Lokmat Sakhi >Mental Health > शरीर सिग्नल देतं मन आजारी असल्याचा, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत का नाही? काय केलं म्हणजे हे कोडं सुटेल

शरीर सिग्नल देतं मन आजारी असल्याचा, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत का नाही? काय केलं म्हणजे हे कोडं सुटेल

स्व ओळखी बाबत अनेक प्रश्न पडतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं कुठे बाहेर मिळत नाहे. ती आपल्यातच दडलेली असतात. त्यासाठी आत्म जागरुकता महत्त्वाची.  खूप कठीण वाटतो ना हा शब्द. पण ही प्रक्रिया करणं तितकं अवघड नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 07:06 PM2021-03-17T19:06:24+5:302021-03-18T14:57:41+5:30

स्व ओळखी बाबत अनेक प्रश्न पडतात. पण त्या प्रश्नांची उत्तरं कुठे बाहेर मिळत नाहे. ती आपल्यातच दडलेली असतात. त्यासाठी आत्म जागरुकता महत्त्वाची.  खूप कठीण वाटतो ना हा शब्द. पण ही प्रक्रिया करणं तितकं अवघड नाही.

Self awarness Is it easy or difficult? | शरीर सिग्नल देतं मन आजारी असल्याचा, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत का नाही? काय केलं म्हणजे हे कोडं सुटेल

शरीर सिग्नल देतं मन आजारी असल्याचा, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत का नाही? काय केलं म्हणजे हे कोडं सुटेल

Highlightsआपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच असतं.आपण आपल्या मूलभूत स्वत्वाशी मैत्री केली की आपल्यातल्या सगळ्याच भावनांशी आपली ओळख होऊ लागते, आणि आपल्या जीवनाची गाडी रुळावर येऊ लागतेभावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे.

- समिंदरा हर्डीकर-सावंत

स्वत:ला ओळखणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. पण स्वत:ला ओळखायचं कसं? त्याचा मार्ग काय असे अनेक प्रश्न पडायला लागतात. स्वओळखी बाबत असे अनेक प्रश्न पडतात. या सर्वांचं उत्तर एका शब्दात आहे. आत्म जागरुकता.  खूप कठीण वाटतो ना हा शब्द. पण ही प्रक्रिया  करणं तितकं अवघड नाही.  या आत्म जागरुकतेची पहिली पायरी ही स्वओळखच आहे. ती होण्यासाठी आधी
खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, आणि आपल्याला स्वतःची कितीशी ओळख आहे, हे पडताळून पहा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारपूर्वक द्या आणि आपणच दिलेल्या उत्तरांची आपणच नोंद ठेवा.

१. तुमच्याकडे कोणती खास कौशल्यं आणि कला आहेत?
२. तुमच्या व्यक्तिमत्वाची ठळक वैशिष्ट्ये कोणती?
३. तूमच्या दृष्टीनं तुमच्यासाठी सर्वात मोठं आव्हान कोणतं आहे?
४. तुमच्या जीवनाला कशानं अर्थ  मिळतो?
५. तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे?
६. फक्त तीन शब्दांचा वापर करून स्वतःचं वर्णन कसं कराल?

आत्मजागरूकता का महत्त्वाची?

आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच असतं. आपल्या अंतर्मनात असतं. या अंतर्मनातील ज्ञानापर्यंत जाण्याचा मार्ग मात्र आपल्याला शोधायला हवा. याची सुरुवात आत्मजागृतीपासून होते.वेळोवेळी स्वतःला वर दिल्याप्रमाणे काही मूलभूत प्रश्न विचारून, आपल्या भावना, संवेदना , अंतर्ज्ञानांद्वारे आणि अंतर्भूत असलेल्या भावनांशी संपर्क साधून आत्म-जागरूकता वाढवू शकतो. या सर्वांद्वारे आपण आपल्यातील 'स्व'त्वाशी सतत जोडलेले  राहू शकतो, आपल्या व्यक्तिमत्वाचा जो सार आहे, त्याच्याशी संलग्न अशी आपली वागणूक होऊ शकते.
बर्‍याच वेळा, आपण कोण आहोत याच्याशी आपण जाणीवपूर्वक जोडलेले नसतो. आपल्या दैनंदिन जीवनाची गाडी आपण अक्षरशः ऑटो पायलटवर ठेवून चालवत असतो, आणि येणाऱ्या वस्तुस्थितीशी झुंजत असतो .  अर्थात फक्त प्रतिसाद देत असतो. एकदा आपण आपल्या मूलभूत स्वत्वाशी मैत्री केली की आपल्यातल्या सगळ्याच भावनांशी आपली ओळख होऊ लागते, आणि आपल्या जीवनाची गाडी रुळावर येऊ लागते. आपलं जीवन फक्त साद-प्रतिसाद इतकंच मर्यादित राहत नाही, तर जीवनातला आनंद आपल्याला जाणवू लागतो.   भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण स्वतःला ओळखलं पाहिजे.  त्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्ती, परिस्थिती किंवा घटनेबद्दल आपण विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया का दिली हे आपल्याला माहित असलं पाहिजे.

