Lokmat Sakhi >Mental Health > डोक्यात नुसता विचारांचा कलकलाट झालाय? काय केलं तर शांत वाटेल, किचाट संपेल..

डोक्यात नुसता विचारांचा कलकलाट झालाय? काय केलं तर शांत वाटेल, किचाट संपेल..

शरीर जिथे आहे तिथे, वर्तमानात, आपले मन कधीच नसते. हे असे असेल तर वर्तमानातल्या प्रश्नांना आपण कसे तोंड देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 01:27 PM2021-06-09T13:27:14+5:302021-06-09T13:33:25+5:30

शरीर जिथे आहे तिथे, वर्तमानात, आपले मन कधीच नसते. हे असे असेल तर वर्तमानातल्या प्रश्नांना आपण कसे तोंड देणार?

too much thoughts in mind, can't concentrate, restless how to work on this? | डोक्यात नुसता विचारांचा कलकलाट झालाय? काय केलं तर शांत वाटेल, किचाट संपेल..

डोक्यात नुसता विचारांचा कलकलाट झालाय? काय केलं तर शांत वाटेल, किचाट संपेल..

Highlights‘विचार’ नावाच्या सुतार पक्ष्याची ठकठक कशी थांबणार?

वंदना अत्रे

काम करीत असताना, गाडी चालवत असताना, प्रवासात, रोजची आन्हिके उरकत असताना आपल्या मनाच्या फांदीवर बसलेला विचार नावाचा सुतार पक्षी अखंड ठकठक करीत असतो ते तुमच्या कधी लक्षात आले आहे? एखाद्या समारंभात सभागृहात सतत सनईवादन सुरू असते; पण ते ऐकू मात्र कोणालाच येत नसते तसे काहीसे या विचारांचे आहे. विचाररहित अशी मनाची अवस्था फारच क्वचित, जवळ जवळ नाहीच, अशी असते. मजा म्हणजे, ज्याचे बोट सतत आपल्या बोटांमध्ये गुंफलेले असते अशा या विचारांकडे आपण फारच क्वचित लक्षपूर्वक बघतो, ते ऐकतो.
एकदा शांत बसून त्यांच्याकडे लक्ष देऊन बघा. जे दिसेल ते थक्क करणारे असेल. हे विचार असतात भूतकाळात घडून गेलेल्या एखाद्या घटनेबद्दल दुःख, वेदना, खंत, राग, पश्चाताप करणारे किंवा ते असतात भविष्याची काळजी करणारे. थोडक्यात शरीर जिथे आहे तिथे, वर्तमानात, आपले मन कधीच नसते. पण संकट किंवा आव्हान मात्र वर्तमानात आपल्या समोर उभे राहून क्षणोक्षणी उत्तर मागत असते. कृती करण्याची गरज निर्माण करीत असते. आपण ज्या शाब्दिक विचारांचे सतत मनात चिंतन करीत असतो त्याचे रूपांतर आपल्या मनात अनुभवाच्या भाषेमध्ये होत असते. ही प्रक्रिया निरंतर सुरू असते.
याचे कारण, आपल्या आंतरिक शक्तीला फक्त अनुभवांचीच भाषा समजते, शब्दांची नाही.

ज्या मनात सतत खंत, दुःख, चिंता काळजी याचे चिंतन सुरू आहे आणि आंतरिक शक्ती फक्त त्याचाच अनुभव घेते आहे ते मन वर्तमानात समोर आलेल्या आव्हानाला, संकटाला कसे तोंड देणार? अशावेळी उपयोगी पडतो तो, आपण तयार केलेला स्वतःबद्दलचा सशक्त, सकारात्मक युक्तिवाद. तो आपण सतत मनात घोळवत असलो तर समोरच्या आव्हानाला योग्य तो प्रतिसाद आपण देऊ शकतो. प्रबळ इच्छाशक्ती, स्वतःसाठी सशक्त युक्तिवाद याबद्दल बोलत असताना एक गोष्ट मी गृहीत धरली आहे हे तुमच्या लक्षात आलेय का? ती म्हणजे, तुमच्या दिनक्रमात शारीरिक व्यायाम नावाच्या गोष्टीला आवर्जून स्थान आहे ! मानसिक आरोग्याची काळजी, सकारात्मकता अशा भल्यामोठ्या गोष्टींबद्दल बोलण्यापूर्वी आपले शारीरिक आरोग्य खणखणीत आहे ना, ते सांभाळण्यासाठी आपण नियमितपणे काय करतो हा प्रश्न स्वतःला विचारून त्याचे खरे खरे उत्तर घ्यायला हवे. ते देताना, ‘वेळ नाही’ इथपासून ‘पळायला जायचे आहे; पण बूट नाहीत’ अशा कोणकोणत्या कारणांच्या आड आपण दडतो आहोत ते बघायला हवे आहे. त्याच्या मागून स्वतःला खेचून बाहेर काढून रोज व्यायाम नावाच्या प्रारंभी नकोशा वाटणाऱ्या; पण करता करता अमाप आनंद देणाऱ्या एक सवयीमध्ये स्वतःला ढकलायला हवे आहे.
- व्यायामास जागा नाही हे कारण सांगताना विनोबा भावे तुरुंगातील इवल्या कोठडीत व्यायाम करीत होते हे लक्षात ठेवावे. आणि ज्यांच्याकडे ‘वेळ नाही’ची सबब आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे, की गीतारहस्य लिहिणारे लोकमान्य टिळक नियमित व्यायाम करणारे होते...!

उंदराच्या लबाड पिल्लाचे करायचे काय?

प्रश्न असा आहे (जो काही वाचकांनीही विचारला आहे) की एखाद्या उंदराच्या लबाड पिल्लाप्रमाणे इकडून-तिकडून, चोरवाटांनी मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांच्या लाटांना थोपवायचे कसे?
1. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मनात सतत येत असलेल्या विचारांचा मागोवा घेत राहायचा. एक सोपा उपाय म्हणजे, नकारात्मक विचारांचे ढग जमू लागल्याचे लक्षात येताच जिथे बसलो आहोत, काम करीत आहोत तिथून उठायचे, ती जागा सोडायची.
2. - पण प्रवासात, दवाखान्यात असलो तर? अशावेळी उपयोगी ठरणारा उपाय म्हणजे, लक्ष आपल्या श्वासाकडे आणायचे. येणारा-जाणारा श्वास फक्त अनुभवत राहायचा. नाकपुडीजवळ जाणवणारा प्राणशक्तीचा किंचित उबदार स्पर्श, प्राणशक्ती शरीरात गेल्यावर किंचित मागे जाणारे खांदे, पुढे येणारी छाती, श्वास सुटताना पुढे झुकणारे खांदे, रिकामी झालेली फुप्फुसे आपल्याला हे सगळे हळूहळू जाणवू लागते. आपल्या श्वासाला असलेल्या लयीचा ठेका ऐकू येऊ लागतो आणि मन वर्तमानात येत स्वस्थ होऊ लागते.

3. फुलांची माळ करणे, रांगोळी काढणे, चित्र रंगवणे, पत्त्यांचा बंगला बांधणे अशा छोट्या-छोट्या कृती यासाठी नक्की मदत करतात.

Web Title: too much thoughts in mind, can't concentrate, restless how to work on this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.