Join us  

आई झाल्यावर आनंद होण्याऐवजी अनेकींना डिप्रेशन येतं, हा आजार नेमका काय आहे? कोण म्हणतं सुख बोचतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 2:59 PM

पोस्ट पार्टम डिप्रेशनचा त्रास अनेक महिलांना होतो, बाळंतपणानंतर तुला कसलं सुख बोचतंय असं म्हणून त्यांच्यावर टीकाही होते, पण हा आजार लपवण्यासारखा नाही..

ठळक मुद्दे"आईपणा" भोवती खूप साऱ्या मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाय काढणं अतिशय महत्वाचे आहे.

डॉ. निलेश मोहिते

बाळ झालं एवढं छान, किती आनंदाची गोष्ट. पण ती मात्र फार उदास झाली, रडत बसते. आहे. काय झालंय तिला कळत नाही. तिनं खरंतर किती खुश व्हायला पाहिजे. आणि यावेळी तर आम्हाला मुलगा झालाय सगळे खूप खुश आहेत. आता मुलाची व्यवस्थित काळजी घ्यायची सोडून ही एका ठिकाणी बसून राहते. मधेच रडते किंवा नुसतीच बसून राहते. बाळा कडेही लक्ष देत नाही. जेवण करत नाही व्यवस्थित. तीने स्वतःसाठी नाही तर कमीतकमी बाळासाठी स्वतःची काळजी घ्यायला हवी. दोन मुलींच्या पाठीवर मुलगा झालाय.....- सुनीताचा नवरा मला चिंतेने हे सगळं सांगत होता. सुनीता मध्यप्रदेश मधल्या एका खेड्यात राहते. संपूर्ण माहिती घेतल्यावर आम्ही तीला काही औषध सुरु केले आणि समुपदेशन केले. हे समुपदेशन फक्त रुग्णापर्यंत मर्यादित न ठेवता आम्ही तिच्या कुटुंबालासुद्धा त्यामध्ये सामावून घेतले. आता तुम्ही विचाराल की तिला नक्की झालंय काय?सुनीताला झालेल्या आजाराचे नाव आहे " पोस्ट पार्टम डिप्रेशन" म्हणजेच प्रसूती नंतर येणारी मानसिक उदासीनता. हा आजार बाळंतपण झालेल्या १५ टक्के महिलामध्ये दिसून येतो. काही महिलामध्ये या आजाराची लक्षणे अतिशत तीव्र असू शकतात. त्यातून आत्महत्या किंवा बाळाला इजा होण्याचा धोका सुद्धा असतो.हा आजार होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रसूतीच्या नऊ महिन्यामध्ये होणारे हार्मोनल आणि मेंदूतील रासायनिक बदल. मुख्यत: से्रोटोनीन नावाच्या रसायनाचे कमी प्रमाण. अजून एक महत्वाचे कारण असते नवीन जबाबदारीचे ओझे.बाळाला सुरवातीच्या दिवसांमध्ये जास्त सांभाळावं लागतं. रात्री अपरात्री रडणं, स्तनपान आणी बाळंतपणामुळे आलेला अशक्तपणा यामुळे मानसिक तणाव अजून वाढतो. बऱ्याचवेळा मुलगाच व्हावा ह्या गोष्टीच सामाजिक आणि कौटुंबिक दडपण. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.

या आजारात मुख्यता खालील पैकी लक्षण आढळून येतात.1) उदास वाटणे2) रडायला येणे3) खूप चिडचिड होणे4) भूक कमी होणे5) झोप न येणे6) आत्महत्येचे विचार किंवा प्रयत्न7) बाळाकडे दुर्लक्ष करणे.        प्रसूतीनंतर पहिल्या २-३  महिन्यापर्यंत ही लक्षणं दिसू शकतात. वेळीच मनोविकारतज्ज्ञ आणि मनसोपाचारतज्ज्ञ यांचा सल्ला उपयोगाचा होऊ शकतो. काही महिलांमध्ये सायकोसिस म्हणजे वेडसर पणाची लक्षणे सुद्धा दिसू शकतात. यामध्ये राग येणे, भास होणे, वागण्या बोलण्यामध्ये विचित्रपणा, बाळाला किंवा स्वतःला इजा पोहचवणे अशी लक्षण दिसू शकतात. वेळीच उपचार पुढचा धोका टाळता येऊ शकतात.

बाळंत होणाऱ्या सगळ्याच स्रियानां जरी वर सांगितल्याप्रमाणे गंभीर स्वरूपाचे आजार होतं नसले तरी सौम्य लक्षण असलेली मानसिक स्तिती " पोस्ट पार्टम ब्लू" ही ८५ टक्के महिलांमध्ये आढळून येते. यामध्ये काही काळासाठी चिडचिड होणे, उदास वाटणे, भूक आणी झोप कमी होऊ शकते. ही मानसिक अवस्था काही दिवसात आपोआप बरी होते. घरच्यांचा मानसिक आधार ह्यातून बाहेर येण्यासाठी पुरेसा ठरतो. नुकताच "जागतिक मदर्स डे " होऊन गेला. खूप लोकांनी आपल्या आईचे बरेच गुणगाणं केलं(जे करायलाच पाहिजे). पण हे गुणगान करतानां आईपणाच्या मानसिक समस्या जाणून घेणसुद्धा खूप गरजेचे आहे. स्त्रीच्या मानसिक आरोग्याचा विचार करतांना तीच्या "आईपणा" भोवती खूप साऱ्या मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्या समजून घेऊन त्यावर उपाय काढणं अतिशय महत्वाचे आहे. "आईपणाच्या मानसिक समस्या" एका लेखात समजावून सांगणे खूपच कठीण आहे म्हणून पुढचे चार लेख आपण ह्याच विषयावर सविस्तर चर्चा करूयात..

(लेखक सामाजिक मनोविकार तज्ज्ञ असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या दुर्गम भागात मानसिक आरोग्य याचविषयात काम करतात.)nmohite9@gmail.Com

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला