मुक्ता चैतन्य
आपल्या सगळ्यांना राग येतो. पण प्रत्यक्ष जगात आपण त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तेच आपण सगळे सोशल मीडियावर गेलो की झपाट्याने चित्र बदलतं. स्पष्ट वक्तेपणा आणि रागारागात व्यक्त होणं यातली निसरडी सीमारेषा झटकन पुसली जाते. स्पष्ट शब्दात मत मांडणं आणि समोरच्याचा अपमान होईल अशा पद्धतीने मतप्रदर्शन करणं यातला फरक दिसेनासा, समजेनासा होतो आणि माणसं इम्पल्सिव्ह होत व्यक्त व्हायला सुरुवात होते.
सोशल मीडियावर माणसं सतत अस्वस्थ असतात. इतरांना ‘रिडिक्यूल’ केल्याशिवाय आपलं श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही अशा वेडगळ समजुतींमध्ये अडकलेली असतात आणि त्यातूनच विलक्षण राग सतत ऑनलाईन जगात आणि विशेषतः सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतो. स्वतःला इंटलेक्चुअल म्हणवून घेणाऱ्यांपासून ते येताजाता भावना दुखावून घेणाऱ्या कॅटेगरी पर्यंत कुणाचीही यातून सुटका झालेली नाही हे कितीही नकोसं वाटलं तरी सोशल मीडियावर वावरणाऱ्या माणसांचं वास्तव आहे.
माणसं सतत अस्वस्थ असतात. सतत रागावलेली असतात. चिडलेली असतात.
कुणी काहीही पोस्ट करा त्याचा कुणाला कधी आणि कशावरून राग येईल हे खरंच सांगता येणार नाही अशी सध्या परिस्थिती आहे. सोशल मीडियावर जर बघितलं तर माणसं एकमेकांच्या रक्ताला तहानलेली आहेत की काय असं वाटावं इतकी विद्रुप दिसतात. साधी चर्चाही कधी उद्रेकाचं रूप घेईल आणि व्हर्चुअल जगात माणसं एकमेकांचे गळे धरायला धावतील सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे.
माणसं इतकी ‘हायपर’ का झाली आहेत?
खरंतर हा शास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या रागानंतर माणसांच्या मेंदूत नक्की काय घडतं याच्या नोंदी आताच्या काळात घेणं खूप गरजेचं आहे. अर्थात अशी कितीही अपेक्षा असली तरी प्रत्यक्षात असे फारच कमी अभ्यास होतात. भारतातून तर दुर्मिळच. काही दिवसांपूर्वी एक अभ्यास वाचनात आला. गॅलप ग्लोबल इमोशन्स रिपोर्टसाठी १४० देशातल्या १,५१,००० लोकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. २०१६ पासून हे काम सुरु होतं. या सर्वेक्षणात असं दिसून आलं की एकूण जगभर माणसांना राग येण्याचं प्रमाण जवळपास २२ टक्केंनी वाढलेलं आहे. हा आकडा खूप मोठा आहे. अगदी साधं बघूया, रस्त्यावरून जाताना, सिग्नलवर माणसं सतत एकमेकांकडे खाऊ की गिळू नजरेनं बघत असतात. सगळ्यांना पुढे जायची घाई आहे, सेकंदभर जरी उशीर झाला तरी मागचा दातओठ खाऊन हॉर्न वाजवायला लागतो. एका सेकंदाने असा काय फरक पडणार असतो पण माणसांना तो एक सेकंदही सहन होईनासा झाला आहे.
राग येण्यामागे अनेक मनोसामाजिक, आर्थिक कारणं असली तरी सोशल मीडिया हे त्यातलं एक महत्वाचं कारण आहे. सतत ऑनलाईन असल्याचा विलक्षण थकवा येतो, जो अनेकदा लक्षात घेतला जात नाही. माणसं ऑनलाईन असताना अनेकदा पाणी प्यायचं, वेळच्या वेळी खायचं विसरून जातात, गेमिंग करणाऱ्या अनेकांना अति खाण्याची किंवा काहीच न खाण्याची सवय असते. या सगळ्यातून शरीरात रसायनांचा असमतोल होतो. ज्यातून मानसिक आणि शारीरिक थकवा येण्याची शक्यता असते आणि त्यापाठोपाठ राग.
दुसरं म्हणजे, सतत सोशल मीडियावर असल्यामुळे अनेकदा आपण जगाशी कनेक्टेड आहोत असा भास तयार होतो. सतत ऑनलाईन चर्चांमध्ये तावातावाने बोलताना आपण फार महत्वाचं काहीतरी मांडतोय असं वाटत असलं तरी त्यासगळ्यातून विलक्षण ताण मनावर साचतो. अस्वस्थता निर्माण होते आणि व्यक्त होण्याच्या माणूस म्हणून आपण स्वतःला घालून दिलेल्या सीमारेषा आपण कधी ओलांडून जातो आपलं आपल्यालाही समजत नाही.
‘इंटलेक्चुअल टॉलरन्स’ ही आजची सोशल मीडियावरची अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे.
