अश्विनी बर्वे
विंदांच्या तेच ते आणि तेच ते.. या कवितेची हल्ली ना रोज मला आठवण येते. म्हणजे आजच्या काळात ती जास्त आठवत राहते. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते! कॉम्प्युटरसमोर बसा, आपलं काम करा, मुलांचे ऑनलाइन वर्ग बघा. तेच ते आणि तेच ते. शिवाय आपल्याला कोणाचा फोन आला की, ती व्यक्ती आपल्याकडे त्याचा कंटाळा पास करत नाही ना? याविषयी सजग राहा.पण, यावर एक उपाय मला सापडला आहे. तो कसा हे आधी सांगते.हा प्रसंग काही वर्षांपूर्वीचा आहे. परदेशात ज्या दुकानात फक्त परफ्युम मिळतात, त्या दुकानात आम्ही गेलो होतो. इतक्या विविध प्रकारचे परफ्युम एकाच ठिकाणी मी प्रथमच बघत होते. परफ्युमच्या विविध आकाराच्या बाटल्या होत्या. त्या बाटल्यांचा आकार बघून तो खरेदी करावा की सुगंध बघून खरेदी करावा, इतका माझा गोंधळ होत होता. पण जेव्हा मी एकेका बाटलीतील परफ्युमचा सुगंध घेऊ लागले, तेव्हा तर माझा खूपच गोंधळ होऊ लागला. दुकानदार एकेक बाटली उघडून त्याचा फवारा त्या छोट्याशा पट्टीवर टाकून मला निवड करण्यास मदत करत होता. पण, काही काळाने मला सगळ्यांचा एकसारखा वास येऊ लागला. माझा गोंधळ विक्रेत्याच्या लक्षात आला. त्याने हसून माझ्याकडे पाहिलं आणि हाताने थांबण्याची खूण केली. मला कळेना हा असा का करतो आहे ते? मला वाटलं की मी निवड करू शकत नाही म्हणून त्याने मला परफ्युम विकायचा नाही, असे ठरवले असावे. पण तसे ते नव्हते.
(Image : Google)
त्याने माझ्यासमोर कॉफीचा (पावडर) बाऊल ठेवला आणि मला वास घेण्यास सांगितले.अहाहा! कॉफीचा तो स्ट्राँग तरतरी आणणारा सुगंध माझ्या नाकातून डोक्यात गेला. मी आधी सुगंध घेतलेल्या परफ्युमचे सगळे वास माझ्या नाकातून, मनातून गायब झाले. आणि मी नव्या दमाने मला हवा असणारा परफ्युम शोधू लागले. आणि मला तो, खूप वेळ टिकणारा, उल्हसित करणारा सुगंध सापडला आणि इथेच मला आपल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. सध्या आपण तेच तेच काम करत आहोत. मी बाकीची परिस्थिती अजिबात वर्णन करणार नाही. पण, या रोजच्या कामातून आपण आपला कॉफीचा सुगंध शोधून काढूया. म्हणजे रोज आकडेमोड करत असू तर बागकाम करून बघूया. शब्दाशी खेळत असू तर दुसरं काय काम करता येईल, जे तुमच्या कॉफीचा सुगंध असेल. चित्रं, ओरिगामी, मुलांबरोबर मस्ती, घरातली कामं, काहीही ज्यात आपल्या कॉफीचा सुगंध असेल जो आपल्याला तरतरी आणेल, आपली तीच ती कामं करण्यासाठी.आपली कॉफी आपल्याला शोधावी मात्र लागते.