प्री वेडिंग फोटोशूट, बेबी फोटोशूट किंवा अगदी मॅटर्निटी फोटोशूटचे सध्या बरेच फॅड आहे. आयुष्यातील प्रत्येक घटना कॅमेरात कैद करण्याची सुविधा सहज उपलब्ध असल्याने अशाप्रकारचे शूट सध्या मोठ्या प्रमाणात केले जातात. एखादी घटना कालांतराने जुनी होते, पण फोटोंच्या माध्यमातून ही घटना कायम आपल्या आठवणीत राहावी यासाठी हे फोटोशूट केले जाते. अशाप्रकारचे शूट करण्यासाठी आपण जितके आतुर असतो त्याचप्रमाणे अभिनेत्रीही आपले हे क्षण कॅमेरात कैद करुन ठेवतात. नुकतेच प्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह हिने मॅटर्निटी शूट केले असून तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. भारतीने आपल्या उत्तम अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे या बेबी बंपमध्येही ती खूप छान दिसत असून चाहत्यांनी तिचे या फोटोंसाठी खूप कौतुक केले आहे. भारतीला आता ८ वा महिना सुरू असून वेगवेगळ्या प्रकारच्या लाँग गाऊनमधले एकाहून एक छान फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना एप्रिलमध्ये बाळ होणार आहे. यानिमित्ताने मॅटर्निटी फोटोशूटविषयी (Tips For Maternity Photoshoot) चर्चा रंगत असताना तुम्हीही अशाप्रकारे मॅटर्निटी शूट प्लॅन करत असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी समजून घेऊया...
१. कपड्यांची निवड करताना
मॅटर्निटी शूटमध्ये आपले बेबी बंप दिसणे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे ते नीट दिसेल असे अंगाला बसतील असे कपडे हे फोटोशूट करताना घालायला हवेत. इतकेच नाही तर थोडे गडद रंगाचे आपल्यावर खुलून दिसणारे रंग वापरले तर हे फोटो आणखी छान येतात. मॅटर्निटी फोटोशूट म्हणजे बाळ पोटात असतानाचे आपण असा त्याचा अर्थ असल्याने शक्यतो जास्तीत जास्त अंग झाकले जाईल असे कपडे घातल्यास ते जास्त चांगले दिसतात. सध्या बाजारात मॅटर्निटीमध्ये घालण्यासाठी विविध प्रकारचे लाँग गाऊन सहज मिळतात, आपल्याला सूट होईल असा एखादा गाऊन शोधायला हवा.
२. मेकअपबाबत
गरोदरपणात विशेषत: सातव्या महिन्यानंतर आपण मॅटर्निटी शूट करतो. अशावेळी आपल्या चेहऱ्यावर गरोदरपणाचा ग्लो आलेला असतो. अशावेळी खूप जास्त मेकअप करायची आवश्यकता नसते. त्यामुळे हलका मेकअप करणे केव्हाही चांगले. बऱ्याचदा न्यूड मेकअपही चांगला दिसतो. मॅटर्निटीमध्ये बेबी बंप जास्त महत्त्वाचे असल्याने आपण गडद मेकअप केला तर ते चांगले दिसत नाही. तसेच काही वेळा गरोदरपणात काही ब्यूटी प्रॉडक्ट वापरल्यास त्याची चेहऱ्यावर रिअॅक्शन येण्याची शक्यता असते. अशावेळी चेहऱ्याची काळजी घेतलेली केव्हाही चांगली.
३. ठिकाण निवडताना
मॅटर्निटी फोटोशूटचे ठिकाण हे आपल्या घरापासून फार दूरचे असू नये. याचे कारण म्हणजे या काळात तब्येत नाजूक असते. शरीराला जास्तीत जास्त विश्रांतीची आवश्यकता असते. त्यामुळे हे ठिकाण आपल्यापासून जवळ असेल असे पाहावे. इतकेच नाही तर हे ठिकाण सुरक्षेच्यादृष्टीने योग्य असेल याकडे लक्ष द्यावे. फार चढ-उतार करावा लागेल, चालावे लागेल, साहस करावे लागेल अशा ठिकाणी मॅटर्निटी फोटोशूट करु नये. असे करण्यात आपल्या तब्येतीला त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे ठिकाणाची निवड करताना योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली.
४. चपला आणि दागिन्यांची निवड करताना
मॅटर्निटी फोटोशूटसाठी हेअरस्टाइल, हलका मेकअप आणि कपडे यांच्याकडे प्रामुख्याने लक्ष दिलेले केव्हाही चांगले. आधीच आपले पोट जड झाल्याने आपल्याला शरीराचेच वजन झेपत नाही. त्यात दागिने घातल्यास आपण अनइझी होऊ शकतो. जास्त जड असणारे कानातले, हातातले किंवा गळ्यातले या शूटच्या वेळी घालू नये. त्यामुळे आपण आणखी अनकम्फर्टेबल होण्याची शक्यता असते. तसेच या काळात आपल्याला झेपतील, सूट होतील अशाच चप्पल किंवा सँडल घालावेत. उगाच जड, हिल्स असलेले, टोचणारे, फॅशनेबल चप्पल घालू नये. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.