गौरी पटवर्धन
आई म्हणजे त्यागमूर्ती, आई म्हणजे वात्सल्याचा झरा…या आणि अशा सुभाषितांनी आईपणाला कायमच करकचून बांधून ठेवलेलं आहे. आई म्हणजे माणूस असते. आईला तिच्याही काही गरजा आणि इच्छा असतात. असल्या विचारांचं वारंसुद्धा आयांपर्यंत पोचू नये याची काळजी हे आईपणाचं उदात्तीकरण करणारे कायम घेत असतात.आई, आणि खरं तर घरातली बाई यांची खरी किंमत त्या किती त्याग करतात यातच आहे अशी आपल्या समाजाची पक्की धारणा आहे. आणि हे त्याग करण्याचं भूत इतक्या विविध प्रकारांनी बायकांच्या मनात भरवलं जातं, की त्यात काही चूक आहे असं त्यांच्या मनातसुद्धा येत नाही. इतकंच नाही, तर कोणी जर का असं म्हंटलं की ‘बायकांनी सतत त्याग करू नये, थोडं स्वतःकडे लक्ष द्यावं.’ तर लोकांना लगेच संस्कृती बुडण्याची भीती वाटायला लागते. पण या त्यागाच्या अतिरेकामुळे बायकांचं विविध प्रकारे नुकसान होतं हे मात्र आपल्या लक्षात येत नाही.या त्यागाची रेंज नवऱ्याची बदली झाली म्हणून आपली उत्तम पगाराची नोकरी सोडून त्याच्या बरोबर दुसऱ्या गावी जाण्यापासून ते ताजं अन्न इतरांना वाढून आपण कायम शिळं ,उरलेलं आणि अपुरं जेवण्यापर्यंत असते. आणि एकदा त्याग हेच जगण्याचं सूत्र बनलं, की “माझं काय मेलीचं” हे आपलं स्टाईल स्टेटमेंट होऊन बसतं. आणि मग त्यातून आरोग्याच्या प्रश्नांची दुष्ट साखळी सुरु होते.आधी बाईने, त्यातही आईने इतरांना सकस आणि भरपूर खायला द्यायचं आणि आपण उरलेलं खायचं यातून पोषणाचे प्रश्न निर्माण होतात. वर्षानुवर्षं कुपोषण झाल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. हे कुपोषण आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्या शरीरात असतं. पण ते आपल्याला दिसत नाही ,लक्षात येत नाही, मोजता येत नाही आणि त्यामुळे ते जणू नाहीच आहे असं आपण गृहीत धरून चालतो. त्यात “माझं काय मेलीचं” असंच मनात असल्यामुळे इतर जीवनसत्त्व घेणं वगैरेचा तर विषयच नसतो. आणि मग तिशी ओलांडता ओलांडता अनेक बारीक बारीक आजार बायकांच्या राशीला लागतात. त्यात अगदी सारख्या होणाऱ्या सर्दी पडश्यापासून ते मधुमेह किंवा रक्तदाबपर्यंतच्या आजारांचा समावेश असतो. पण तरीही…बायका होता होईल तोवर डॉक्टरकडे जायचं टाळतात. त्यात आपल्यासाठी पैसे कशाला खर्च करायचे हा भाग असतोच, पण मूळ मुद्दा पैशांचा नसतो. मूळ मुद्दा हा असतो, आईने स्वतःचं दुखणं किंवा एकूणच स्वतःचं आयुष्य याला महत्व दिलं, तर लोक काय म्हणतील. त्याहीपलीकडे जाऊन, त्याग करणं तिच्या आयुष्याचा इतका पक्का भाग झालेला असतो, ते तिचं तिलाही पटत नाही.पण कितीही ठरवलं आणि टाळलं तरी कधी ना कधी डॉक्टरकडे जाण्याची वेळ येतेच. आणि आजार काहीही असो, डॉक्टर कोणीही असो, तो काही मूलभूत गोष्टी सांगतोच. उदाहरणार्थ थोडा तरी व्यायाम करा, चौरस आहार घ्या, जीवनसत्त्व आणि कॅल्शियम घ्या वगैरे वगैरे. आणि निदान आजारपण कमी होईपर्यंत आराम करा. विश्रांती घ्या.यातल्या आराम करा इतकं डेंजर वाक्य दुसरं नसेल. कारण घरातल्या बाईने आराम करावा हे सांगणं सोपं आहे, पण तो कसा करायचा हे सांगणं महाकठीण! कारण घरातल्या बाईने, आईने आराम करायचा म्हणजे ती करत असलेली कामं कशी होणार? एक तर ती करायची नाहीत किंवा दुसऱ्या कोणीतरी करायची. आणि हे दोन्ही पर्याय दुर्दैवाने बहुतेक सगळ्या घरांमधून असत नाहीत. घरातल्यांना आईच्याच हातच्या पोळ्या लागतात, इतर कोणाला पोळ्या करता येतच नाहीत, पोळ्यांशिवाय जेवण करता येत नाही, त्यातही एखाद्या वेळी ब्रेड चालतो, एखाद्या वेळी खिचडी (तीही आईनेच उठून धडपडत केलेली) चालते, पण हे आजारपण जर आठवड्यापेक्षा जास्त चालणारं असेल तर सगळ्या घरादाराची दैना होऊन जाते. आणि मग तीच वात्सल्यसिंधू, त्यागमूर्ती आई तशीच धडपडत उठते, निदान इतरांसाठी पोळ्या लाटते किंवा भाकरी थापते. आणि एकदा तिला ते करता येतंय म्हंटल्यावर ती ते करतच राहते. आणि मग तिचं आरोग्य आणि तिचं आजारपण हा विषय परत एकदा मागे पडतो…सध्या ऑक्सिजन नाकाला लावून पोळ्या करणाऱ्या एका माऊलीचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तो फोटो खरा आहे की खोटा हे महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे, की तो फोटो बघितल्यानंतर लोकांना त्यात काही चुकीचं वाटत नाहीये. तर त्या बाईचं प्रचंड कौतुक करून इतर बायकांकडूनही नकळत तीच अपेक्षा केली जाते आहे. कोणालाही असं वाटत नाहीये की ती करत असलेल्या कामाला काहीतरी पर्याय असला पाहिजे, आपण तो समाज म्हणून, आपली मानसिकता म्हणून विकसित केला पाहिजे. ऑक्सिजन लावलेल्या बाईने पोळ्या करणं आपल्याला छान वाटत असेल तर आपण किती पोकळ खोटारडे झालो आहोत याचा आपण प्रामाणिकपणे स्वतःशी विचार केला पाहिजे.करोनाने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. घरातली बाई आजारी पडली तर दोन आठवडे का असेना इतरांना तिची जागा घ्यायला भाग पाडलं आहे. आपल्यापैकी काही जण तरी त्यातून नक्की काही तरी शिकले आहेत. बाकीच्यांनी फार उशीर होण्यापूर्वी त्यातून योग्य तो बोध घ्यावा एवढीच अपेक्षा आहे.