वच्छता ठेवता येते. अहो आपल्या मनातसुद्धा असा पसारा झाला की किती अस्वस्थ वाटतं, याचा अनुभव आपण घेत असतोच. तो कमी केला की आपणच आपला ‘अवकाश’ विस्तारत आहोत, याची जाणीव होत राहते.

(Image : Google)

४. सीकेत्सू म्हणजे आपल्याला कोणती कामं करायची आहेत, त्यांची यादी करायची. वस्तूंची यादी तयार करायची. कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी त्याची यादी तयार करून सापडेल अशा ठिकाणी लावून ठेवायची. तुम्हाला अनुभव असेल की नाही, माहीत नाही. पण, आपण सामान ठेवता येईल म्हणून कप्पांचे बेड तयार करून घेतो आणि नक्की कोणत्या बेडच्या खणात काय ठेवलं आहे हेच विसरून जातो. मग एखादी वस्तू शोधण्यासाठी दोन्ही तिन्ही बेडचे खण उघडून बघावे लागते. पण, तीच जर त्याठिकाणी यादी करून ठेवली तर? मला माहीत आहे सांगणं सोपं आहे. पण करून बघूया.५. आधी सांगितलेले सगळे चारही गुण अंगी बाळगण्यासाठी एक स्वयंशिस्त लागते. तिलाच म्हणतात “शित्सुकी”. आतूनच ती यावी लागते. आणि कित्येक वेळा तीच आपली ओळखसुद्धा होते. माझी आजी म्हणायची या पाच गोष्टी तू अंगी बाणल्या तर कोणीही तुला काहीही म्हणणार नाही. तुझ्या चुका काढणार नाही. तुमचा याबाबतीत काय अनुभव आहे?

 

टॅग्स :मानसिक आरोग्य