मुलगी आहेस मग तुला जेवण बनवता आलंच पाहिजे. असा दृष्टीकोन आजही अनेक घरांमध्ये दिसून येतो. तुमचा विश्वास बसणार नाही सर्वसामान्य कुटुंबातच नाही तर अनेक अभिनेत्रींनाही या प्रसंगांना तोंड द्यावं लागलं आहे. अभिनेत्री विद्या बालनलाही मुलगी असल्यानं अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला आणि यामुळे तिला प्रचंड राग आला होता. एका दैनिकाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विद्याने त्याच बद्दल चर्चा केली आणि नमूद केले की हे ‘आता खूप कमी घडते’. या मुलाखतीदरम्यान विद्याला डिनर टेबलची घटना आठवली जिथं तिला सांगण्यात आले होते की आपल्याला स्वयंपाक कसा करावा हे माहित असायलाच हवं.
विद्यानं सांगितले की, ''मला आठवतंय मी डिनर टेबलजवळ बसलेले असनाना अरे देवा, तुला जेवण बनवता येत नाही? असं मला काहीजण बोलत होते. त्यावेळी मी म्हटलं मला आणि सिद्धार्थला आम्हा दोघांनाही जेवण बनवता येत नाही. त्यावेळी त्यांनी तुला जेवण बनवता यायलाच हवं असं उत्तर दिलं. त्यावर माझ्यात आणि सिद्धार्थमध्ये काय फरक आहे. असा प्रश्न मी त्यावेळी उपस्थित केला.''
पुढे तिनं असंही सांगितलं की, ''जेव्हा माझी आई मला जेवण बनवण्यासाठी आग्रह धरायची तेव्हा मी तिला म्हणायचे. मला तू सतत जेवण बनवायला का सांगतेस. त्यापेक्षा मी चांगले पैसे कमवेन आणि उत्तम जेवण बनवत असलेल्या माणसासह लग्न करेन.'' मुलाखती दरम्यान विद्याने असेही सांगितले की, ''आपल्या सर्वांना लिंगभेदाचा सामना करावा लागत असून विरूद्ध लिंगाच्या व्यक्तीकडून हे जास्त प्रमाणात घडत असते. आपण एकमेंकांशी समान भावनेनं वागत असलो तरी मला लिंगभेदाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मला खूप राग येतो. सध्या हे खूप कमीवेळी घडते. पण तरीही.....'' असंही तिनं यावेळी नमुद केलं.''
कामाच्या क्षेत्रात शेरनी या चित्रपटात ती वन अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी विद्या बालनने खूप मेहनत घेतली आहे. तिने 'शेरनी'साठी केलेल्या तयारीबद्दल सांगितले की,"ते आपली नोकरी प्रत्यक्ष कशी करतात हे जाणून घेण्यासाठी मी काही महिला वन अधिकाऱ्यांना भेटले." विद्या बालन अभिनीत अमेझॉन प्राईम व्हिडीओचा आगामी ओरिजिनल चित्रपट 'शेरनी'चे कथानक वास्तविक जीवनात एक पथप्रदर्शक आहे, जो एक महिला वन अधिकारी, तिची नोकरी, लग्न आणि वैयक्तिक आयुष्य या माध्यमातून तिचा स्त्री म्हणून असलेला प्रवास रेखाटतो.
आपल्या व्यक्तिरेखेविषयी तिने सांगितले की, "विद्या विन्सेंटच्या बाबतीत मला जे आवडले ते हे की, तिचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे त्यासाठी उभे राहण्याचे ती धाडस दाखवते. यासाठी तुम्हाला आक्रामक होण्याची किंवा पुरुषांच्या दुनियेत पुरुष होण्याची आवश्यकता नाही, तुम्ही एक महिला बनूनच राहू शकता आणि आपली वाट शोधू शकता."