सध्याच्या काळात प्रत्येकालाच ताण तणावाच्या स्थितीचा सामना करावा लागत आहे. आर्थिक बाबी, घरातील कामं, वाढत्या अपेक्षांच्या ओझ्याखाली प्रत्येकजण असतो. यामुळे जीवनाचा आनंद मनासारखा घेता येत नाही. याशिवाय अतिरिक्त ताणामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात ते वेगळंच! प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षितचे पती कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. श्रीराम नेने यांनी ताण तणाव दूर करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. काही दिवसांपूर्वी यूट्यूबवर ताण घालवण्याच्या मार्गांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात डॉ श्रीराम नेने म्हणत होते की, तणावामुळे शरीरात बदल होऊन आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यांनी असे ७ उपाय सांगितले आहेत ज्याद्वारे तणाव टाळता येतो.
ताण तणाव टाळण्याचे उपाय
झोप घेणं
प्रौढांनी किमान ७-९ तासांची झोप घ्यायला हवी तर मुलांना १० तास किंवा त्याहून अधिक झोपेची आवश्यकता असते.सध्या मोबाईलच्या वापरामुळे प्रत्येकजण रात्री जास्तवेळ जागत बसतो. झोपेच्या कमतरतेमुळे देखील तुम्हाला तणाव येतो, त्यामुळे पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
व्यायाम करायलाच हवा
रोज व्यायाम केल्यानं मूड चांगला राहतो. दिवसभरातून ३० मिनटांसाठी चालणं आणि व्यायाम करणे शरीरासाठी लाभदायक ठरतं. यामुळे एंडोर्फिन आणि डोपामाइन जनरेट होतात. हे हार्मोन्स प्रेरणा आणि मानसिक एकाग्रतेसाठी फायदेशीर ठरतात.
पॉझिटिव्ह थिंकिंग
तुम्ही जसे विचार करता तेच तुमच्याबाबतीत घडते. अर्थात चांगले विचार केल्याने चांगले घडते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. तुम्ही एका दिवसात जे काही साध्य कराल ते सकारात्मकतेने स्वीकारा. आपल्याला जे काही करता आलेलं नाही त्यावर लक्ष केंद्रित करू नका.
मेडिटेशन करायला हवं
डॉ श्रीराम नेने यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही पाच सेकंद दीर्घ श्वास घ्या, आणि रोखून धरा आणि नंतर श्वास सोडा. असे केल्याने तुम्हाला ताजंतवानं वाटेल. तसंच हृदयाची गती कमी करण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी तुम्ही नेहमी ध्यान करा. यामुळे मन आणि शरीर दोन्ही चांगले राहतात.
महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या
सगळ्यात आधी महत्वाच्यां गोष्टींकडे लक्ष द्या यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जी कामे फार महत्त्वाची नाहीत त्याकडे लक्ष देऊ नका.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण येत असेल तर मानसोपचार तज्त्रांचा सल्ला घ्या. कारण तज्ञ तुम्हाला योग्य सल्ला आणि उपचार देण्यास सक्षम असतील. तणावावर मात करण्यासाठी हे उपाय नियमित केल्यानं तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल.