फिटनेसचा विचार आपण कसा करतो? फिटनेस म्हणजे फक्त शारीरिक फिटनेस का? मानसिकरित्या फिट राहाण्यासाठी आपण काय करतो? मानसिक फिटनेस राखण्यासाठी काही करणं खरंच गरजेचं असतं का? असे प्रश्न फिटनेसच्या बाबतीत स्वत:ला विचारले तर एक गोष्ट लक्षात येते , की आपण फिटनेसचा विचार फारच साचेबध्द करतो आहोत. एकांगी करतो आहोत. फिजिकल फिटनेस राखण्यासाठी धडपडताना आपण मेंटल फिटनेसचा जराही विचार करत नाही.
Image: Google
तज्ज्ञांच्या मते शारीरिक आणि मानसिक फिटनेस या फिटनेसच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही परिस्थितीत शारीरिकरित्या आपण फिट आणि मजबूत असणं गरजेचं आहे तसंच परिस्थिती कोणतीही असो आपण मनानं न कोलमडता वागणं, भावनेच्या आहारी जाऊन विचार न करणं, आणीबाणीच्या परिस्थितीतही मनाचा तोल ढळू न देता शांतपणे विचार करुन वर्तन करणं अपेक्षित असतं. अशा वर्तनासाठी मेंटल फिटनेसची गरज असते. फिजिकल वर्कआउटप्रमाणेच जर मेंटल वर्कआउटचा विचार केला तर अशी मानसिक कणखरता मिळवण्ं शक्य आहे.
मेंटल वर्कआउट नेमका करायचा कसा?
मानसोपचारतज्ज्ञ छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मनाचा ठामपणा, कणखरपणा मिळवू शकतो असं म्हणतात. त्यासाठी विचार, भावना आणि एकाग्रता या पातळीवर काही गोष्टींची सवय मनाला लावून घेणं आवश्यक असतं.
Image: Google
1. नकारात्मक विचारांची साखळी तोडणं.. त्यांना प्रश्न विचारुन त्यांच्यातली हवा काढून घेणं ही सवय स्वत:ला लावून घेणं आवश्यक आहे. मनात नकारात्मक विचार आल्यानं मानसिक आणि भावनेच्या पातळीवर आपण कोलमडतो. परिस्थितीचा नकारात्मक विचार करण्याची सवय बदलण्यासाठी नकारात्मक विचारांच्या साखळीचे छोटे छोटे तुकडे करावेत. या प्रत्येक तुकड्याला प्रश्न विचारावा, हे कसं याबाबात् विश्लेषण करताना तज्ज्ञ कोविडचं उदाहरण देतात. कोरोनामुळे आपल्यापासून दूर राहाणाऱ्या आई वडिलांचा विचार करताना आता त्यांचं कसं होणार? आता काही खरं नाही असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा आपण रोज त्यांच्या संपर्कात कसं राहू शकतो? आपल्या आई बाबांना तब्येतीची काळजी घेण्याबाबत काय मदत करु शकतो? डाॅक्टर/ तज्ज्ञ काय म्हणतात? असे प्रस्न नकारात्मक विचारांना विचारले तर वास्तव उत्तरं मिळतात, पर्याय मिळतात. नकारात्मक विचारांनी जिथे हतबल होतो तिथे नकारात्मक विचारांच्या साखळीला तोडता आलं तर प्रत्यक्ष कृती होवून त्याचा फायदा मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी होतो. नकारात्मक विचारुन बेजार केलं तर त्यांचं आपल्याला छळण्याचं प्रमाण कमी होतं.
Image: Google
2. जे शक्य नाही ते करण्याचं ध्येय ठेवल्यास आपल्याला हे जमत नाही, जमणार् नाही असा विचार येऊन स्वत:चं खच्चीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे तज्ज्ञ म्हणतात आपल्या आवाक्यातले लक्ष ठेवून त्यासाठी प्रयत्न करा. लक्ष ठरवताना आपल्या ताकदी काय आहेत, आपल्याला काय करणं अशक्य आहे? परिस्थिती नेमकी काय आहे? परिस्थितीला आपण काय करणं अपेक्षित आहे? असा विचार करुन वास्तववादी छोटे छोटे ध्येय ठेवले तर ते गाठले जातात आणि त्याचा फायदा मानसिक समाधान मिळवण्यासाठी होतो. मानसिक समाधान मिळालं की मनाची ताकद वाढते.
Image: Google
3. रोज एकच प्रकारचं काम करावं लागलं की कंटाळा येतो. हा कंटाळा आपल्या शरीराल आळशी बनवतो तसंच आपल्या मनाला देखील आळशी बनवतो. आळशी मन नवीन काम करण्यास, स्वत:साठी नवीन काही शोधण्यास , प्रयत्न करण्यास असमर्थ बनतं. अशा आळशी मनाला हलवून जागं करण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी मेंदूला आव्हान वाटेल असं काम रोज करायला हवं. त्यात नवीन भाषा शिकणं, नवीन कौशल्य शिकणं, नवीन काम करणं, कोडी सोडवणं, नवीन काहीतरी लिहिणं या गोष्टी केल्यास मेंदुला चालना मिळते . अशा गोष्टीतून मन प्रसन्न, उत्साही आणि कार्यमग्न होतं. मन आळसावलं तर नकारात्मक विचारांकडे झुकतं, निराशावादी होतं. म्हणून तज्ज्ञ मनाचा आळस झटकणं महत्त्वाचं मानतात.
Image: Google
4. समोर आलेल्या परिस्थितीचा भावनिक विचार न करता तार्किक विचार करावा. एखादी अवघड परिस्थिती समोर आल्यास भावनिक होवून हातपाय गाळण्यापेक्षा आपण प्राप्त परिस्थितीत स्वत:ची ताकद ओळखून काय काय करु शकतो हा विचार करणं गरजेचं असतं. भावनिक होण्यामुळे कृतीशून्य होण्याचा धोका असतो तर तार्किक पातळीवर कोणत्याही गोष्टीचा विचार करता आल्यास समस्येवर उपाय शोधायला मदत होते. याचा फायदा मानसिकरित्या कणखरपणा येण्यासाठी होतो.
Image: Google
5. शरीर सतत पळतच राहिलं तर ते जसं थकतं तसंच मनही सततच्या विचारांनी, भावनांच्या उलथापालथीमुळे थकतं. थकलेलं मन प्रभावी आणि परिणामकारक निर्णय घेण्यास असमर्थ ठरतं. हे टाळण्यासाठी रोज दिवसातून दोन वेळा पंधरा मिनिटांसाठी तरी सजग ध्यानधारणा करायला हवी. एका जागी शांत बसून डोळे मिटून आपल्या मनातल्या विचारांकडे, भावनिक उलथापालथींकडे बघायला हवं. त्यांन शांत केलं तर कोणत्याही परिस्थितीत शांत राहून , मनाचा तोल न ढळता निर्णय घेणं, योग्य कृती करणं शक्य होतं.