Lokmat Sakhi >Mental Health > दोघांच्या नात्यातली ‘नाजूक’ आणि ‘अव्यक्त’ कुंचबणा जगण्यातलं सुख हरवून टाकते तेव्हा..

दोघांच्या नात्यातली ‘नाजूक’ आणि ‘अव्यक्त’ कुंचबणा जगण्यातलं सुख हरवून टाकते तेव्हा..

स्वतःच्या तना-मनावर प्रेम करून, ‘स्वतःचं असणं’ मुक्तपणे अनुभवावं, याचा विसरच पडून गेलाय आपल्याला. कधी साजरं केलंय आपण आपलं असणं, आपणच आपला केलेला स्वीकार.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:25 PM2021-03-18T20:25:23+5:302021-03-18T20:31:57+5:30

स्वतःच्या तना-मनावर प्रेम करून, ‘स्वतःचं असणं’ मुक्तपणे अनुभवावं, याचा विसरच पडून गेलाय आपल्याला. कधी साजरं केलंय आपण आपलं असणं, आपणच आपला केलेला स्वीकार.

sexual health & menatal help- low self esteem & misunderstandings how it affects the quality of life forever. | दोघांच्या नात्यातली ‘नाजूक’ आणि ‘अव्यक्त’ कुंचबणा जगण्यातलं सुख हरवून टाकते तेव्हा..

दोघांच्या नात्यातली ‘नाजूक’ आणि ‘अव्यक्त’ कुंचबणा जगण्यातलं सुख हरवून टाकते तेव्हा..

Highlightsकधी मोकळी होणार आपल्या सर्वांची मने ? 

ऐश्वर्या रेवाडकर

दोन व्यक्तीमधील नाते. मन आणि शरीर, दोन्ही पातळीवर विकसित होणारे.
म्हणजे असा हात पुढे करून दुसऱ्याला स्पर्श करावा आणि त्या एक स्पर्शात सारेकाही समजावे. कुठल्या शब्दाची किंवा काही बोलण्याची जरूर नसावी. ‘स्पर्श’. एक जादुई, मंत्रमुग्ध करणारे अस्त्र. मन विरघळते एका प्रेमाच्या स्पर्शाने. मनावर उठलेले असंख्य व्रण पुसले जातात आणि तणाव अलगद दूर होतात. एकमेकात विरघळून जाणे, सोबतीने शारीर सुखाची अत्त्युच पातळी गाठणे म्हणजे नात्यातील एकरूपतेचा कळसाध्याय. शरीराच्या उपभोगानेच, भावनांच्या साक्षीने, शरीराच्या पल्याड जाण्यातील तो आनंद.
हे हरवून बसतोय का आपण कुठे ? मिळवू शकतो का ? आणि देऊही शकतो का हा आनंद निर्भेळपणे आपल्या जोडीदाराला ? 
सर्वांनाच हा आनंद गवसतो असे नाही. जेव्हा आपण कमावले असेल भान, स्वतःच्या मनाला आणि शरीराला ओळखण्याचे, तेव्हाच समजून घेता येईल समोरच्या व्यक्तीलाही, त्याच्या तना-मनासकट. गाण्याचे जसे सप्तसूर आपण शिकतो, तसेच स्वतःच्या शरीराचेही सा-रे-गा-मा-पा सापडले असतील, तरच निर्माण करू शकू आपण मधुर स्वर त्यातून आणि समोरच्यालाही करू शकू तृप्त. या अशा लहरी आहेत की जर जागृत करत्या आल्या स्वतःच्या देहात, तर स्पर्शाने जोडीदाराच्याही चेतना होतील जाग्या आणि शमतीलही असीम आनंदाने. अशी स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही शरीराची बनवता येईल सतार, तेव्हा कुठे जुळतील सूर जगण्याचे.


सर्वचजण असतात का असे जागरुक स्वतःच्या शरीराबद्दल ?
कुठेतरी मी खूप सुंदर ओळी वाचल्या होत्या. “शरीर म्हणजे जणू चित्र रंगवण्याचा ब्रश आहे. तो बारीक आहे, जाड आहे, उंच, बुटका, गोरा, काळा, याने काही फरक पडत नाही. महत्वाचे हे आहे की तुम्ही त्याचा वापर कसा करता. तुमच्या आत जे आहे, ते अशाप्रकारे या जगाच्या कॅनव्हासवर उतरवा आले पाहिजे की पाहणारे दंग होऊन जातील, मग ते तुमचे काम असो, छंद असो की नाती. स्वतःला नावे ठेवत बसण्यापेक्षा, जे नाही त्याची चिंता करत बसण्यापेक्षा, जे मिळाले आहे, त्याचा वापर करा, प्रेम देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठीसुद्धा.”
जोपर्यंत आपले मन अडकून पडेल, गर्व, असुरक्षितता, हेवेदावे, मत्सर, कटू आठवणी, दुःख, वेदना, भूतकाळ, या साऱ्या पसाऱ्यात, तोपर्यंत आपण स्वतःलाच नीटपणे ओळखू शकणार नाही, अशात समोरच्यापर्यंत पोहोचणे कसे शक्य होईल ?
सेक्स म्हणजे फक्त क्षणिक शारीर तृप्ती असते का ?  एकासोबत करायचा की अनेकासोबत ? आणि मग नीतीमत्तेचे काय ? किती सारे प्रश्न. किती सारी दांभिकता आणि किती सारी असुरक्षितता. विकृती. गुन्हे.
‘प्रणयसुख’ या एका एका छानशा, निरामय गोष्टीला आपले शब्द, पूर्वग्रह, कोते विचार, भीती, दांभिकता, तोकडी बुद्धी इतकी करकचून बांधून टाकते घट्ट आवरणात की मग तिथपर्यंत आपली झेप कधी पोहोचतच नाही. आपण अलीकडच्याच स्टेशनांवर रेंगाळत राहतो की या सर्वाच्या पलीकडे मुख्य स्टेशन आहे, याचा विसरच पडून जातो.
 दुसऱ्याचे शरीर निर्भेळपणे भोगण्याआधी कितीजण सेलिब्रेट करतात स्वतःचे शरीर आणि स्वतःची लैंगिकता ? यात सारेच आले, स्त्री, पुरुष, इतर, सर्वच. उदाहरण स्त्रीचे घ्यायचे तर किती स्त्रिया स्वतःचे सौंदर्य, स्वतःचे स्त्रीत्व आनंदाने साजरे करतात ? आत्मविश्वासाने वावरतात स्वतःच्या कातडीमध्ये ? साधी ब्रेसिअरची पट्टी दिसली, तर दचकतो आपण.  शॉर्ट कपडे घालणे चांगले की वाईट, या विषयातच आपण इतके अडकून पडलो आहोत, की स्वतःच्या तना-मनावर प्रेम करून, ‘स्वतःचे असणे’ मुक्तपणे अनुभवावे, याचा विसरच पडून गेलाय आपल्याला. मेकअप करतोच आपण पण सौंदर्य कसे पहावे, कसे ते सहजपणे साधेपणाने दैनंदिन घटनांत अभिव्यक्त करावे हे विसरून तर जात नाहीयेत ना ? एक विद्या बालन साडी नेसून, अभिमानाने ते साजरे करतीये. पण आपणा बाकी सर्वांचे काय ? स्त्रीने स्वतःसाठी अभिव्यक्त व्हावे, ही एक छोटीशी गोष्ट आपल्याला शिकावी लागतेय पुन्हा पुन्हा.


   सेक्स लाईफ कसे आहे आणि ते आणखी सुंदर कसे बनवता येईल हा खरेतर खूप मोठा अभ्यासाचा, स्वपरीक्षणाचा विषय आहे, अगदी प्रत्येकासाठीच. वयाच्या प्रत्येक वळणावर तो नाजूकपणे बदलत जातो आणि आपणही त्यासोबत बदलत चुका दुरुस्त करत, प्रसंगी डॉक्टरकडून सल्ला घेत, त्यातील कौशल्ये विकसित केली पाहिजेत. तहानलेल्या नजरेच्या एका कटाक्षासोबत सेक्स सुरु होतो आणि परस्पर संमतीच्या स्पर्शाने, संभोगानंतर, उठून कामाला लागले तरी तो चालूच राहतो दोघांच्या शरीराच्या अणुरेणूत, मनाच्या विशेष कप्प्यात. जोडीदाराच्या नजरेला प्रतिसाद कसा द्यायचा, आतुर हाकेला ‘ओ’ कशी द्यायची आणि स्पर्शाच्या मदतीने एकमेकांच्या शरीरात कसे उतरायचे, हे जमले तर ते नाते आपसूकच बहरेल. एकमेकांच्या मदतीनेच समजून घेता येते स्वतःलाही आणि समोरच्यालाही. पण त्यासाठी मनही तेवढे मोकळे हवे, समजूतदार हवे, संवेदनशील हवे, दुसऱ्या मनाचा प्रत्येक हुंकार टिपून घेता यायला हवा. नकार असेल तिथे परिपक्वतेने थांबता यायला हवे. तगमग असेल, तिथे शांतपणे वाट पाहता यायला हवी. गायकाने हळूहळू मैफिल जमवावी, चित्रकाराने अनेकविध रंग वापरून नेटकेपणाने चित्र पूर्ण करत न्यावे, असे असावे दोन देहांचे मिलन.. आणि नातेही.
     स्वतःच्या शरीराचा तानपुरा बनवून, त्याचे सूर-ताल सापडले असतील, तर कशाला राहील इच्छा परस्परांच्या शरीरावर जबरदस्तीचा हक्क गाजवण्याची ? एक ॲडल्ट्रीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला, तर इतके आपण अस्वस्थ झालो, यातच आपली दांभिकता दिसून येते. जणूकाही आपला जोडीदार सांभाळण्याची जबाबदारी कोर्टाची आहे. इतके तकलादू असावे का नाते ? ते सांभाळण्याची जबाबदारी कुणाची ? 
    कितीतरी अशा जोडप्यांना मी सुचवते, डॉक्टरचा सल्ला घ्या, समुपदेशकाची मदत घ्या. पण शरीराच्या गरजेला आपण “घाणेरडे’ असे काहीतरी लेबल लावून टाकले आहे की या गोष्टी दडवून ठेवल्या जातात, त्या जखमा चिघळत राहतात. .
      कधी मोकळी होणार आपल्या सर्वांची मने ? 

(लेखिका छत्तीसगड -दंतेवाडास्थित स्त्री-राेग तज्ज्ञ आहेत.)

Web Title: sexual health & menatal help- low self esteem & misunderstandings how it affects the quality of life forever.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.