Lokmat Sakhi >Mental Health > संजय दत्तचं पोस्टर आणि होस्टेलमधल्या एकेकट्या चेहऱ्यांची गोष्ट; ती कशी विसरुन जायची?

संजय दत्तचं पोस्टर आणि होस्टेलमधल्या एकेकट्या चेहऱ्यांची गोष्ट; ती कशी विसरुन जायची?

होस्टेलच्या काळातलं जगणं आयुष्यभराच्या आठवणी देतात. कुणाचा चेहरा आठवतो, कुणाचा आठवला की फक्त वेदनाच होतात.. (प्रभातपूष्प)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2022 06:54 PM2022-09-07T18:54:05+5:302022-09-07T18:55:58+5:30

होस्टेलच्या काळातलं जगणं आयुष्यभराच्या आठवणी देतात. कुणाचा चेहरा आठवतो, कुणाचा आठवला की फक्त वेदनाच होतात.. (प्रभातपूष्प)

The poster of Sanjay Dutt and the story of the lonely faces in the girl hostel -prabhatpushpa | संजय दत्तचं पोस्टर आणि होस्टेलमधल्या एकेकट्या चेहऱ्यांची गोष्ट; ती कशी विसरुन जायची?

संजय दत्तचं पोस्टर आणि होस्टेलमधल्या एकेकट्या चेहऱ्यांची गोष्ट; ती कशी विसरुन जायची?

Highlightsसुरक्षेची विविध साधनं आली तरी आपण आतून अधिक मजबूत आणि उदार होत आहोत ना?

अश्विनी बर्वे

तुमच्या चेहऱ्यावरून तुमचे मन वाचता येते. चेहऱ्यावरून लोक भविष्य सांगतात. त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. तिचा चेहराच पडला. असं आपण सारखं येता-जाता चेहऱ्यावरून बोलत असतो आणि स्वतःच्या चेहऱ्यावर हात फिरवत असतो. ज्याला दाढी असते तो दाढी कुरवाळतो, ज्याला मिशी असते तो मिशी सारखी करतो. ज्याला दोन्ही नसेल तो स्वतःच्या गालावरून हात फिरवतो. स्त्रिया घाम पुसतात, स्वतःच्या गालावरून हात फिरवतात, कानातलं नीट करण्याच्या बहाण्याने गालावरून हात फिरवतात. स्वतःचा चेहरा नीट ठेवण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करत असतो.
असं हे सगळं चेहरापुराण सांगायचं कारण म्हणजे माझं होस्टेल. मी आठवण म्हणून माझ्या होस्टेलमध्ये गेले आणि मला आमच्या गंमतीजंमती आठवल्या. आम्ही सगळ्याजणी नोकरी करणाऱ्या होतो. आमच्यापैकी बऱ्याचजणींना सकाळी दहा वाजता ऑफिस गाठायचं असायचं . त्यामुळे आमची धावपळ व्हायची . त्यात काही अशा मुली होत्या, की त्यांना सकाळी सकाळी विशिष्ट मुलीचाच चेहरा पहायचा असायचा. म्हणजे त्यांचा दिवस चांगला जाईल असा त्यांना विश्वास वाटे. त्यामुळे त्या रूम मधून बाहेर पडतांना टॉवेल घेवून बाहेर पडायच्या. आपल्याला हवा तो चेहरा समोरून येतोय असं दिसलं की, त्या त्या चेहऱ्याकडे बघून हसायच्या आणि मगच पुढचं आवरायला घ्यायच्या. काहीजणी तर तो चेहरा ज्या रूम मध्ये राहतो तिथलं दार ठोठवायच्या .तीच मुलगी दार उघडायला आली तर बरं नाहीतर पंचाईत व्हायची. अशा खूप गंमतीजंमती होस्टेल मध्ये चालायच्या .

