पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर आत्यंतिक स्ट्रेसने पिचलेल्या आहेत.
असा एक अभ्यास नुकताच वाचला. विशेषतः नोकरदार स्त्री-पुरुषांचा हा सर्व्हे करण्यात आला होता.
त्यात साधारण असं आढळलं की सुमारे ७२ टक्के महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे.
त्यांची अत्यंत चिडचिड होते. अतिशय मूड स्विंग्ज होतातच; पण त्यासोबतच त्यांना रडू येतं, निराश वाटतं
आणि मुख्य म्हणजे अत्यंत ताणाने त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.
आपल्याला स्ट्रेस प्रचंड आहे असं सुमारे ५४ टक्के पुरुषांनीही सांगितलं; पण तरी ढोबळ आकडेवारीही विचारात घेता स्ट्रेस अधिक असलेल्या महिलांची संख्या जास्त आहे.
आता प्रश्न असा आहे की बायकांनाच जास्त स्ट्रेस येण्याचं कारण काय आहे?
सतत काम-चिडचिड-वैताग कशाने?
१. एकतर हे मान्यच करावं लागेल की महिलांवर कामाचा बोजा अधिक आहे. कार्यालयातील कामं सांभाळताना घरकाम, मुलांची देखभाल, वडिलधाऱ्यांची आजारपणं ही सगळी जबाबदारी त्यांना चुकलेली नाही.
२. घरकाम-स्वयंपाक यासाठी मदतनीस असली तरी रोज काय भाजी करायची ते मुलांचे प्रोजेक्ट करणं ही सारी व्यवधानं महिलांना सांभाळावीच लागतात.
३. कामाचं नियोजन, मदत-वेळा पाळणं हे सारं सतत केल्यानं मनावरचा ताण वाढतो.
४. काही कामं आपण नाही केली तरी चालतात हे महिला मान्य करत नाहीत. सुपरवूमन ट्रॅपमध्ये त्या स्वत:ही अडकलेल्या असतात.
५. आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष सतत केले जाते.
उपाय असतो का?
शोधला तर नक्की सापडतो.
आपल्या छंदाला, आनंदाला आपण वेळ देतो का?
कामाचा प्राधान्यक्रम ठरवून मदत मागतो का?
मदत मागितली तर मिळते यावर विश्वास ठेवून नियोजन केले तर ताण कमी होतो.