Lokmat Sakhi >Mental Health > घरोघरी ‘प्रेशर’ कुकर! मुलं आणि पालक यांच्यात टोकाचा ‘ताण’ कशामुळे वाढतो आहे?

घरोघरी ‘प्रेशर’ कुकर! मुलं आणि पालक यांच्यात टोकाचा ‘ताण’ कशामुळे वाढतो आहे?

घरोघरचे वाद, पालक आणि मुलांमध्ये तयार होणारा ताण, परस्परांशी बोलणंच होत नाही ; या साऱ्यात नेमकं काय चुकतं आहे? काय केलं तर, हा गुंता सुटेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 03:34 PM2021-08-17T15:34:49+5:302021-08-17T15:43:17+5:30

घरोघरचे वाद, पालक आणि मुलांमध्ये तयार होणारा ताण, परस्परांशी बोलणंच होत नाही ; या साऱ्यात नेमकं काय चुकतं आहे? काय केलं तर, हा गुंता सुटेल?

pressure and stress; What is causing the extreme tension between children and parents? | घरोघरी ‘प्रेशर’ कुकर! मुलं आणि पालक यांच्यात टोकाचा ‘ताण’ कशामुळे वाढतो आहे?

घरोघरी ‘प्रेशर’ कुकर! मुलं आणि पालक यांच्यात टोकाचा ‘ताण’ कशामुळे वाढतो आहे?

Highlightsज्या गोष्टी शांतपणे एकमेकांशी बोलता येऊ शकतील, त्या गोष्टींचा सुध्दा अनावश्यक ताण निर्माण होतो.

भक्ती चपळगांवकर

माणसासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे घर अशी एक समजूत आहे. पण कौटुंबिक हिंसा आणि ताणतणाव याच घराला असुरक्षित बनवतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक आणि नवी मुंबई इथे झालेल्या कौटुंबिक हिंसेच्या गंभीर घटनांमुळे या तणावांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करावी वाटते की, प्रत्येक घटना ही वेगळी असते, त्याची कारणे वेगळी असतात. त्यात घरगुती हिंसेतून झालेल्या हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यामागे अनेक खोलवर रुजलेली कारणं असतात. आत्महत्या आणि हत्या यासारख्या घटना एकाच ठराविक कारणामुळे झालेल्या असतात असे नाही. उदाहरणार्थ आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने अमुक तमुक विद्यार्थ्याने आत्महत्या केली असे विधान आपण जेव्हा करतो तेव्हा फक्त तगादा हेच कारण आहे, की इतरही कारणांमुळे संबंध बिघडलेले आहेत का? आत्महत्या करणाराची मनस्थिती कशी होती? वेगळ्या कारणांमुळे तो तणावात होता का?, आईशी झालेल्या भांडणांमुळे त्या विद्यार्थ्याच्या मनात जमा झालेल्या स्फोटकांवर ठिणगी पडली का? याचा शोध घेणे गरजेचे असते. गुन्हेगाराच्या मानसिक स्थिती बरोबरच त्याचे व्यक्तिमत्त्व, सामाजिक स्थिती वगैरे गोष्टींचाही विचार होतो. त्यामुळे कोणत्याही गुन्ह्याचे सरसकटीकरण करण्याचा हा प्रयत्न नाही. परंतु या आणि अशा काही घटनांमुळे पालक आणि पाल्यांच्या मध्ये ताणल्या गेलेल्या संबंधांकडे लक्ष वेधल्या गेले आहे.
या तणावांचे पर्यावसान हिंसेतच होईल असे नाही, कित्येकदा या ताणांचा दूरगामी परिणाम होऊन आयुष्यभर त्याचे पडसाद कुठेतरी उमटतात. काही वेळा पालकांनी मनासारखे करिअर करु दिले नाही, याची खंत मुलांना वाटते. काहीजण तर, आयुष्याची दिशा गमावतात तर, काही काही वेळा पालक आणि पाल्य आक्रमकपणे एकमेकांचा सामना करतात. ज्या गोष्टी शांतपणे एकमेकांशी बोलता येऊ शकतील, त्या गोष्टींचा सुध्दा अनावश्यक ताण निर्माण होतो.

या ताणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर, लक्षात येत आहे की, पालक आणि पाल्य यांच्या नात्यात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर होत आहे. कुटुंब लहान झाले, मूल बहुदा एक किंवा दोन आहेत. या परिस्थितीत मुलांनी चांगले करिअर केले पाहिजे आणि त्यासाठी विशिष्ट शिक्षण घेतले पाहिजे असा पालकांचा आग्रह बऱ्यापैकी वाढला आहे. शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले पाहिजे, दहावीला नव्वद पेक्षा जास्त टक्के गुण मिळाले पाहिजेत, त्यानंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेतला पाहिजे आणि त्यानंतर उत्तम करिअर (भरपूर पगार) मिळवून देणारे शिक्षण घेतले पाहिजे अशी अपेक्षा पालकांची असते. ती बऱ्याचदा फार ठळक नसते. पण आजूबाजूच्या पालकांनी यशस्वी पालक बनताना बहुतेक अशाच पद्धतीचा मार्ग स्वीकारला असतो. आपण चांगले पालक बनायचे असेल तर, आपणही या गोष्टी मुलांनी कराव्यात म्हणून प्रयत्न केला पाहिजे असे बहुदा त्यांना वाटत असावे.
कित्येकदा याच फॉर्म्युल्याचा वापर करुन पालकांनी उत्तम करिअर घडवलेले असते पण, आपली मुले वेगळी असू शकतात याची जाणीव पालकांना होणे आवश्यक आहे, आणि याच बरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेत मिळणारे शिक्षण म्हणजेच सर्वकाही नाही याची जाणीव होऊन पालकांनी मुलांना जीवनाच्या वेगवेगळ्या बाजू लक्षात आणून दिल्या पाहिजेत. शाळा शिकावी लागतेच पण, जेवायचे असेल तर स्वयंपाक यावा लागतो, वस्तू हवी असेल तर, कमवावे लागते, कुटुंब हवे असेल तर, कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घ्यावी लागते, घर स्वच्छ हवे असेल तर, घराची स्वच्छता करावी लागते. या आणि अशा छोट्या गोष्टींची जाणीव झाली तरी आपल्या पालकांना आपल्या मुलांना चांगला माणूस बनवता येईल.
मुलांची परिस्थिती अजूनच गोंधळलेली आहे. मुख्यतः मध्यमवर्गीय घरांमधील मुलांना आपल्या उण्यापुऱ्या आयुष्यात ठरावीक साच्यात राहावे लागते. रोज लागणाऱ्या वस्तू त्यांना सहज उपलब्ध होतात. त्यासाठी पालकांना कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव नसतेच असे नाही पण, कित्येकदा या गोष्टी घरी बोलल्या जातातच असे नाही. घराच्या, कुटुंबाच्या केंद्रस्थानी ही मुले आहेत. आईवडिलांना चार दिवस कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर, त्याची योजना मुलांच्या परीक्षा, मुलांचे क्लासेस, मुलांचे छंद वर्ग यांचे वेळापत्रक बघून करावे लागते. त्यामुळे स्वाभाविकपणे मुलांना फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातूनच विचार करण्याची सवय लागते. आपली संपत्ती ही सगळ्या घराची संपत्ती आहे असा विचार पालकांचा असतो. त्यामुळे गाडी, घर, महागड्या वस्तू या सगळ्यांचा उल्लेख आपली वस्तू असाच होतो. अनेक वेळा असा उल्लेख सकारात्मक असतो, हे घर माझे आहे, हे कुटुंब माझे आहे, अशी समजूत वाढीला लागून कौटुंबिक संबंध बळकट होतात पण, काही वेळा मला सगळंच मिळाले आहे मग, अजून काही मिळवण्यासाठी मी मरमर का करु असा समज मुलांचा होऊ शकतो. त्यामुळे घरातले आहे हे सगळ्यांचे आहे, पण, तरीही तुमच्या भविष्यात या गोष्टी तुम्हाला उपलब्ध असतीलच असे नाही याची जाणीव त्यांना होणे आवश्यक आहे.
एकूण पालक आणि मुलं या दोघांनीही शांत व्हायची गरज आहे. शांत व्हा आणि एकमेकांना जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कदाचित या शांततेत तुम्हाला थोडं तुमचं पटेल, थोडं इतरांचं पटेल, पटलं नाही तरी स्वतःचा निर्णय तुम्ही घेऊ शकता, फक्त थोडा ताण नक्कीच कमी होईल.

मानसोपचार तज्ज्ञ चिंतन नाईक म्हणतात..


‘दिशाहीन स्पर्धा तुम्हाला धोक्यात आणू शकते. भारतात कौटुंबिक संस्था खूप बळकट आहे. अनेकदा आईवडील म्हणतात, मुलाला काय वाटतंय हे आम्हाला कळत नाही, त्याच्याशी कसे बोलावे हे कळत नाही. मुलेही असेच म्हणतात. पण, संवाद म्हणजे एकमेकांचे सगळे बोलणे पटले पाहिजे असे नाही. काहीही न बोलता एकमेकांच्या सहवासात राहता आले पाहिजे. हिंसा आणि संताप या गोष्टींचा सामना करताना शांततामय सहवास महत्त्वाचा ठरतो. सध्याच्या ताणतणावाच्या काळात प्रत्येकाने विचारपूर्वक निर्णय घेतले पाहिजेत. तुम्हाला उपलब्ध असलेल्या पर्यांयांना दोष देण्यापेक्षा तुम्हाला काय करायचे आहे, याचा खोलवर विचार केला पाहिजे. बदलत्या परिस्थितीनुसार मी बदलीन हा मनाशी विचार पक्का हवा.’

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com

Web Title: pressure and stress; What is causing the extreme tension between children and parents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.