एकाच वेळी अनेक काम करु शकते ती स्त्री अशा शब्दात बायकांचं, त्यांच्यातल्या मल्टिटास्किंगचं कौतुक केलं जातं. पण प्रत्यक्षात सुपर वुमन म्हणून घेणारी स्त्री एकाच वेळी घर, ऑफिस, मुलांच्या जबाबदाऱ्या, जेष्ठांची आजारपणं सांभाळतांना मेटाकुटीस येते. अनेक पातळीवर एकाच वेळी धावपळ करावी लागत असल्याने सुपर वुमन म्हणून घेणारी स्त्री खरंतर खूप थकलेली असते. पण याकडे ना तिचं स्वत:चं लक्ष असतं ना इतरांचं. पण मानसोपचार तज्ज्ञांचं मात्र याकडे पूर्ण लक्ष असून महिलांनी या सुपर वुमन सिंड्रोम पासून सावध असायला हवं असा सल्ला तज्ज्ञ महिलांना देतात.
सुपर वुमन सिंड्रोमबद्दल मानसोपचार तज्ज्ञ, अभ्यासक काय म्हणतात हे समजून घेतल्यास डोक्यातील सुपर वुमन सिंड्रोमचं भूत काढून टाकलेलंच योग्य हे वाटल्याशिवाय राहाणार नाही. एकाच वेळी अनेक कामात गुंतलेल्या महिलांना सुपर वुमन सिंड्रोम होतो असं तज्ज्ञ सांगतात. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर सुपर वुमन सिंड्रोममुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या भविष्यात गंभीर रुप धारण करतात.
Image: Google
सुपर वुमन सिंड्रोम काय आहे?
कौटुंबिक , व्यावसायिक जबाबदाऱ्या यांचं ओझं एकाच वेळेस वाहाणाऱ्या महिलांना सुपर वूमन सिंड्रोम होतो. सर्व प्रकारच्या कामांमध्ये या महिला इतक्या गुंतलेल्या असतात की स्वत:साठी थोडाही वेळ काढू शकत नाहीत. दिल्लीस्थित प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डाॅ. धर्मेंद्र सिंह म्हणतात की कामांच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यानं , त्यातून होणाऱ्या धावपळीमुळे एकही काम धड होत नाही. ठरवलेलं उद्दिष्ट्य साध्य होत नाही. अशी परिस्थिती ज्या महिलांच्या बाबतीत निर्माण होते त्या महिलांना सुपर वुमन सिंड्रोम ग्रासतो असं डाॅ.धर्मेंद्र सिंह म्हणतात.
सुपर वुमन सिंड्रोम निर्माण होण्यास छोटी मोठी कोणतीही गोष्ट कारणीभूत ठरते. एकदा का हा सुपर वुमन सिंड्रोम निर्माण झाला आणि त्याकडे दुर्लक्ष झालं तर चिंता, नैराश्य या मानसिक समस्याही निर्माण होतात. अशा परिस्थितीत महिला प्रत्येक गोष्टीला स्वत:लाच जबाबदार मानतात. स्वत:चा दोष नसला तर प्रत्येक चुकीच्या गोष्टीला स्वत:लाच दोष राहातात.
Image: Google
सुपर वुमन सिंड्रोमची लक्षणं
सुपर वुमन सिंड्रोम् हा विशिष्ट वयातील महिलांनाच होतो असं नाही. कोणत्याही वयातील महिलांना हा आजार होतो. हा आजार झाल्याची लक्षणं सामान्य वर्तनातूनही दिसून् येतात. त्याकडे महिलांनी स्वत: आणि इतरांनीही दुर्लक्ष करु नये असं डाॅ. धर्मेंद सिंह म्हणतात.
1. प्रत्येक अपयशाला, चुकीच्या गोष्टीला, वाईट घटनेला, समस्येला स्वत:ला जबाबदार धरणं.
2. आपण , आपलं काम परिपूर्णच असायला हवा असा स्वत:बाबत आग्रह धरणे.
3. स्वत:चं कौतुक ऐकायला मिळावं म्हणून काम करत राहाणं.
4. इतरांचं लक्ष स्वत:कडे आकर्षित करणं.
5. निराश, उदास वाटणं.
6. सतत डोक्यावर कामाचं ओझं असणं. कामाच्या दबावात स्वत:कडे लक्ष देता न येणं.
Image: Google
का होतो सुपर वुमन सिंड्रोम?
कामाचं न पेलवणारं ओझं, सतत इतरांना आनंदी ठेवणं, इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं, घर, घरानंतर ऑफिस, ऑफिसनंतर पुन्हा घर, कौटुंबिक जबाबदाऱ्या या चक्रात अडकलेल्या महिलांना सुपर वुमन सिंड्रोम ग्रासतो. अभ्यासक आणि तज्ज्ञ सांगतात की सेरोटोनिन हार्मोन कमी झाल्यास महिलांमध्ये ताण वाढून सुपर वुमन सिंड्रोमची समस्या वाढते.
Image: Google
सुपर वुमनपासून स्वत:ला कसं दूर राखावं?
1. डाॅ. धर्मेन्द्र सिंह म्हणतात, की सुपर वुमन सिंड्रोमपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी महिलांनी आपल्या आयुष्यातले प्राधान्यक्रम ठरवायला हवेत. आपल्या दिनक्रमातले प्राधान्यक्रम, त्याचं वेळापत्रक आखता यायला हवं.
2.रोजच्या कामात स्वत:ला पुरेसा वेळ देता येणं जमायला हवं.
3. रोज व्यायाम करणे, थोडा वेळ ध्यानधारणा करणं, संतुलित आहार घेऊन आरोग्य नीट राखता आल्यास सुपर वूमन सिंड्रोम समस्येपासून दूर राहाता येणं शक्य आहे.