प्राची पाठक
टेंशन कशाला घेते, काही लागलं तर सांग असं दुसऱ्याला सांगणं सोपं. पण टेंशन येतंच.अशावेळी सल्ले नको नीट ऐकून घेणारे कोणी हवे असते. अगदी एकटं पडल्याची भावना मनात येते. त्यात आपल्याला आपले प्रश्न, आपल्या समस्या नेमक्या बोलता येण्याची एरवीही सवय नसते. शब्दांत मांडायला गेलो, तर आणखीन काही भलतेच वाद सुरु होतील, असे वाटत असते.पण मग अशावेळी काय करायचं?
१. कोणत्या गोष्टीने आपल्याला टेन्शन आलेलं आहे, ते नीटच नव्याने मांडायचं. अगदी कागदावर लिहून काढायला हरकत नाही. हा खूप जगावेगळा काही प्रॉब्लेम आहे का, ते आधी स्वतःला विचारायचे. प्रामाणिक उत्तरे द्यायची. आपला प्रॉब्लेम जगावेगळा नाही, हे कळले, तरी खूप दिलासा मिळतो. २. एखाद्या खेळाचे जसे नियम असतात, तसे ह्या प्रॉब्लेमचे देखील काही नियम आहेत. काही मर्यादा आहेत, काही रुल्स आहेत आणि काही आव्हाने आहेत, असा पट मांडायचा. त्यातून आपल्याला तरून जायचे आहे, हे पक्के ठरवायचे.३. "करू शकते हे मी", हे स्वतःला सांगायचे. आपल्या विचार पद्धतीवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी ती विचार पद्धती बदलली जराशी, तरी समस्या म्हणून अंगावर येत नाहीत. त्या सुसह्य वाटू लागतात. ४. कोण आपल्याशी कसे वागले/वागते ते आपल्या हातात नाही. आपण आपल्याशी कसे वागतो, ते आपल्या हातात नक्कीच असते. म्हणून आपल्या वागण्यावर आपण काम करायचे. अगदी मन लावून. आपल्या चुका शोधायच्या. आपली बलस्थाने शोधायची.५. टेन्शन आल्यावर आपल्या शरीरात काही वेगळे बदल जाणवत आहेत का, ते विचारायचे स्वतःला. ते कितपत गंभीर आहे, त्याची माहिती तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यायची. आपला रोजचा दिवस कसा असतो, ते स्वतःला सांगायचे. ६. शरीराची गाडी रिझर्व्ह पेट्रोलवर आपण ढकलत असतो अनेकदा. त्यात व्यायाम आणि आहार कसा आणि किती आहे, ते जरी चांगले जुळवून आणले, तरी हताश वाटणे कमी होते. लढायची ताकद वाढते. स्वयंसूचना नीट काम करू लागतात. श्वासाचे तंत्र आपण शिकून घेतो. खोल श्वासाची मजा कळू लागते. ७. काय काय केले म्हणजे आपला ताण कमी होतो, ते आपले आपल्याला कळते. सहजच कोणाशी बोललो आणि बोलून- भेटून बरे वाटले, असे कोणीही आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊ शकते. त्या व्यक्ती अगदी रोजच्या मैत्रीतल्या, कायम भेटणाऱ्या नसल्या तरी चालते. अगदी सहजच वाटेत भरणारे कोणीही आपल्यातली मरगळ केवळ एका छोट्याश्या हवापाण्याच्या गप्पांमधून घालवू शकते. नवीन विश्व कळते. ८. आपल्याला गाणी ऐकून बरे वाटते की फिरायला जाऊन की वेगळे काही शारीरिक कष्टाचे काम करून ते विचारायचे स्वतःला आणि करायचे. मन लावून करायचे. मस्त एखादी डिश स्वतःसाठी केली की फ्रेश होतो आपण की काही छोटीशी खरेदी करून, घरातली रचना बदलून, तो ही विचार करायचा.९. आपली गाडी आपल्यालाच चालवायची आहे, हे एकदा पक्के केले मनाशी की आपण आपलेच ऐकायला लागतो. रुतलेल्या गाडीला चिखलातून बाहेर काढतो. ताण पळून जातो मग आणि आव्हान घेऊन काहीतरी करून दाखवायची ऊर्जा वाढते.१०. म्हणूनच स्वतःशी बोलून बघा.
( लेखिका मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्म जीवशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)