भावनिक आत्म-जागरूकता कशी वाढवावी?
यासाठी आधी भावनिक साक्षरता वाढवा! आपल्या स्वतःच्या भावनांबद्दल अधिक जागरूक होण्यासाठी खाली दिलेल्या पैकी काही सोप्या, झटपट गोष्टी करून पहा.
• विशिष्ट भावनांसाठी आपलं शरीर आपल्याला कोणते संकेत देतं हे ओळखा. आपण रागावलेले, घाबरलेले किंवा आनंदी आहात हे आपलं शरीर कसं सांगेल?
• हे संकेत आणि भावना अचूकपणे लेबल करा, त्यांना योग्य ते नाव द्या.
• प्रिय तसेच अप्रिय भावना दोन्ही अनुभवांना स्वीकारा.
• एकाच वेळी अनेक आणि विवादित भावनांचा अनुभव घेण्यासाठी आणि ओळखण्याची क्षमता वाढवा
प्रत्येक भावना आपल्या शरीरावर एक विशिष्ट ठसा उमटवते. बर्‍याचदा आपल्या स्वतःच्या भावनांविषयी आपल्याला माहिती नसतं, परंतु आपलं शरीर आपल्याला महत्त्वपूर्ण संकेत देऊ शकतं.
विचार करा  जेव्हा तुम्ही आनंद /क्रोध / दुःख / भीती  या भावना अनुभवता, तेव्हा तुमच्या शरीराकडून तुम्हाला काय संकेत मिळतात? 

हा कधीही न संपणारा प्रवास आहे. आत्मजागरुकता म्हणजे अंतिम साध्य नाही. आत्म जागरूकता एक स्थिर बिंदू नाही.आत्म-जागरूकता सतत बदलत असते, कारण आपण सतत बदलत असतो, नवीन अनुभव घेत असतो. थोडक्यात म्हणजे आत्म-जागरूकतेचा प्रवास हा आयुष्यभर चालणारा प्रवास आहे.

आपली आत्म-जागरूकता टोकदार कशी करावी?
• कोणतंही काम हाती घेण्यापूर्वी दीर्घ श्वास घेण्याचा आणि स्वतःला केंद्रित करण्याचा सराव करा.
• एखादी व्यक्ती भेटली की कोणत्या भावना तुमच्या मनात उमटतात याची नोंद घ्या. तसेच एखाद्या परिस्थितीला सामोरं जाताना आपल्या मनात काय चाललं आहे, हे ओळखा.
• कोणत्या गोष्टी तुम्हाला ट्रिगर करतात, याविषयी जागरूक राहा.
• काही लोक तुमच्या मध्ये अधिक भावना तीव्र निर्माण करतात का, याचा विचार करा.
• वेळोवेळी आपल्या स्वतःच्या भावनिक अवस्थेची तसेच उर्जेची नोंद करा. एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत, विशिष्ट वेळेत किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये तुमची ऊर्जा खालावते का?
• नियमित आत्म परीक्षण व आत्म निरीक्षण करण्याची सवय लावा. यासाठी रोज डायरी लिहिणं ,चिंतन करणं किंवा झोपण्यापूर्वी पूर्ण दिवसाचा आढावा घेणं, हे काही सोपे मार्ग आहेत.
चला तर मग, भावनिक आरोग्य जपण्याचा ते सुदृढ करण्याचा  प्रवास आपण सुरु करूया! यासाठी आपल्या भावनांची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे, आणि त्यासाठी आपण आत्म जागरूकतेच्या मार्गानं जाणार आहोत.  स्वतःशी, स्वतःच्या भावनांशी नीट ओळख झाली, कि मगच आपण या भावनांवर योग्य नियंत्रण कसं आणायचं, भावना उचित प्रकारे कशा व्यक्त करायच्या यावर विचार करता येईल.


मानसशास्त्रज्ञ & मानसोपचारतज्ज्ञ 
सह-संस्थापक, दिशा समुपदेशन केंद्र
samindara@dishaforu.com | www.dishaforu.com

Web Title: Self awarness Is it easy or difficult?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.