Join us  

आता पाऊस आला, म्हणजे...सगळं पुन्हा आधीसारखं होईल.. का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 2:25 PM

आता पुन्हा आशा वाटतेय. मन पुन्हा उत्सुक झालं आहे.सगळं पुन्हा आधीसारखं होईल. होणारच. नव्हे, व्हावंच!

ठळक मुद्देएखादं दुस्वप्न सकाळी उठल्यावर मनाच्या पटलावरून पुसून जावं तसा हा काळ पुसला जाईल. आता पाऊस आला आहे.

-डॉ. माधवी भट

यावेळी उन्हाळा म्हणावा तसा तापला नाही. घशाला शोष पडावा अशी तहान लागली नाही. इतकंच काय पण उनही लागलं नाही. नाही म्हणायला नवतपा सुरु झाल्यावर आठवडाभर उमस वाढली होती. पण लगेच आभाळात सावळे ढग जमू लागले आणि अचानक वातावरण बदलून गेलं. भिजल्या मातीचा गंध दुरून येऊ लागला आणि पोटात फुलपाखरं फिरावी तशी भिरभिर झाली. जुन्या सेकंड हॅण्ड पुस्तकांचा अर्ध्या किमतीत घेतलेला सेट, त्यांना वर्तमान पत्र किंवा जुन्या कॅलेंडरच्या पानांची कव्हरं घालण्याची लगबग, मागच्याच वर्षीचं दप्तर धुऊन, डागडुजी करून तयार करायची घाई आणि रांगेत उभं राहून मिळवलेल्या वह्यांचा सेट, त्यांना येणारा डिंकाचा, बांधणीचा कोरा करकरीत वास आठवून वाटलं आता पुन्हा शाळेत जायला हवं. पुन्हा लाल रिबीनीची फुलं कानापाशी बांधावी आणि ऐटीत पहिल्या बाकावर बसावं.स्वत:चं बालपण आठवलं की त्याक्षणी आपल्यातलं मूलपणही जागं होतं. समोरच्या बाकावर बसलेल्यामैत्रिणींच्या ओढण्या एकमेकींना बांधून ठेवणं, कानाशी बांधलेली रिबीन सोडणं आणि पळून जाणं, मनलावून आकृती काढणारीला धक्का मारून चुकून लागला असं सांगून नंतर हसत सुटणं..या सगळ्या गमती पुन्हा काराव्याशा वाटतात .

पाऊस सुरु झाला की सगळ्या सुंदर स्मृती मनाच्या पृष्ठभागावर इतक्या अलगद येतात जसा दुपारच्या शांततेत विहिरीतला कासव वर येतो. छान छान वाटू लागतं. गेल्या दीड वर्षांपासून हे निखळपणे छान वाटणं कुठेतरी हरवलं होतं. मनावर एखाद्या चांगल्या घटनेनंतरही भयाचं अस्फुट सावट उरावं तसं वाटत होतं. पण आता पुन्हा आशा वाटतेय. मन पुन्हा उत्सुक झालं आहे.आता फक्त भूमिका बदलली इतकंच .पाऊस यायला लागलाय. आता दप्तरांची,वह्या पुस्तकांची,रेनकोट छत्र्यांची दुकानं फुलतील .मग रंगीत, झालरींच्या, फुलाफुलांच्या छत्र्या घेऊन मुली येतील. मुलांचे मात्र काळे, रॉयल ब्लू किंवाराखाडी रेनकोट असतील. वर्गात आल्यावर मागच्या रिकाम्या बाकांवर मुलींच्या छत्र्या निथळत राहतील.किती छान दिसेल ते दृश्य ! आणि दार , खिडक्या किंवा उरलेल्या बाकांवर मुलांचे रेनकोट्स पसरूनअसतील. त्यापैकी एखादा मुलगा हमखास रेनकोट विसरेल यात शंकाच नाही.अखंड पाऊस असल्या दिवशी वर्गात संख्या कमी असेल. आणि सगळे मिळून ‘आज काहीच शिकवू नका मॅडम’, असं सांगून देतील. वह्या पुस्तकं दप्तरात बंद होऊन गप्पा होतील . पावसाच्या, पुराच्या, गावाकडच्या.. खूप गप्पा. आपण काही बोलत असलो तरी एखादीचं लक्ष खिडकी बाहेरच्या पावसातच गुंतून असेल. तिची तंद्री मोडायची नाही. तास संपल्यावर स्टाफरूम पर्यंत जायला एखादीची छत्री मागायची, मग त्यापैकी एक उत्साही मुलगी नाचत येईल. एका छत्रीत दोघी चालत जाऊ. खरं तर पायऱ्या उतरताना पाऊस लागत नाही पण नंतर लागतोच. आपण हसून छत्रीबाहेर पडावं तर तिला तेवढ्या दीड दोन मिनिटांच्या छात्रीतल्या प्रवासाचंच फार कौतुक वाटावं. किती अप्रूप असतं मुलींना एका छोट्या कृतीचंही ! त्याची जाणीव मनभर पसरावी.मुलांचे मात्र काहीतरी वेगळेच ताल असतील. त्यांना रेनकोट असूनही टोप्या हरवलेल्या, रस्त्यात भांडताना किंवा वेगात सायकली चालवताना उडालेल्या. मग भिजक्या डोक्यानेच वर्गात बसतील बावळट मुलं. ओल्या कपाळावर आलेल्या केसांमुळे, एकाहून एक सरस, बहाद्दर, बंड, गुंड आणि काहीच्या काही खतरनाक मुलं देखील निरागस निष्पाप दिसू लागतील. पण ती तशी कुठं असतात?मुली मात्र कपाळावर भिजलेली कुरळी बट सावरत, तुषारांनी किंचित भिजले खांदे रुमालाने पुसून पुन्हाओढण्या नीट करत अधिकाधिक गोड खडीसाखर दिसतील .मुलांच्या खिशातला एकुलता रुमाल त्यांच्या डोक्याइतकाच भिजून असेल.. मुलींकडे मात्र दोन तीन इवले रुमाल असतील म्हणजे असतीलच .मग सगळ्या एकदम, ‘गोष्ट सांगा छान ‌..’ असा आग्रह करतील .मुलगे म्हणणार , ‘आपण गोष्टी करू, सांगू नका !’मग मॅडम खूप जुनी गोष्ट सांगतील .

आता पाऊस आला. म्हणजे मुलं येतील. मुली जाईजुईचे गजरे माळतील. काही फुलं रुमालात बांधून आणून देतील. मुलं गणपतीसाठी सुट्या मागतील. मुली गोकुळ अष्टमीचा सुंठवडा आणतील.पाऊस आला म्हणजे आता पंधरा ऑगस्टला भिजल्या मैदानावर परेड होईल.मुलंमुली गणवेशात सुंदर दिसतील.मुलं येतील. नव्हे, मुलांनी आता यावं. मॅडमजवळ आणि मुलांजवळ साचलेल्या अनेक कथा एकमेकांनासांगायच्या आहेत. किती दिवसांच्या भेटी व्हायच्या आहेत.आता पाऊस आला आहे. म्हणजे सगळं आधीसारखं होणार.मास्क, सॅनिटायझर अस्तित्वात नसलेला सुदृढनिरामय भवताल असेल. एखादं दुस्वप्न सकाळी उठल्यावर मनाच्या पटलावरून पुसून जावं तसा हा काळ पुसला जाईल.आता पाऊस आला आहे. म्हणजे मुलं येतील, वर्ग भरतील ..‘अरे काय चाललंय काय ? हजेरी होईपर्यंत तोंड बंद ठेवा जरा..’ असं रागवावं लागेल.ते ऐकून, मुलं तोंडावर हात ठेवून पुन्हा हसतील.आता पाऊस आला आहे , म्हणजे सगळं पुन्हा आधीसारखं होईल .होणारच. नव्हे, व्हावंच!

(लेखिका प्राध्यापक आहेत.)madhavpriya.bhat86@gmail.com

टॅग्स :पाऊस