Lokmat Sakhi >Mental Health > माझं टॅलण्ट मी का वाया घालवू? -आपली गुणवत्ता नेमकी कशात दिसते आणि कुठं कमी पडते?

माझं टॅलण्ट मी का वाया घालवू? -आपली गुणवत्ता नेमकी कशात दिसते आणि कुठं कमी पडते?

टॅलण्ट-गुणवत्ता दाखवावी लागत नाही ती छोट्याछोट्या गोष्टीतून दिसतेच, प्रश्न असा आहे की आपण खरंच गुणवान आहोत की लोकांना दाखवण्यापुरतं शो-शा करतो? -प्रभात पुष्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 03:36 PM2022-08-19T15:36:19+5:302022-08-19T15:38:55+5:30

टॅलण्ट-गुणवत्ता दाखवावी लागत नाही ती छोट्याछोट्या गोष्टीतून दिसतेच, प्रश्न असा आहे की आपण खरंच गुणवान आहोत की लोकांना दाखवण्यापुरतं शो-शा करतो? -प्रभात पुष्प

talent- hard work and quality of life, how your own personality reflects it-prabhatpushpa | माझं टॅलण्ट मी का वाया घालवू? -आपली गुणवत्ता नेमकी कशात दिसते आणि कुठं कमी पडते?

माझं टॅलण्ट मी का वाया घालवू? -आपली गुणवत्ता नेमकी कशात दिसते आणि कुठं कमी पडते?

अश्विनी बर्वे

टेबलावर अस्ताव्यस्त पडलेले कागद. उघडे कपाट, त्यात कशातरी कोंबलेल्या फाईल. असं जर कोणाच्या ऑफिसमध्ये दिसलं तर काय वाटेल आपल्याला? पण काही लोकांना याबाबतीत टोकलं तर ते म्हणतात, माझ्यात गुणवत्ता आहे ना? मग माझे काम पहा. एवढ्याने भागतं? नीटनेटक्या वस्तू ठेवणे हा पण कामाचा एक भाग असतो हे त्यांना मान्यच नसतं. एक व्यक्ती भेटली आणि कोणीतरी ओळख करून दिली. तिच्या कामाचे कौतुक केले. आणि त्या व्यक्तीने सांगितले की तिची आई नुकतीच हॉस्पिटल मधून घरी आली आहे, ती आजारी होती. तिला सहज म्हंटलं, “आई नुकतीच दवाखान्यातून घरी आली आहे तर तिला तू भरपूर मदत करत असशील.” तर ती लगेच म्हणाली,’ का? दुसरं काही करण्यासारखे नाही का? घरात काम करण्याइतका वेळच नाही मला. माझ्यात गुणवत्ता आहे, ती मला दाखवण्याची संधी असतांना मी मदत वगैरे कशाला करू?
मग आजारी आईसाठी डबा लावला का?
नाही. ती मॅगी करून खाते. हलकी असते ती पचायला.
ऐकून समजेना काय बोलावं? मी तर आजपर्यंत समजत होते की, गुणवत्ता ही मार्कांमध्ये नसते. ती जीवनातल्या बारीक बारीक गोष्टी मध्ये असते. असायला हवी.

(Image : google)

आमच्या ऑफिस मध्ये एक व्यक्ती आली होती. त्यांचे  शिक्षण चांगल्या विद्यापीठात झाले होते. ते आमच्या कामातली गुणवत्ता कशी वाढवायची यावर व्याख्यान देणार होते. ते त्यांच्या कार मधून आले होते. सगळा कार्यक्रम आटोपून आम्ही त्यांना निरोप द्यायला कार पर्यंत गेलो तर मला धक्का बसला. कारण मी हातात मोजे घालून सुद्धा त्याच्या कारला हात लावू शकत नव्हते. कारच्या जवळ जावून आत डोकावून पहिले तर कारमध्ये कचरा साठलेला होता, कागदाचे तुकडे इतस्ततः पडलेले होते. हा माणूस लेक्चर देणार होता आणि ते ही गुणवत्ते वर?      
एका समाजसुधारक जोडप्याने आम्हांला त्यांच्या घरी बोलावले होते. सहज गप्पा मारायला म्हणून. ते पर्यावरणावर काम करत होते. आम्ही काही पत्रकार तिथे गेलो. तेव्हा त्यांच्या घरात कुबट वास येत होता. काहींनी नाकाला रुमाल लावला तर ज्या व्यक्तीने मिटिंग बोलावली होती ती व्यक्ती म्हणाली, “ अहो दोन चार दिवसाचे कपडे भिजत पडले आहेत त्याचा वास येत आहे.” आता त्या गिळगिळीत झालेल्या कपड्यांसाठी जादा पाणी नाही का लागणार? तिथेच बाजूला खरकटी भांडी ठेवलेली होती, त्यातील अन्न निगुतीने काढलेले नव्हते. ते तसेच भांड्याला चिकटलेले होते. दुधाच्या पातेल्याला साय तशीच चिकटून होती. हे अन्न सुद्धा पर्यावरणासाठी योग्य असेल का? आम्ही जागतिक दर्जाच्या गप्पा मारल्या पण कोणीच त्यांच्याबद्दल लिहायला तयार झाले नाही. असं का? घरातलं पर्यावरण बिघडले तरी चालणार होतं का? माहित नाही.

(Image : google)

मला असं वाटतं की आपल्याला हे माहित पाहिजे की गुणवत्ता ही आतूनच सुरु होते आणि मग ती बाहेर दिसते.  गुणवत्तेबद्दलची स्वतःची जाणीव हीच तुमच्याकडून इतर कोणापेक्षा अधिक अपेक्षा करत असते. तुमच्या दर्जाबाबतची तुमची  जाणीवच जगाने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा उच्च असायला हवी. गुणवत्तेची जाणीव म्हणजे एक प्रकारचा असा विश्वास असतो, की त्यामुळे आपल्याला वाटते की सगळ्या गोष्टीत सुधारणा होवू शकते. गुणवत्ता तुमच्या मोज्याला छिद्र नसणे, तुमच्या घराची दारं करकरत नसणे, घरातील सगळी घड्याळे एकच वेळ दाखवत असणे, घरातील गाद्यामधून कापूस बाहेर डोकावत नसणे, घाणेरडे पंखे, भिंतीवर जाळी नसणे, गळणारे नळ नसणे, फोन पटकन उचलला जाणे, भिंतीवरचा रंग उडून पापुद्रे निघालेले नसणे,वाशरूम स्वच्छ असणे आणि तुमच्या घराचे लॅच काम करत असणे. या सगळ्या गोष्टी सुद्धा गुणवत्तेत मोडतात. हे सगळं मी एका मध्यमवर्गीय माणसाच्या घराबद्दल बोलते आहे हे मला माहित आहे. कारण वस्तीतली सामान कमी असणारी नीटनेटकी घरं मी महाराष्ट्रभर पाहिली आहेत.
गुणवत्तेच्या  उपस्थितीची क्वचितच नोंद घेतली जाते पण तिच्या अनुपस्थितीची मात्र जोरदार दखल घेतली जाते. संपूर्ण क्षेत्रातील बारीकसारीक गोष्टीमधील गुणवत्तेची नोंद काहीवेळेस घेतली जातही नसेल, पण ती असणं गरजेचे आहे. फुल हे फुल असते पण त्याचा सुवास मात्र त्याला इतरांपेक्षा वेगळा करतो. गुणवत्ता ही अशी अदृश्य ताकद आहे जिच्या उपस्थितीमुळे गोष्टी वेगळ्याच दिसू लागतात.

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: talent- hard work and quality of life, how your own personality reflects it-prabhatpushpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.