पावसाळा आपल्याला अनेक कारणांसाठी आवडत असला तरी काहीवेळा पावसाळी हवा कुंद आणि निराश करणारी वाटते. वातावरणात आलेलं मळभ काहीवेळा आपल्या मनावरही येतं आणि मग काहीच न करता फक्त लोळत पडावसं वाटतं. अशा वातावरणात विशेष काही कारण नसतानाही उदास वाटतं आणि मन काहीसं खिन्न होऊन जातं. एकीकडे आपलं रुटीन तर सुरु असतं, ऑफीसला जाणे, बाहेरच्या कार्यक्रमांना जाणे हे सगळे सुरू असताना मनातून आपण आनंदी असायला हवे ना. नाहीतर आपल्या मनातील निराशा आजुबाजूच्यांना जाणवते आणि सगळेच वातावरण काहीसे नकारात्मक किंवा उदास होऊन जाते. असे होऊ नये आणि अंधार दाटून आलेला असला तरी त्यातही आशेचा कीरण, उत्साह शोधायला हवा. आपलं आपणच खूश राहायला हवं यासाठी नेमकं काय करता येईल हे समजून घेणे गरजेचे असते. पाहूयात यासाठीच काही खास टिप्स (Tips To Develop Positive Mindset)…
१. कृतज्ञता व्यक्त करा
कृतज्ञता ही आनंदाची सर्वात महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. रोजच्या दिवसासाठी आपण कृतज्ञ असायला हवं. आपण ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहोत त्या ३ गोष्टी लिहून ठेवा. त्यामुळे आपण ज्या गोष्टींसाठी धावत आहोत त्या आपल्याकडे आधीपासूनच आहेत हे लक्षात ठेवा. आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींसाठी आपण आनंदी असलो की नकळत तो आनंद आपल्यात मुरत जातो. यामुळे आपण नकारात्मक गोष्टींकडून सकारात्मक गोष्टींकडे शिफ्ट व्हायला मदत होते.
२. तुमच्या आजुबाजूला सकारात्मकता राहील असे बघा
आपल्यासोबत असणारी कंपनी आपल्यावर खूप प्रभाव पाडणारी असते हे कायम लक्षात असूद्या. तुमच्या आजुबाजूला सकारात्मक आणि पाठिंबा देणारे लोक असतील याची विशेष काळजी घ्या. यामुळे तुम्ही स्वत: इन्स्पायर व्हाल आणि सकारात्मक राहाल. नकारात्मक बातम्या, टॉक्सिक लोकं यांना तुमच्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवायला हवे.
३. नकारात्मक विचारांना चॅलेंज करा
व्यक्तीच्या मनात दिवसाला ६० ते ८० हजार विचार येतात. त्यामुळे आपण जर नकारात्मक विचार केला तर आपल्या मनावर त्याचा किती परीणाम होईल याचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. आपण म्हणजे आपले विचार नाही, तर विचार हे आपल्या इगोइस्टीक मनाचे एक प्रॉडक्ट असते. एकदा आपण या विचारांच्या चक्रात अडकलो की त्यातून पुन्हा मागे येणे अवघड असते. त्यामुळे जास्तीत जास्त करातात्मक विचार करायला हवेत.
४. स्वत:ची काळजी घ्या
आपण इतरांची काळजी घेण्यात इतके व्यस्त असतो की आपण आपल्या शरीराची, भावनांची आणि मनाची काळजी घेणे विसरुन जातो. तुम्हाला आनंद देतील आणि रिलॅक्स करतील अशा अॅक्टीव्हीटीज करायला हव्यात. यामध्ये अगदी व्यायामापासून विविध छंद, फिरायला जाणे अशा विविध गोष्टींचा समावेश असू शकतो.
५. ध्येय निश्चित करा
ठराविक वेळेत साध्य होतील अशी ध्येय निश्चित करा आणि त्यानुसार कामगिरी करा. यामुळे तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच पण नकळत तुमचा माईंडसेट सकारात्मक व्हायला मदत होईल. यामुळे आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता आणि आनंद वाढायला मदत होईल.