गौरी पटवर्धन
ताणतणाव किंवा स्ट्रेस हा नेहेमीच आपल्या आयुष्याचा एक भाग होता. घरातल्या कामांचा, कामाच्या ठिकाणच्या परफॉर्मन्सचा, मुलांच्या शिक्षणाचा, घरातल्या सदस्यांच्या आरोग्याचा, पैसे कमावण्याचा, बचत करण्याचा, घर घेण्याचा, हप्ते भरण्याचा असे विविध ताण आपल्याला कायमच होते. पण ते सगळे ताण किरकोळ वाटावेत अशी परिस्थिती मार्च २०२० पासून आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात आली आहे.
मार्च २०२० पासून हे सगळे जुने ताण तर आपल्या आयुष्यात आहेतच, पण त्यात भलत्याच स्ट्रेसची भर पडलेली आहे. त्यातला “मला करोना झाला तर काय?” हा ताण सगळ्यात सहज दिसतो. पण त्याव्यतिरिक्त अनेक दृश्य-अदृश्य ताणतणाव आपल्या आयुष्यात निर्माण झाले आहेत. इतके दिवस जी नोकरी शाश्वत वाटत होती किंवा जो व्यवसाय आता सेटल झालाय असं वाटत होतं, त्याचा आता भरोसा वाटत नाही. लोकांच्या नोकऱ्या जातायत अशा वेळी आपण जास्तीत जास्त काम करून आपलं काम टिकवून ठेवायला पाहिजे असं वाटतं. पण ते काम आपल्याला घरात बसून करावं लागतं आणि घरात पुरेशी जागा नसते. घरातली कामं संपतच नाहीत. मुलं सतत घरात आहेत. ती कंटाळतात. मग ती चिडचिड करतात. नाहीतर सतत भूक भूक करतात. कितीही टाळलं तरी कामासाठी बाहेर पडावं लागतंच. मग बाहेरून घरात येतांना सगळं सॅनिटाईझ करायचं, कपडे लगेच धुवायला टाकायचे, त्यात केसेस वाढल्या की कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा लॉक डाऊन लागतो. मग वेळेवर किराणा आणि भाज्या घरात आणून ठेवायच्या. त्या नसतील तर त्याच्या पर्यायी स्वयंपाक काय? करायचा याचा विचार करायचा. घरात किंवा शेजारी कोणाला साधी सर्दी झाली तरी भीती वाटते. करोनाचा वणवा घरातल्या मुलांपर्यंत किंवा घरातल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत येईल याची काळजी वाटते…
असे अनेक प्रकारचे विचार सतत मनात चालू असतात आणि त्याचा प्रचंड आणि सतत स्ट्रेस आपल्या मनावर राहतो.
या स्ट्रेसमुळे आपल्यावर अनेक दृश्य-अदृश्य परिणाम होतात. चिडचिड होते. खूप भूक लागते किंवा अजिबात भूक लागत नाही. झोप लागत नाही किंवा उठावंसंच वाटत नाही. मग एकाग्र होत नाही. रडू येतो. भिती वाटते. हे किंवा याव्यतिरिक्तही अनेक प्रकारचे त्रास सतत स्ट्रेसखाली राहिल्याने होऊ शकतात. एरवी आपण स्ट्रेसमध्ये असलो तर कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीशी बोलून तणाव कमी करू शकत होतो. पण आता परिस्थिती अशी आहे, की अक्षरशः सगळं जगच तणावाखाली आहे. सगळ्यांना त्याच चिंता आहेत. कोणाशी बोलायला गेलं तर विषय कुठलाही असेल तरी तो करोना आणि त्यामुळे आपण गमावलेल्या माणसांपाशी येऊन थांबतो. आणि मग स्ट्रेस कमी होण्याऐवजी अजूनच वाढतो. त्यामुळे तोही मार्ग बंद झाल्यासारखा झाला आहे. त्यात चारही बाजूंनी येणाऱ्या बातम्या अजूनच त्यात भर घालतात.
मग यातून बाहेर कसं पडायचं? तेही घरातून बाहेर न पडता? आपल्याच कामात भर न घालता…?
त्यासाठी आपल्याला हवेत काही छंद.
छंद आणि मानसिक ताणाचा निचरा यांचं जवळचं नातं आहे.
आता तुम्ही म्हणाल की एकाएकी कुठून आणणार छंद? तर बघा, असं काहीतरी असेलच जे तुम्हाला खूप आवडतं, स्वयंपाक, शिवण, विणणं, चित्र काढणं, व्यायाम करणं, वाचन, गप्पा मारणं.
असं काहीही ज्याची आपल्याला परीक्षा नाही द्यावी लागणार. स्पर्धा नाही, परफॉर्मन्सचं प्रेशर नाही. फक्त आपल्याला हवं ते करायचं..
विचार करा असं काय आहे, बाकी बोलू पुढच्या भागात..
(लेखिका पत्रकार आहेत.)