मुक्ता चैतन्य
अगदी झोपेपर्यंत डोळ्यांसमोर मोबाइलचा स्क्रीन धरून लोळण्याची सवय हल्ली अनेकांना असते. तशाच अवस्थेत झोपही लागते; पण फोन चालूच असतो. मध्येच नोटिफिकेशन वाजतं, खडबडून जाग येते! अनेकांना झोपेत मध्येच उठून उगीचच सोशल मीडिया चेक करायची सवय असते.हे सगळं टाळता येईल जर झोपेच्या वेळी मोबाइलची कुरकुर बंद केली तर!
ती करायची कशी?- अगदी सोपं आहे.
१) झोपायच्या अर्धा तास आधी फोन बंद करा. म्हणजे स्विच ऑफ. मुलांचे फोन तर आपण सहज बंद करू शकतो. जेणेकरून त्यांना शांत झोप मिळू शकेल.२) मोठ्यांना फोन बंद करणं शक्य नसेल तर त्यांनी फोनचा डेटा, वायफाय बंद करून टाकावं. म्हणजे तुम्ही आपोआप ऑफलाइन जाता आणि आभासी जगात सतत चोवीस तास जे काही सुरू असतं त्यापासून मेंदूला जरा विश्रांती मिळून तुम्हाला शांत झोप लागू शकते.३) आपल्या फोनमधल्या डिजिटल वेल बीइंग विभागात bedtime mode असा एक पर्याय असतो. तो चालू करायचा. तुम्ही तुमच्या फोनच्या झोपेचं शेड्युलही लावू शकता. उदा. रात्री १० ते सकाळी ७ तुमचा फोन झोपलेला असेल. फोन वाजलाच नाही की तो उघडून बघण्याचा मोह आपोआप टाळता येतो. हा मोड ऑन केला की तुमचा स्क्रीन ग्रे होईल आणि अलर्टस आणि इतर फोनमधून सातत्याने येणारे आवाज म्यूट होतील.४) फोनमधली सगळी नोटिफिकेशन्स बंद करा. व्हॉट्सॲप, बातम्या, सोशल मीडिया कशाचीही नोटिफिकेशन्स चालू ठेवू नका. यामुळे एकतर तुमचा फोन सतत वाजणार नाही. रात्रीच्या वेळीही वाजणार नाही आणि झोपेवर परिणाम होणार नाही.५) यूट्युबच्या जनरल सेटिंगमध्येही २ महत्त्वाचे पर्याय त्यांनी दिलेले असतात. ते आपण चालू करू शकतो. कारण अनेकदा दिवसभराची कामे संपल्यावर रात्री यूट्युब बघण्याची अनेकांना सवय असते. यात रिमाइंड मी टू टेक अ ब्रेक आणि रिमाइंड मी व्हेन इट्स बेड टाइम असे पर्याय आहेत. हे तुम्ही चालू केलेत की यूट्युब तुम्हाला सांगतं, फार वेळ सतत बघताय, जरा ब्रेक घ्या आणि आता झोपायची वेळ झालेली आहे यूट्युब बघणं थांबवा!- हे पर्याय आपल्या हातात आहेत, ते वापरायला फक्त आपल्याला शिकायचं आहे.
(लेखिका सोशल मीडियाच्या अभ्यासक आहेत.)