मेघना ढोके
ये इश्क नहीं आसां, बस इतना समझ लिजिए, इक आग का दरिया है और डूब के जाना है! - जिगर मुरादाबादी यांचा हा शेर म्हटलं तर जुनाच, पण शेजारी पाकिस्तानातली ताजी घटना सांगते, की जे इश्क फक्त आग का दरियाच नाही तर ‘गुनाह’ आहे. प्रेम करण्याची शिक्षा म्हणून विद्यापीठ हाकलून देतं, आईबाप मुलीला घरात डांबून ठेवतात, मुलीचे भाऊ मुलाला ‘कतल’ करण्याच्या धमक्या देतात आणि त्याचा आणि आपलाही जीव वाचावा म्हणून मुलाचे आईवडील त्याला घेऊन अज्ञात जागी रवाना हाेतात. इथवरचा हा घटनाक्रम! फार अपरिचित नाही, पण तो आहे शेजारी पाकिस्तानातल्या लाहोरचा! लाहोर हे शहर तसं रसिक. जिस लाहोर नहीं वेख्या वो जम्याही नहीं, अर्थात ज्यानं लाहोर नाही पाहिलं तो जन्मालाच आला नाही, त्यानं दुनियाच पाहिली नाही अशी या सुंदर, जिंदादिल शहराची महती. याच शहरात लाल शाहबाज कलंदरच्या सेहवान शरीफ दरबारमधली कव्वालीची दंगल हा जगण्याचा विलक्षण अनुभव. त्यावरही अलीकडेच दहशतवाद्यांनी धर्माच्या नावाखाली बाँब टाकले.
तीच ती दहशत जी म्हणते प्रेम नको, दुश्मनी पोसा. तर त्याचंच हे लाहोर शहरातलं ताजं उदाहरण.
लाहोर विद्यापीठात शिकणारी हदिका जावेद. तिनं हातात लालचुटूक गुलाबाचा छानसा गुच्छ घेतला आणि गुडघ्यावर बसून तिला आवडणाऱ्या शहरयार अहमदला थेट प्रपोज केलं. अतिशय रोमँटिक असं दृश्य. शहरयारही लाजला, ती ही. मग त्यानं तिला एक छानशी प्रेमळ मिठी मारली. अवतीभोवती उभ्या त्यांच्या दोस्तांनी टाळ्या वाजवल्या, तो रोमँटिक क्षण डोळ्यातच नाही तर आपल्या मोबाइलमध्येही कैद केला. तिथंच गडबड झाली, तो व्हिडिओ पाकिस्तानात तुफान व्हायरल झाला, भारतातही झाला. अनेकांनी त्या दोघांच्या प्रेमाचं स्वागत केलं, असे गुलाबी क्षण आताच्या कोरड्या जगण्यात हरवत चालले आहेत, हे मोहब्बतके दिवाने वाढले पाहिजेत म्हणून समाजमाध्यमात पोस्ट्सही लिहिल्या. पण प्रेमाची कदर करणाऱ्यांची संख्या कमी, त्याला विरोध करणारेच जास्त. बऱ्याच जणांना या मुलांचं ‘प्रेमप्रदर्शन’ हा संस्कृती भंग वाटला. सार्वजनिक ठिकाणी असं वागणं भयंकर पाप वाटलं. खानदान की इज्जत पासून ते विद्यापीठाच्या आणि देशाच्या इज्जतीच्या लक्तरांपर्यंत चर्चा उसळल्या. शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी होऊ लागली. दोन्हीकडचे पालक आणि नातेवाईकही सटपटले. बाकीच्या मुलांचे पालक म्हणाले की, या असल्या मुलांना पाहून आमची मुलं ‘खराब’ होतील, यांना शिक्षा करा. मग टाकोटाक लाहोर विद्यापीठानं एक शिस्तभंग कारवाई समिती स्थापन केली. या मुलांना समितीसमोर हजर रहायला सांगितलं. मात्र त्या दोघांना त्यांच्या कुटुंबानं कुठं डांबलं हे कुणाला माहीत नसल्याने ते आलेच नाहीत साक्षीला. तर या शिस्तभंग कारवाई समितीने त्यांना विद्यापीठातूनच काढून टाकलं ! म्हणाले शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही. तसं पत्रकही त्यांनी काढलं, रीतसर.
त्यावर पाकिस्तानातले तरुण चिडले. पण राजकारणी चूप. कुणी काही बोललं नाही. अपवाद दोघींचा. एक बख्तावर भुत्तो झरदारी, त्यांनी ‘रिडिक्युलस’ म्हणत या कारवाईवर जाहीर टीका केली आणि दुसऱ्या शनायरा अक्रम.
Apply all the rules you want but you can’t expel love! It’s in our hearts, it’s the best part about being young and it what makes life worth living! You learn more about love than you can ever learn at an institution ❤️
— Shaniera Akram (@iamShaniera) March 13, 2021
क्रिकेटपटू वसिम अक्रमची पत्नी. त्या म्हणतात, ‘तुम्ही वाट्टेल ते करा, वाट्टेल ते नियम लावा, तुम्ही प्रेम हद्दपार नाही करू शकत. तरुण असणं, आयुष्य सुंदर आहे असं वाटणं याचा भाग आहे प्रेम करणं. मात्र शिक्षण संस्थाही तुम्हाला हे नाही शिकवू शकत!’
We just celebrated International women’s day and here we are with a top University expelling a young woman for having the confidence and empowerment to ask a man to marry her amongst the security of her peers. What kind of example are we setting here ? #CantExpelLove
— Shaniera Akram (@iamShaniera) March 13, 2021
असे निषेधाचे काही मोजके सूर, काही समाज माध्यमातले तरुण आवाज सोडले, तर पाकिस्तानात अनेकांना वाटतंय की, विद्यापीठात प्रेमाची जाहीर कबुली ही त्यांची चूकच झाली. मात्र यासीर अलीसारखे तिथले तरुण जाहीर सांगतात की, पाकिस्तान हा इंटरनेटवर पोर्न सर्च करणाऱ्या देशात आघाडीवर आहे. प्रेमाचं मात्र इथं वावडं असावं, हे विचित्रच!
-पण ते प्रेमाचं वावडं फक्त पाकिस्तानातच आहे का? हे सारं आपल्याकडच्या विद्यापीठात झालं? असतं तर हेच नसतं का झालं? प्रेमाचं वावडं आपल्याही समाजाला आहेच. प्रेमीयुगुलांच्या मागे शिस्तप्रिय पोलिसांची भरारी पथकं आपल्याकडेही आहेतच की !तसं नसतं तर सैराट ऑनर किलिंग कशाला घडलं असतं आपल्याही देशात ? जाहीर द्वेष करणं, विखार ओतणं समाजमान्य; प्रेम करणं मात्र गुन्हाच !