डॉ. शिरीष सुळेमानसिक आरोग्याविषयी सर्वांच्याच मनात भीतीयुक्त कुतूहल असते. त्याचे मुख्य कारण म्हणजे साधारण ५० वर्षांपूर्वी मानसिक आजार म्हणजे फक्त माणूस विचित्र वागायला, बोलायला लागला की, तो वेडा झाला आहे, त्याची रवानगी वेड्यांच्या हाॅस्पिटलमध्ये करा, एवढाच एक मार्ग होता.हा आजार का व कसा होतो, याचे पुरेसे शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे अंधश्रद्धा जास्त फोफावलेली होती. ‘देवाचं झालंय’, ‘बाहेरचं झालंय’, ‘कुणीतरी जादूटोणा केलाय’ असे म्हणून कुटुंबातील लोक त्या व्यक्तीच्या उपचाराची जबाबदारी झटकत असत. मानसिक आरोग्य म्हणजे फक्त आजारावर उपचार एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले. नैराश्य किंवा डिप्रेशन आले तर ‘तुला काय कमी आहे!’, ‘आम्ही आहोत ना!’, ‘असले विचार काढून टाक’ असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष होत असे.पण, जसजसा काळ पुढे सरकला तसतसे या आजारांची शास्त्रीय विश्लेषणे समजू लागली आहेत. या आजारांकडे सायको-सोशल-बायोलाॅजिकल दृष्टीने पाहण्यास सुरुवात झाली आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे फक्त आजारांवर उपचार (ट्रीटमेंट ऑफ डिसिजेस) एवढेच न राहता मानसिक ताण (डिस्ट्रेस) व मनोविकास (डेव्हलपमेंट) याचाही विचार आता केला हाेता.उपजत स्वभावामुळे, परिस्थितीमुळे, तसेच बालपणापासून असलेले गैरसमज व झालेले संस्कार यांमुळे समोर आलेल्या प्रसंगांचा व्यवस्थित सामना करता आल्यामुळे ताणतणाव निर्माण होतात. उदा. परीक्षा किंवा इंटरव्ह्यू जवळ आल्यावर पूर्ण तयारी असूनदेखील एवढा तणाव निर्माण होतो की, काही मुले ड्राप घेतात किंवा त्यांच्या परफाॅर्मन्सवर परिणाम होतो. नवरा-बायकोमध्ये संवादाने प्रश्न सोडविण्याऐवजी एकमेकांना दोष देत त्या प्रसंगाचे पर्यवसान भांडणात होते.वरील प्रसंगात गोळ्या-औषधांपेक्षा आपलं कुठे चुकतंय, मी या प्रसंगात काय करू शकतो, दुसऱ्याला दोष देऊन प्रश्न सुटणार नाही; तसेच समोरची व्यक्ती बदलली नाही (विचाराने) तर मी काय करू शकतो, या गोष्टींची उकल समुपदेशनाने (काउन्सलिंग) केल्यास त्याचा फायदा होतो.(डेव्हलपमेंटल सायकॅस्ट्री) मनोविकास म्हणजे निसर्गाने जन्मत: दिलेल्या बुद्धीचा, शक्तीचा व कौशल्यांचा (स्किल्स) योग्य वेळेत व जास्तीत जास्त उपयोग करून उत्तम यश मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न!ते कसे जमायचे?
हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक पायरीला स्पर्धा असते मग ती अभ्यासात असो, विविध खेळांमध्ये असो, करिअरमध्ये असो वा नोकरी, व्यवसायात असो; या स्पर्धांमध्ये शारीरिक व बौद्धिक क्षमतेइतकीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त मानसिक क्षमता महत्त्वाची असते. या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला तयारी करणे भाग आहे, त्यातून सुटका नाही! हल्ली तर लाइफ पार्टनर शोधतानाही स्पर्धेला तोंड द्यावे लागते.थोडक्यात, या स्पर्धांसाठी आपली तयारी करणे म्हणजे मनोविकास! यासाठी आपल्यातील गुण व दोष पारखणे महत्त्वाचे असते.उदा.- एखादा मुलगा परीक्षेत नापास होत असेल तर त्याची बुद्धी कमी असू शकते किंवा त्याला शारीरिक व्यंग (दृष्टिदोष, बधिरपणा) असू शकते, तसेच त्याला मानसिक व्यंगही असू शकते. उदा.- अतिचंचलपणा किंवा डिस्लेक्सिया. असे मूल अभ्यासात मागे पडल्यामुळे स्वत:ला कमी लेखू लागते. लो सेल्फ एस्टीम. चिडचिड होते, पालकांना त्याच्या वर्तणुकीतला बदल लक्षात येतो; पण मुलांचा प्रश्न नक्की कसा सोडवायचा, हे पालकांना समजत नाही.अशा केसेसमध्ये फक्त त्या मुलांचे उपचार पुरे पडत नाहीत. तर त्याच्या पालकांना व सर्व समाजालाही अशा समस्यांबद्दल शास्त्रीय माहिती देणे गरजेचे ठरते. अशा मुलांसाठी स्पेश्ल टीचर्स, एज्युकेटर्सच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतात. जेणेकरून ही मुले समाजात सर्वसामान्य मुलांप्रमाणे वावरू शकतात.स्पर्धा वाढल्यामुळे व हल्ली एक किंवा दोनच मुलं असल्याने, पालकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या असतात.पालकत्व नैसर्गिक आहे, त्यात काय शिकायचे, ‘चिमण्या-कावळेपण मुलांना वाढवतात’ अशी भावना ठेवण्यापेक्षा पालक शाळेसारख्या उपक्रमांमध्ये सामील होऊन नवीन शास्त्रीय माहिती मिळवणे, पूर्वीसारखे डाॅक्टर, इंजिनिअर पुरते सीमित न राहता करिअरमधले विविध उपलब्ध पर्याय माहिती करून घेणे, तसेच आपल्या मुलांना कोणता पर्याय योग्य ठरेल या चाचण्या-ॲप्टिट्यूड टेस्टविषयी मार्गदर्शन घेणे हे महत्त्वाचे ठरते. मुलांची बुदधी, आवड, स्वभाव याचा सर्वांगीण विचार करून त्याचे करिअर ठरविणे महत्त्वाचे असते. चांगल्या प्रशिक्षित व अनुभवी समुपदेशकाकडून पाल्याची चाचणी करून त्याला योग्य व्यवसायाची निवड करण्यास मदत केली तर भावी आयुष्यातले ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल.तरुण वयात मुलांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होतात; तसेच प्रचंड ऊर्जा असते. तिला योग्य दिशा मिळणे महत्त्वाचे असते. नाहीतर हुशार मुलेसुद्धा वाईट संगतीमुळे व्यसनांकडे वळतात. त्यांची सामाजिक, शारीरिक, मानसिक वैचारिक वाढ योग्य दिशेने होणे जरूरीचे असते. यासाठी हल्ली मुलांसाठी विविध प्रकारचे गट उपलब्ध होऊ लागले आहेत. ज्यात त्यांच्यातील ऊर्जेला योग्य ते वळण शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शकांच्या मदतीने देता येते.मुलांच्या बाबतीतील एक महत्त्वाचे अंग म्हणजे खेळ! हल्ली खेळांमध्येसुद्धा प्रावीण्य मिळविताना स्पर्धेला तोंड द्यावे लागते व त्यासाठी त्यांच्या शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक तयारीही तितकीच महत्त्वाची असते. म्हणून हल्ली सर्व टीम्समध्ये स्पोर्ट्स सायकाॅलाॅजिस्ट असतात.कुटुंबातील ताण-तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे.
(लेखक ५० वर्षांहून अधिक काळ कार्यरत मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)