Join us  

कुणी आनंदी दिसलं-कुणाचं भलं झालं तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असते? आनंद होतो की जळफळाट-खरं सांगा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 5:28 PM

आपण देवीची आरती करताना करूणाविस्तारी अशी प्रार्थना करतो, पण आपल्या मनात इतरांविषयी करूणा जागवली तर प्रेमानं एक समंजस सीमोल्लंघनही सहज करता येईल!

ठळक मुद्देआपण आपल्या मुलाबाळांनाही हीच करूणा शिकवली पाहिजे, आपल्या वागण्यात त्यांना दिसली पाहिजे.

- अश्विनी बर्वे

नवरात्र येतं ते उत्साह-आनंद आणि रंगाची उधळण करतच येतं. त्यामुळे ते येण्याच्या आधीपासूनच समाजात एक प्रकारचं चैतन्य पसरत जातं. नुकताच पाऊस पडून गेलेला असतो, हवेत गारवा येऊ लागतो. आपल्याला हवे तसे बदल वातावरणात होऊ लागले की, माणसाचं मन सृजनाचा अधिक चांगल्याप्रकारे विचार करू लागतं. अर्थात हे सृजन अनेक अंगांनी व्यक्त होत राहतं. पण आपल्या व्यक्त होण्यात हे सृजन असतं का? सकारात्मकतेने - समजुतीच्या भावनेने आपण व्यक्त होतो का?आपण नवरात्रात घरादाराची साफसफाई करतो. घरातील चिंधीसुद्धा धुवून स्वच्छ करतो. काहीजण तर चप्पल घालत नाहीत. उपवास करतात. आपल्या घरात असतील आणि जमतील त्या रूढी, परंपरा पाळण्याचा जो-तो आपापल्या कुवतीनुसार प्रयत्न करत असतो. त्यावेळी अनेकजण जमेल त्या गोष्टी आनंदाने करत असतात तर काहीजण एक प्रथा पाळायची असते म्हणूनही रूढीला शरण जातात. काही व्यक्ती काळाप्रमाणे त्यात बदल करतात. यामध्ये कोणाचे चूक किंवा बरोबर यापेक्षाही प्रत्येकाचा वैयक्तिक आनंद महत्त्वाचा आहे. त्या व्यक्तीला छान वाटणे महत्त्वाचे आहे.

(Image : google)प्रश्न असा की तसे आपल्याला छान वाटते आहे का? हे प्रत्येकाने विवेकाने शोधणे आणि त्याप्रमाणे आपल्यात हळूहळू सामंजस्याने बदल करणे हे खरंतर नऊ दिवसांचे पारणे होईल आणि झालेला बदल स्वीकारणे हे खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन होईल, असे वाटते.पण आपल्याला खरंच सीमोल्लंघन करायचं असतं का? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. नवरात्रात आपण रोज आरतीत देवीला म्हणत असतो, “करूणाविस्तारी”... पण आपण आपल्या करूणेचा विस्तार करत आहोत का?

किती पद्धतीने आपण इतरांना लेबलिंग करत असतो. अविवाहित, विधवा, परित्यक्ता, मूल असलेली-नसलेली, गरीब, श्रीमंत, नोकरी करणारी, न करणारी, काळी, गोरी, शिक्षित, अशिक्षित, हुशार, मठ्ठ, किती ती लेबलं आपण आपल्याही नकळत लावतो. नावं ठेवतो, तुलना करतो. जाती-धर्माचा भेदभावही केला जातो. सगळ्यांना सामावून घेता येईल, असे थोडेतरी वागणे आपल्याला कसे जमेल, याचाही विचार आपण करायला हवा.काही दिवसांपूर्वी ‘हेल्लारो’ हा गुजराती सिनेमा बघितला होता. त्यातलं एक गरबा गीत फार सुंदर आहे. त्या सिनेमात जे गाव दाखवलं आहे, त्या गावातील स्त्रियांना गरबा खेळण्याला पुरुषांनी मनाई केलेली असते. या स्त्रिया पाणी भरण्यास लांबवर जातात. त्यावेळी त्यांना एक अनोळखी ढोलकीवाला चक्कर येऊन पडलेला दिसतो. त्या त्याला पाणी पाजतात. तो शुद्धीवर येतो. त्यांना विचारतो की , “मी तुमच्यासाठी काय करू?” तेव्हा त्या स्त्रिया त्याला ढोलकी वाजवायला सांगतात. ढोलकीच्या तालावर मनसोक्त नाचतात. या स्त्रियांना नाचताना संकोच वाटू नये म्हणून तो त्यांच्याकडे पाठ करून उभा राहतो. ते नृत्य फार सुंदर आहे पण ते पाहताना वाटतंच की, या स्त्रियांच्या गरबा खेळण्याच्या आनंदावर दुसरे कोणीतरी बंधन घालतं आहे. आपण देवीला शक्ती समजतो, तिची पूजा करतो, पण आपल्या अवतीभोवतीच्या स्त्रियांशी आपण कसे वागतो, त्यांच्यावर बंधनं घालतो का? त्यांना त्यांच्या मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य आहे का हे ही बघायला हवं.

आपण स्त्रीकडे एक व्यक्ती म्हणून बघायला हवे. व्यक्ती म्हणून तिच्यातही काही कमतरता असतील ज्या सगळ्यांकडे आहेत, त्यावर आपल्याला भगिनीभाव मनात ठेवून मात करता येईल. पण त्यासाठी मनाची दारे खुली असली पाहिजेत. व्यक्तीमधली उणीव म्हणजे ती व्यक्ती नाही. तिच्यात अजून काही सृजनशील नक्कीच असणार आहे, त्यातलं जे चांगलं त्याविषयी आपल्याला आदर आहे का?पण असा करूणा असलेला विचार न करता आपण आपल्या हातात असलेल्या गोष्टीसुद्धा अवघड करून ठेवतो. खरंतर आपणच एकमेकांसाठी आपली करूणा विस्तारली पाहिजे.

(Image : google)

उदाहरणच पाहा, लहान मुलांना किंवा शाळेत जाणाऱ्या अनेक मुलांना पालक धमक्या देतात, पास झाला नाहीस तर घराच्या बाहेर काढेन किंवा चांगला फोडून काढेन. तेव्हा घाबरून मुले घरातूनच पळून जातात. मुलांना त्यांच्या वयाच्या प्रश्नांसहित समजून घेण्यासाठी आपली करूणा विस्तारायला हवी. एखाद्या व्यक्तीला तिच्या व्यंगावरून बोलताना आपली करूणा विस्तारायला हवी. एवढेच नाही तर जातीधर्माच्या भेदापलीकडे माणूसपण जगण्यासाठीची करूणा आपल्या ठायी हवीच हवी. दुभंगणारं आणि दुभंगलेलं काहीतरी सांधणारी आपली करूणा हवी. आपण आपल्या मुलाबाळांनाही हीच करूणा शिकवली पाहिजे, आपल्या वागण्यात त्यांना दिसली पाहिजे. म्हणून आपल्यातल्या करूणेला पाझर फुटायला हवा. आपल्या आत जी उन्मळ आहे ती स्थिर व्हायला त्याने मदत होईल. अशी करूणा आपल्या मनात जागवूया आणि जागविण्याचा प्रयत्न करूया. हे सीमोल्लंघन आपल्यासाठी फार मोलाचं ठरेल!

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

ashwinibarve2001@gmail.com

 

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला