कोरोनाच्या जागतिक महामारीने मानसिक स्वास्थ्यावर मोठा परिणाम केला, देशातल्या सर्वच वयातील नागरिकांना मानसिक ताण आणि समस्यांना सामोरे जावे लागले याची नोंद आज अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनीही घेतली आणि मानसिक आरोग्य केंद्रांचं नेटवर्क उभं करण्याची घोषणाही केली. केवळ आरोग्यच नाही तर देशात नागरिकांसाठी मानसिक आरोग्याचे प्रश्नही हाताळणे गरजेचे आहे, हे या अर्थसंकल्पाने अधोरेखित करणं महत्त्वाचं ठरलं आहे. मुख्य म्हणजे ग्रामीण भागातच नाही तर शहरातंही महिलांना या महामारीच्या काळात मानसिक ताणांनी छळले. मात्र मानसिक आरोग्याविषयी मोकळेपणानं बोलण्याची सोय नाही, मदत चटकन उपलब्ध नाही. आणि जिथं लहानसहान दुखणीखुपणी महिला अंगावर काढतात तिथं मानसिक आजार, चिडचिड, अस्वस्थता, ताण आणि डिप्रेशनपर्यंतचे आजार महिला मोकळेपणानं बोलत नाही. या अर्थसंकल्पात २३ मानसिक स्वस्थ्य केंद्र टेलीनेटवर्कद्वारे जोडण्यात येणार आहेत. बंगलोरची ख्यातनाम मानसिक आरोग्य संस्था निम्हंस आणि आयआयटी बंगळूरु यांच्या मदतीने ही केंद्र ‘टेलीनेटवर्क’द्वारे जोडलेली असतील. मानसिक मदत मागण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. (union-budget-2022)
(Image : Google)
आपल्या भाषणातही अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले की जिल्हास्तरावर गुणात्मक मानसिक आरोग्य सेवा आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात, मदत मागणं सोपं व्हावं म्हणून ही योजना राबवली जाणार आहे. महामारीच्या काळात मानसिक स्वास्थ्यासाठी सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे हे ठळकपणे समोर आलं आहे. एकुण सगळ्यांच्याच आरोग्यासाठी ही केंद्र आणि मदत-सल्ला महत्त्वाचा असला तरी महिलांसाठी हा उपक्रम जास्त मदतशीर ठरू शकेल का? आणि त्याची गरज का महत्त्वाची आहे यासंदर्भात ‘लोकमत सखी’ने प्रसिध्द मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर यांच्याशी चर्चा केली.
(Image : Google)
मानसिक आरोग्याचा प्राधान्याने विचार व्हावा!
डॉ. हमीद दाभोलकर ( मानसोपचारतज्ज्ञ, परिवर्तन संस्था)
अनेक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या मानसिक आरोग्याच्या गरजांचा बजेटमध्ये विचार केला गेला हे नक्कीच स्वागतार्ह पाऊल आहे. एकुणात महिला आणि खासकरून कष्टकरी समूहातील महिलांच्या मानसिक आरोग्यावर या कार्यक्रमामध्ये भर देणे आवश्यक आहे. माता आणि बालसंगोपन याचे जे कार्यक्रम शासन पातळीवर राबवले जात आहेत त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शारीरिक आरोग्यसेवेबरोबरच मानसिक आरोग्यसेवा दिली जाणे आवश्यक आहे. याचे कारण लहान मुलांना जन्म देणे आणि त्यानंतर त्यांचे संगोपन करणे, दुसरीकडे कुटुंब, नोकरी या जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिला अनेक मानसिक आंदोलनांचा सामना करत असते. अशावेळी घरातील महिलेचे मानसिक आरोग्य चांगले राहिले तर तिच्या कुटुंबाच्या आणि खासकरून मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात त्यादृष्टीने निधीचा वापर करण्यात यावा. महिलांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचा प्राधान्याने विचार व्हायला हवा अशी अपेक्षा आहे.