समिंदरा हर्डीकर-सावंत
फार स्ट्रेस आलाय, स्ट्रेस नको जीव करतोय, ॲसिडीटी झाली आहे, स्ट्रेसमुळे, स्ट्रेसच इतका की झोप लागत नाही, चिडचिड होते. ही वाक्य आपण किती सहज म्हणतो. घरकाम ते नातेसंबंध ते कार्यालय ते अगदी मित्रमैत्रिणी यासाऱ्या जगात वावरताना आपल्या मनावर ताण येतोच. आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात हा तणाव जाणवत नाही, असं कुणी नाही. बायकांना मात्र जास्त ताण येतो, कारण आपण एका वेळी शेकडो गोष्टी हाताळत असतो. एकावेळी अनेक गोष्टी करण्याच्या नादात आपला ताण वाढतो. हा ताण आपण कसा हाताळतो, ताणावर सकारात्मक मात कशी करतो या गोष्टीचा खूप मोठा वाटा आपल्या यशामध्ये असतो. त्यामुळे यशस्वी आणि आनंदी दोन्ही व्हायचं तर ताण हाताळणं जरा समजून घेतलं पाहिजे.मुळात आपण हे समजून घेऊ की, ताण येतो कुठून? आपण ज्याला स्ट्रेस म्हणतो तो स्ट्रेस येतो कसा?त्याची ही काही अगदी साधी कारणं..१. व्यक्तिमत्व- आपल्या पैकी काही लोक स्वभावातच टेन्शन घेणारे असतात. मग अशा लोकांना अगदी लहान सहान कारणांवरून देखील खूप टेन्शन येते.२. परिस्थिती - काही वेळेला परिस्थिती अचानक बिघडल्यामुळे तणाव निर्माण होतो. अचानक होणारे बदल, संकटे, अनपेक्षित समस्या या सर्व गोष्टी तणावपूर्ण ठरू शकतात.यापैकी आपल्याला नक्की कशानं ताण येतो, की दोन्हींनी येतो, हे जरा स्वत:च स्वत:शी बोलून समजून घ्यायला हवं.ते एकदा लक्षात आलं की काही गोष्टी सहज करता येतील.. अगदी लिहून ठेवल्या तरी चालतील.
१. कामाचा ताण आला तर कामं लिहून ठेवा. कामांची यादी आणि प्रायॉरिटी लावा. ताण तिथेच जरा कमी होईल.२. अडचणी आल्या तर त्यावर लगेच तोडगा काढा, चालढकल केली तरी ताण वाढतो. जेव्हाची कामं तेव्हाच करा. ताणाचा निचरा होईल.३. काही वेळा तोडगा आपल्या हातात नसतो, लगेच उत्तर मिळत नाही. ते मान्य करा. निराश होऊ नका, जे शक्य ते करा, जे शक्य नाही ते स्वीकारुन पुढे चला. ज्यावर कण्ट्रोलच नाही त्याचा ताण घेऊन तरी काय उपयोग.४. दुसऱ्याला स्ट्रेस आला की आपण किती चटकन उत्तरं देतो, तसे तटस्थ राहून स्वत:ला उत्तरं द्या. आपण प्रश्नांच्या नाही उत्तरांच्या बाजूनं आहोत हे सांगा स्वत:ला!५. तुमच्या सपोर्ट सिस्टीम चा लाभ घ्या. मदत मागा, ती मागायला लाजू नका. आपल्या माणसांवर भरवसा ठेवा, ते मदत करतील, सल्ले देतील ते ऐका. सल्ला नाही पटला तर सोडून द्या, पण माणसांशी बोला.६. एका वेळी तुम्हाला शक्य असतील तितकीच कामे हातात घ्या. अति करण्याचा ध्यास जितका कराल तितके तणाव वाढेल.७. रोज स्वत:साठी थोडा वेळ तरी ठेवा. अगदी रोज शक्य नसलं तरी किमान आठवड्यातून एकदा थोडा वेळ आपल्याला जे आवडतं ते काम करा.८. वेळ नाही असं म्हणू नका, व्यायाम, योग, विपश्यना, मेडीटेशन, उत्तम आहार यासाठी वेळ काढा, तशी शिस्त लावा. त्याचाच ताण येतो असं म्हणू नका, कारण सगळं एकदम सुरु न करता हळूहळू करा.९. स्वत:वर विश्वास ठेवा की, जमेल आपल्याला. ताण आला तर क्षमताही वाढेल.१०. कुढू नका, बोला, मनमोकळं करा, ताणाचा निचरा त्यामुळे व्हायला लागतो.