Lokmat Sakhi >Mental Health > त्या खडूस माणसाशी बोलायचं म्हणजे वैताग, भांडणच होणार!- तुमच्याही आयुष्यात होतात का सतत कटकटी?

त्या खडूस माणसाशी बोलायचं म्हणजे वैताग, भांडणच होणार!- तुमच्याही आयुष्यात होतात का सतत कटकटी?

आपला स्वत:शी आणि इतरांशी संवाद कसा आहे? आपल्याला खरंच नीट बोलता येतं? -विशेष मालिका आयपीएच माइण्डलॅब नाशिक-१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2023 08:04 PM2023-10-16T20:04:22+5:302023-10-16T20:07:31+5:30

आपला स्वत:शी आणि इतरांशी संवाद कसा आहे? आपल्याला खरंच नीट बोलता येतं? -विशेष मालिका आयपीएच माइण्डलॅब नाशिक-१

self talk-Aggressive Communication -Submissive Communication- how to deal with it? | त्या खडूस माणसाशी बोलायचं म्हणजे वैताग, भांडणच होणार!- तुमच्याही आयुष्यात होतात का सतत कटकटी?

त्या खडूस माणसाशी बोलायचं म्हणजे वैताग, भांडणच होणार!- तुमच्याही आयुष्यात होतात का सतत कटकटी?

Highlightsस्वतःच्या बोलण्यावर विश्वास असेल, संवादाच्या उद्दिष्टाची स्पष्टता असेल आणि इतरांची मते सक्रियपणे ऐकून घेण्याचा संयतपणा असेल, तरच बांधले जातात 'सुसंवादाचे पूल'.

गुंजन कुलकर्णी (चिकित्सा मनोविकासतज्ज्ञ, नाशिक)

"इंसानोंके पास एक चीज़ कमाल की होती है, उनकी जुबाँ|! जिसका प्रयोग करके वह एकदुसरेको अपने दिल की बात, अपने विचार बयाँ कर सकते है| इससे वह
एकदुसरेको अच्छी तरह से जान सकते है, समझ सकते है| मगर ऐसा अक्सर होता नहीं|" दिल धडकने दो या हिंदी चित्रपटात, मेहेरा कुटुंबातील पाळीव कुत्रा त्याचे हे निरीक्षण निवेदनातून प्रेक्षकांसमोर मांडतो. हा प्रसंग पाहताना माझ्या मनात विचार आला होता, की ज्यांना आपण मुकी जनावरे म्हणतो त्यांना, जगभरात एकूण ६५०० हून अधिक भाषा विकसित करणाऱ्या आणि त्याद्वारे संवाद साधणाऱ्या माणसांबद्दल, खरेच असे वाटत असेल का? विचार करण्यासारखी बाब आहे ना? मानवाच्या उत्क्रांतीसोबत सातत्याने विकसित होत गेलेले भाषिक (verbal) व कायिक (non-verbal) संभाषण (communication) आपल्या भावना आणि विचारांचे आदान-प्रदान करण्यास आजही पूर्णतः समर्थ नाही.


(Image :google)


"काही उपयोग आहे का बोलून? शेवटी त्यांना हवं तेच होणार."
"उद्धटपणा कसला आलाय त्यात? तिला ह्याच भाषेत बोललेलं कळतं."
"सांगत बसायचं नाही गं. आपण करून टाकायचं आपल्याला हवं ते. उगीच चर्चा कशाला?"
"मला बाई भीती वाटते त्यांच्याशी बोलायची. कधी वसकन ओरडतील ते सांगता येत नाही."
"मुलांना कशाला समजावत बसायचं? त्यांना काय कळणार आहे? या वयात त्यांना धाकच पाहिजे आपला."
"त्यांच्यासमोर हो हो केलं की झालं. विषय संपतो. नंतर आपण आपल्याला हवं ते करायला मोकळे."
ही आणि अशीच अनेक वाक्ये आपण नेहेमी ऐकलेली असतात आणि कधी बोललेलीही असतात. ही वाक्ये वरवर पाहता साधी वाटली तरी ती बऱ्याचदा संवादाचा विसंवाद करणारी, गैसमजुतीची बीजे पेरणारी, नात्यांमध्ये दुरावा आणणारी आणि मुख्य म्हणजे आपला स्वतःचा भावनिक समतोल ढळवणारी ठरू शकतात हेही आपण अनेकदा अनुभवलेले असते. 
वरची ही वाक्ये वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी असली तरी नीट पाहिले तर त्यांचे आपल्याला दोन ढोबळ गटांत वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे 'दुसऱ्याचे वर्चस्व स्वीकारणारा संवाद' (Submissive Communication) आणि दुसरे म्हणजे 'दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणारा संवाद' (Aggressive Communication). कुठलाच प्रतिकार न करणारा 'अतिनम्र' संवाद साधणाऱ्यांचा कल बहुतेक वेळा संवाद टाळण्याकडे, निमूटपणे ऐकून घेण्याकडे आणि पर्यायाने मनातल्या मनात धुमसत राहण्याकडे दिसतो. सातत्याने दुसऱ्यावर सत्ता गाजवण्याच्या हेतूने केला जाणारा ‘आक्रमक' संवाद साधणाऱ्यांचा कल भाषिक आक्रमकतेकडे, दुसऱ्याचे ऐकून न घेण्याकडे असतो. अशा अट्टाहासाने सत्ता गाजवणे फार काळ शक्य होत नाही आणि पदरी अपेक्षाभंग येऊ शकतो. अर्थात काही व्यक्ती नेहेमीच अतिनम्र संवाद साधतील आणि काही व्यक्ती आक्रमकच संवाद साधतील असे नाही. आपला संवाद समोरच्या व्यक्तीचे वय, लिंग, नाते, हुद्दा, सामाजिक स्थान, वेळ, ठिकाण, प्रसंग यानुसार बदलतो. वर्षानुवर्षे कुठलाच प्रतिकार न करता ऐकून घेत धुमसत राहणारी व्यक्ती कधीतरी अत्यंत आक्रमकरित्या व्यक्त होऊ शकते. आणि तसे करण्याला आपल्या आजवरच्या सहनशीलतेतून मिळालेला अधिकार मानू शकते. तसेच एखादी कुटुंबियांसमोर आक्रमकपणे बोलणारी व्यक्ती, ऑफिसमध्ये बॉससमोर मात्र हो ला हो करणारी असू शकते.
आपले संगोपन, स्वभाव, व्यक्तिमत्व, परिस्थिती, अनुभव अशा अनेक बाबी आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीला कारणीभूत असतात. पण म्हणून ते बदलता येणार नाही असे मुळीच नाही. कौटुंबिक, कार्यालयीन, सामाजिक नातेसंबंधांमध्ये आपले म्हणणे लोकांनी ऐकावे, आपल्याला आपले विचार स्पष्टपणे मांडता यावेत, लोकांना आपल्याशी संवाद साधण्यात रस वाटावा, इतरांनी आपला आदर करावा असे आपल्या सगळ्यांनाच वाटत असते. पण 'सांगून काय उपयोग?' किंवा 'धडाच शिकवला पाहिजे' असा कुठलातरी विचार आपल्या संवादावर वरचढ होतो. त्यातून आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोहोचत तर नाहीच, शिवाय आपल्याला होणार मनस्तापही टळत नाही.

(Image :google)


मूग गिळून गप्प बसण्यापेक्षा आपले म्हणणे ठामपणे मांडता येते का?

आक्रमकपणे न मांडताही आपले म्हणणे समोरच्यापर्यंत पोहोचवता येते का? सकारात्मक, खंबीर, विधायक संवाद (Assertive Communication) साधता येतो का? संवाद ही खरेतर क्लिष्ट प्रक्रिया आहे. समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याच्याही आधी आपण त्याबाबतीत स्वतःशी संवाद साधत असतो. समोरच्याची विशिष्ट प्रतिक्रिया गृहीत धरून आपला पवित्रा ठरवला तर विसंवाद होण्याची शक्यताच जास्त. यामध्ये आपण संवाद सुरु करण्याच्या आधीच समोरून येणाऱ्या प्रतिक्रियेचा गरजेपेक्षा जास्त विचार करतो. मग संवादाचे उद्दिष्ट 'बचावात्मक' (Defensive) होते. बचाव करायचा तर आपल्या ढालीखाली लपणे आले किंवा स्वतः तलवार उपसणे आले. संवादाचे उद्दिष्ट 'व्यक्त होणे' असे असेल तर आपण 'स्व-संवाद' बोलण्याच्या मांडणीवर केंद्रित करतो. मांडणी अधिक आत्मविश्वासपूर्ण (Confident), स्पष्ट (Clear) आणि संयत (Controlled) करण्यावर भर देतो. अशा मांडणीनंतर समोरच्या व्यक्तीकडून आपल्या संवादाचा आदर केला जाण्याची शक्यता निश्चित वाढते. तसे झाले नाही तरी आपले म्हणणे आपण व्यवस्थित मांडू शकलो हे समाधान आपल्याजवळ जरूर राहते. या दोन्हीमध्ये मनस्तापाला जागा नाही.
यापुढे कुणाशी संवाद साधण्याआधी आपला स्व-संवाद (Self-Talk) काय आहे हे लक्षात घ्या. 'मला नाही मुद्देसूद बोलता येतं'; 'या खडूस माणसाशी बोलायचं म्हणजे वैतागच आहे'; 'सांगायला कशाला हवंय? इतक्या वर्षांच्या सहवासानंतर इतकंही कळायला नको का?'; 'इतकं व्यवस्थित काम केलंय. आता जर का तिने चुका काढल्या तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही' अशा विचारांतून बचावाची धोरणे तयार केली जातात. संवादाची अशी लढाई परस्परांना तोडणारी असते. स्वतःच्या बोलण्यावर विश्वास असेल, संवादाच्या उद्दिष्टाची स्पष्टता असेल आणि इतरांची मते सक्रियपणे ऐकून घेण्याचा संयतपणा असेल, तरच बांधले जातात 'सुसंवादाचे पूल'.

gunjan.mhc@gmail.com

Web Title: self talk-Aggressive Communication -Submissive Communication- how to deal with it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.