मुलांच्या शाळेचा डबा असो नाहीतर सासू सासऱ्यांसाठी नाष्ता, किंवा पती आल्यानंतर त्याचे खाण्याचे चोचले पुरवणं असो, महिलांना नेहमीच मर मर काम करून स्वतःला झिजवावं लागतं. भारतातील सर्वाधिक महिला या आपला जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये घालवतात. त्यांच्या संघर्षाचं, मेहनतीचं कुठेच कौतुक केलं जात नाही. पण चुका मात्र सगळ्यांकडून काढल्या जातात.
काही दिवसांपासून स्वयंपाक घरात काम करत असलेल्या एका महिलेचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. एका सोशल मीडिया युजरनं आपल्या आईचा चपाती बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, “Unconditional love= *MOTHER* She is never off duty.”
वाचायला हे चांगलं वाटत असलं तरी या फोटो मात्र खूप काही सांगून जातोय. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता आई एकटीच चपाती बनवत आहे. तब्येत बरी नसल्यानं या माऊलीच्या तोंडाला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर सुद्धा लावला आहे.
हे असं कसं निस्वार्थ प्रेम आहे? एखाद्या महिलेला ऑक्सिजनची कमतरता असूनही स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवावा लागत आहे की कोणीतरी तिला गुलामासारखं वागवत आहे? असे संतापजनक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. हा फोटो व्हायरल होताच फोटोविरोधात नाराजी व्यक्त करताना लोकांनी ट्विटरवर बरेच काही लिहिले.
अशा उमटल्या प्रतिक्रिया
तमिळ चित्रपट निर्माते नवीन मोहम्मद अली यांनी ट्विटरवर लिहिले की, 'हे प्रेम नाही. ही सामाजिक रचनेच्या नावाखाली गुलामगिरी आहे.' लेखक, वसाहतवादी आणि डॉक्टर नंदिता अय्यर यांनी हा फोटो ट्विट करुन ट्वीट केला आणि फक्त "#thegreatindiankocolate" असं कॅप्शन लिहिले.
प्रत्येकजण आपल्या कुटूंबासाठी महिलांचा त्याग आणि संघर्ष याबद्दल परिचित आहे, परंतु आजही केवळ पुरुषप्रधानतेने ठरवलेल्या मानकांनुसार याचं मापन होतं. महिला रात्रंदिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेते, त्यांच्या गरजा भागवते. ज्यामध्ये मुख्य गोष्ट म्हणजे जेवण. भूक भागवण्याचं काम आई रात्रंदिवस करते.
हे निस्वार्थ प्रेम आहे की गुलामी
दरम्यान या फोटोचा मूळ स्त्रोत किंवा हा फोटो वास्तविक आहे की नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारण गॅस जवळ ऑक्सिजन ठेवणे धोकादायक असू शकते हे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु या फोटोने हे निश्चितपणे सिद्ध केले की आपण अजूनही त्याच पुरुषप्रधान समाजात जगत आहोत जिथे कोणतीही परिस्थिती असली तरीही महिला स्वयंपाकघरातील कामे सांभाळतील अशी मानसिकता आहे.
आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. समाज आणि लोकांच्या मानसिकतेतही प्रगती झाली आहे. मग का आजही फक्त एक महिला स्वयंपाकघर हाताळते? त्यातही साधी एकही सुट्टी मिळत नाही. आईची तब्येत बरी नसेल तेव्हा जेवण बनवतील इतपत पती आणि मुलं सक्षम नाहीत का? ज्या इंटरनेटवर हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. त्यावर पाहून स्वयंपाकसुद्धा शिकता आला असता. अश्या शब्दात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.