(Image : Google)

आमच्या बरोबर जरा प्रौढ बाई राहत होत्या. त्यांना संजय दत्त फारच आवडायचा. त्यामुळे त्यांनी संजय दत्तचे मोठं पोस्टर लावून ठेवले होते. त्यामुळे उठल्यावर संजयचा हसरा चेहरा त्यांना दिसायचा. मग त्या खुश होत असत. त्यांनी त्यांचा प्रश्न असा सविनय सोडवला होता. त्यांना अंघोळीला मात्र वेळ लागत असे. त्यांनी बाथरूम अडवून ठेवू नये व लवकर बाहेर यावे म्हणून आम्ही, ज्यांना घाई आहे अशा तिथेच गप्पा मारत बसायचो. त्यात मुद्दाम संजय दत्तचा उल्लेख करायचो. मग कधी त्याची गाणी लागली आहेत, सिनेमा लागला आहे, अशा चाटा मारत असायचो. आतली कडी उघडण्याचा आवाज यायला लागला की पटकन पळून जायचो. त्या बाई टीव्हीरूम मध्ये जावून बघायच्या की खरंच गाणी लागली आहेत की नाही तोपर्यंत आम्ही बाथरूम गाठत असू. 
आम्ही त्यांची अशी गंमत करत असू पण त्यांनी आमच्यावर खूप माया केली. आम्ही कामावरून जर कधी उशिरा आलो तर त्या आमचे वाळलेले कपडे गोळा करून आणून ,व्यवस्थित घडी करून ठेवायच्या. आम्ही थँक यू म्हटलं तर त्या म्हणायच्या, ‘एक संजय दत्तचा सिनेमा दाखव म्हणजे झालं.’असं म्हणतांना त्या खूप गोड हसायच्या. त्यावेळी त्यांचा चेहरा पाहत रहावा इतका देखणा दिसायचा. अशावेळी मला बोरकरांच्या कवितेची ओळ आठवायची, ‘देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे’आम्ही त्यांच्या पेक्षा वीस वीस वर्षाने लहान होतो. त्यांचं दुःख त्या कधी बोलून दाखवत नसत. पण कळत असे त्यांचे एकाकीपण. हे एकाकीपण त्यांना परिस्थितीमुळे आलं होतं की, त्यांना कोणी बळजबरीने स्वीकारायला लावलं होतं की त्यांनी आपणहून स्वीकारलं होतं कोणजाणे. संजय दत्त मागचा हा त्यांचा चेहरा असा कधी कधी आम्हांला दिसत असे.
 होस्टेल मधील ज्या मुलींना सकाळी सकाळी विशिष्ट चेहराच पाह्याचा असायचा , त्या जर आम्हांला कधी भेटल्या तर आम्ही त्यांना म्हणायचो,
“ मेरे चेहरे पे क्या जादू है” किंवा “चेहरा क्या देखते हो ,दिल में उतर कर देखो ना’
आमच्या अशा टवाळीने त्या अधिकच चिडायच्या. मग आमचा चेहरा कधीच दिसणार नाही याची काळजी त्या घ्यायच्या.
आज मी पाहिलं तर होस्टेलचा चेहरा-मोहरा पार बदलला आहे. पूर्वी आठ वाजे पर्यंत बाहेर राह्यची परवानगी होती. नर्सेसना त्यांच्या दवाखान्यातून शिफ्टचे पत्र आणावं लागत असे. पण आता बहुतांशी मुली बीपीओत काम करतात. आय टी क्षेत्र विस्तारत आहे. त्यामुळे होस्टेल रात्री सुद्धा जागंच असतं. नवीन येणाऱ्या मुली आता होस्टेलचा मूळ शांत आणि सुरक्षेचा चेहरा बदलतील. तो अधिक वेगाचा आणि आधुनिक होईल. अर्थात असा वरवरचा कितीही बदल झाला, नवीन रंग रंगोटी झाली, सुरक्षेची विविध साधनं आली तरी आपण आतून अधिक मजबूत आणि उदार होत आहोत ना?
त्याची मात्र नक्की काळजी घेऊ! एकमेकांचा विश्वास वाटेल असं राहू..

(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: The poster of Sanjay Dutt and the story of the lonely faces in the girl hostel -prabhatpushpa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.