आणि ऑनलाईन राग ही अतिशय कॉमन भावना आहे.
ही भावना इतकी ‘कॉमन’ होण्यामागे आपल्या डोळ्यापुढ्यात असलेला स्क्रीन महत्वाची भूमिका बजावत असतो. माणसं जेव्हा प्रत्यक्ष राग व्यक्त करतात, भांडतात, वादावादी करतात तेव्हा प्रत्येकवेळी शारीरिक मारामारी होतेच असं नाही. शाब्दिक हाणामारीच जास्त होत असते. त्यातही काही काळाने हे सगळं थांबतं कारण प्रत्यक्षात शारीरिक हिंसेच्या शक्यता खूपच जास्त असतात. आभासी जगात आणि सोशल मीडियावर ती भीती नसते. फारच वातावरण तंग झालं तर होऊन होऊन काय होईल समोरची व्यक्ती ब्लॉक करेल, अकाउंट रिपोर्ट करेल याव्यतिरिक्त काहीही होऊ शकत नाही हे बहुतेकांना माहित असतं. रागाच्या भरात टोकाचं अब्युज करणाऱ्यांनाही आपल्या विरोधात तक्रार होऊ शकते याचा अंदाज असतो. पण तरीही माणसांना राग व्यक्त करताना सीमारेषा घालून घ्यावीशी वाटत नाही, कारण त्यांच्यात आणि समोरच्या व्यक्तीमध्ये एक पडदा असतो. आणि हा पडदा आपलं रक्षण करेल अशी भावनाही कुठेतरी मनात असते.
सोशल मीडियावर ‘निनावी’ वावरता येत हेही एक कारण आहे माणसं रागावर नियंत्रण न ठेवता अंधाधुंद पद्धतीने व्यक्त होत असतात. आपली खरी ओळख जगाला नाही त्यामुळे निनावी मुखवट्या आडून आपण वाटेल तसं वागू, बोलू शकतो असा एक फाजील आत्मविश्वास अनेकांमध्ये तयार होतो.
मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे, आपण तंत्रज्ञान वापरायला शिकलो आहोत, माध्यम नाही. आपल्याला सोशल मीडिया किंवा कुठलंही ऍप्स, गॅजेट तांत्रिक दृष्ट्या वापरता येतं. माध्यम म्हणून त्याचा वापर करण्याची समज आपल्याकडे विकसित झालेली नाही. एखाद्या गोष्टीवर किती तीव्र प्रतिक्रिया द्यायची, मुळात प्रतिक्रिया द्यायची गरज आहे का, आपण ज्या भाषेत प्रतिक्रिया देतोय अगर पोस्ट लिहितोय त्याचा कुणावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो का या कशाचाही विचार केला जात नाही. याचं भान रहात नाही. भान सुटलेली आणि सतत रागावलेली माणसं सोशल मीडियावर वावरताना इतरांना उबग आणतात आणि स्वतःवरचा ताण विनाकारण वाढवत राहतात. आलेला राग योग्य का? योग्य पद्धतीने व्यक्त झाला आहे का या सगळ्याकडे लक्ष देण्याची फुरसत जगाशी कनेक्टेड राहण्याच्या वेगात हातातून निसटून जाते. आणि मग रागावलेली, चिडलेली, टीकेच्या आडून राग ओकणारी माणसं भकास आणि केविलवाणी दिसायला लागतात.
अशा भकास माणसांचा समुदाय वाढत जाणं हे आपण समाज म्हणून आजारी असल्याचं महत्वाचं लक्षण मानलं पाहिजे. रागाला समंजसपणाचं कुंपण असेल तर तो राग माणसांच्या उपयोगी पडू शकतो. पण तसं होताना दिसत नाही. विखारी, विभत्स पद्धतीने व्यक्त झालेल्या रागाला सोशल मीडियावर ग्लॅमर आलेलं आहे. राग जितका विषारी उन्माद तितका जास्त असं काहीतरी गणित होऊ बघतंय. ऑफलाईन जगात जसं रागावर नियंत्रण ठेवायला आपण शिकतो तसंच ऑनलाईन जगात वावरतानाही रागाचं नियोजन आणि रागावर नियंत्रण करायला शिकणं अतिशय गरजेचं आहे. रागाच्या उन्मादात इगोला सुखावत बसून स्वतःच्या मनाचं, विचारांचं किती विद्रुपीकरण करून घ्यायचं हा खरा प्रश्न आहे!
व्हर्च्युल जगात वावरताना मला राग का येतो? आला तर तो मी कसा व्यक्त करतो?
हे प्रश्न स्वतःला विचारून ‘ऑनलाईन एंगर मॅनेजमेंट’ नावाच्या एका अतिशय किचकट प्रवासाची सुरुवात आपल्याला करावी लागणार आहे. उत्तरं एका फटक्यात सापडतील असं नाही, पण उत्तरांच्या दिशेनं पहिलं पाऊल नक्कीच टाकावं लागेल..
(लेखिका पत्रकार आणि समाज माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)