आपल्या रोजच्या आयुष्यातल्या घटना, कामं, कामांचा दबाव यामुळे मनावर सतत ताण येत राहातो. ताण ही क्रियेची प्रतिक्रिया असली तरी अनेकांच्या बाबतीत ताण ही कायमस्वरुपाची बाब होते. ताण तणाव ही गंभीर समस्या असून यामुळे शारीरिक समस्यांसोबतच वर्तन समस्याही निर्माण होतात. शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या ताणाचं व्यवस्थापन जमलं तर ताणामुळे निर्माण झालेले शारीरिक आणि मानसिक आजार बरे होण्यास मदत होते. ताण व्यवस्थापन हा आनंदी जगण्याचा मार्ग आहे. ताण व्यवस्थापन म्हणजे ताण हाताळता येणं, ताणाच्या परिस्थितीतही मानसिक संतुलन न ढळू देता स्थिर राहाणं. ताण व्यवस्थापन हे एक आवश्यक जीवनकौशल्य असून ते छोट्या छोट्या गोष्टी केल्यास सहज जमू शकतं असं आयुर्वेद तज्ज्ञ डाॅ. दीक्षा भावसार सवलिया सांगतात.
Image: Google
ताण व्यवस्थापन का महत्वाचं?
डाॅ. दीक्षा भावसार सवलिया यांच्या मते ज्ञात- अज्ञात अशा अनेक रोगांच्या बाबतीत तणावाची भूमिका मोठी असते. मधुमेह, थायराॅइड, स्थूलता, एंडोमेट्रियोसिस , हार्मोनल इम्बॅलन्स, वंध्यत्व, पाळीसंबंधी समस्या, अल्सर, कोलायटिस, आतड्यांचे आजार, पचनाचे विकार, भीती, मायग्रेन या समस्या निर्माण होण्यात तणाव कारणीभूत ठरतो. त्यामुळेच तणाव व्यवस्थापन जमणं आवश्यक आहे. तणाव व्यवस्थापन जमल्यास पोटाच्या समस्या, पचनाचे विकार, हार्मोनसंबंधी समस्या बऱ्या होण्यास मदत होते. तणाव व्यवस्थापनानं वजन नियंत्रित राहातं. तणाव व्यवस्थापनानं संधिवात, त्वचेसंबंधी विकार, शरीरावर सूज यासरख्या समस्यांची तीव्रता आणि धोका कमी होतो. ताण व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे. ते जमण्यासाठी कोणता क्लास किंवा प्रशिक्षणाची गरज नाही. डाॅ. दीक्षा ताण व्यवस्थापनाचे, ताण कमी करण्याचे सोपे मार्ग सांगतात.
Image: Google
ताण कमी करण्यासाठी
1. एक सलग काम केल्यानं शरीरावर आणि मनावर ताण येतो. काम करताना छोटे छोटे ब्रेक घेऊन थोडा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात जाणं, मोकळा श्वास घेणं आवश्यक आहे. या छोट्याशा कृतीतून , निसर्गाच्या जवळ जाण्यातून आपण स्वत:च्या जवळ येतो त्याचा आलेला ताण निवळण्यास उपयोग होतो.
2. ताण आलेला असल्यास आपल्या आवडीचं काहीतरी काम करावं. असं काम ज्यातून आपल्याला आनंद मिळतो, जे काम मनापासून करावसं वाटतं. आपल्या आवडीचं काम करायला मिळाल्यास छान वाटतं आणि ताण निघून जातो.
3. मनावर आलेला ताण घालवण्यासाठी आपल्या जवळच्या आणि आवडत्या व्यक्तींसोबत थोडा वेळ फोनवर बोलावं. शक्य असल्यास त्यांना भेटावं. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्याशी हसत खेळत गप्पा मारणं हा ताण घालवण्याचा सोपा उपाय आहे. यामुळे चित्तवृत्ती प्रसन्न होतात.
4. रोज व्यायाम केल्यास रोजच्या जगण्यातील ताण हाताळण्याचं बळ मिळतं. व्यायामामुळे शरीर आणि मनावरचा ताण दूर होतो. व्यायामासोबतच ध्यानधारणा केल्यास मनातल्या नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतात. मनात चांगले विचार येतात. व्यायाम आणि ध्यान यामुळे तणाव निर्माण करणारं काॅर्टिसाॅल या हार्मोनचा प्रभाव कमी होवून शरीरात हॅपी हार्मोन्स स्त्रवतात.
Image: Google
5. ताण आलेला असल्यास लक्ष ताणाच्या गोष्टीवरुन दुसऱ्या गोष्टीकडे वळवण्यासाठी घरातली आवरा आवरी करणं, कपाट नीट नेटकं करणं, स्वयंपाक करणं किंवा थोडं बागकाम करणं ही कामं उपचारासारखी काम करतात. भौतिक स्वरुपातल्या गोष्टी नीट नेटक्या करण्यानं भावनात्मक व्यवस्थापनाला चालना मिळते.