डॉ. उमेश नागपूरकर
देशमुखबाई. ४५ वय,गृहिणी, एकुलता एक मुलगा. त्याला चांगलं वाढवायचं म्हणून नोकरी न करता पूर्णवेळ त्याच्याकडेच लक्ष दिलं. खाणं-पिणं, क्लासला सोडायचं, अभ्यास घ्यायचा. इंजिनीयर झाला तो आणि नंतर उच्च शिक्षणाकरिता परदेशी गेला. त्याला विमानतळावर निरोप देईपर्यंत अतिशय उत्साहात होत्या पण नंतर मात्र हळूहळू एकटेपणा जाणवायला लागला. कशातच मन लागेना, उदासपणा जाणवू लागला. घर खायला उठू लागलं. आता कोणासाठी जगायचं? आणि कशासाठी जगायचं ?असे विचार मनात यायला लागले. मुलाची सतत काळजी वाटायला लागली. दिवसातून एकदा जरी त्याचा फोन नाही आला तर नाही नाही ते विचार मनात यायला लागले. त्यांनाही कळेना की आपल्याला नेमकं काय होतं आहे?
(Imgae : google)
बहुतेक वेळा काही पालकांमध्ये एमटी नेस्ट सिण्ड्रोम किंवा 'घर रिकामं झाल्यासारखं वाटण' हे दिसून येतं . आज-काल कुटुंब छोट असल्यामुळे जास्त जाणवतो. आपलं सगळं आयुष्य मुलांना मोठं करण्यात घालवल्यानंतर अचानक मुलांचं लांब जाणं काही पालकांना असंह्य होतं. मुलांच्या आयुष्यातील त्यांचं महत्त्व एकदम कमी झाल्यासारखं वाटतं. मुलांना स्वतंत्र, स्वावलंबी करण्याच्या नादात पालक स्वतः मुलांच्या आयुष्यात गुंतत जातात आणि मुलं शिक्षण किंवा नोकरी धंद्यासाठी लांब गेल्यावर हा दुरावा भावनिकरित्या फार त्रासदायक ठरू शकतो. काही पालकांमध्ये नैराश्य आलेलं दिसत, काही व्यसनाधीनतेकडे झुकतात किंवा काही नवरा-बायकोत ताण सहन न झाल्याने विनाकारण खटके उडायला लागतात. पण काही पालकांमध्ये मात्र मोकळा वेळ मिळाल्याने ते स्वतःसाठी काहीतरी वेगळं करू शकतात, छंद आवडीनिवडी जोपासू शकतात आणि दोघांना एकमेकांशी संवाद साधण्याची संधीही मिळते.
तुमचं असं झालं तर काय कराल?
१. जर आपल्याला हा एकटेपणा खूप जास्त जाणवत असेल तर आपला मुलगा कधी ना कधी आपल्यापासून लांब जाऊ शकतो हे मान्य करा. त्याचा आयुष्य वेगळं आहे आणि त्याला स्वावलंबी होणे गरजेचे आहे हा विचार महत्त्वाचा. शिवाय मुलांची आजकाल मोबाईल, व्हिडिओकॉल द्वारा आपण सतत संपर्कात राहू शकतो म्हणजे काळजी वाटणार नाही. गरज वाटल्यास प्रत्यक्ष भेट देखील तुम्ही घेऊन येऊ शकता.
२. तुमच्यासारख्याच इतर पालकांशी संवाद साधा. त्यांना तुमची काळजी, चिंता जास्त चांगली समजू शकते. त्यांच्याकडून तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी, अशा परिस्थितीत कसं वागायचं हे शिकायला मिळेल आणि त्यामुळे हा भावनिक ताण कमी व्हायला मदत होईल. सकारात्मक राहून मोकळा वेळ सत्कारणी लावल्यास त्रास होणार नाही. ज्या गोष्टी करायच्या राहिल्यात त्या निश्चितपणे करू शकता . छंद जोपासू शकता, आपल्या आवडीनिवडी प्रमाणे. नवरा बायकोनी एकमेकांना वेळ देणं, सुसंवाद वाढवणे फार महत्त्वाचे. जोडीदाराकडून अशा वेळी भावनिक आधार मिळाला तर पटकन सावरता येतं.
३. सर्व करूनही जर उदासपणा जात नसेल आणि आपल्या आयुष्यातला आनंद, रस निघून गेला असं वाटत असेल तर नक्कीच मनोविकार किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा .
४. सौ देशमुखांशी चर्चा झाल्यावर दोन महिन्यांनी त्या भेटायला आल्या तेव्हा आनंदात होत्या. एम ए बी एड असूनसुद्धा त्यांनी मुलगा झाल्यानंतर आपल्या करिअरकडे दुर्लक्ष केलं आणि पूर्णवेळ मुलाचं संगोपन करण्यात घालवला. मग त्यांनी स्वतः रिकामपण घालवण्यासाठी संगीताची आवड असल्याने गायन क्लास लावला व शिकवण्याची आवड असल्याने एका शिकवणी वर्गात शिक्षक म्हणून रुजू झाल्या. दिवस चांगले जायला लागले आणि त्यांच्या जीवनाला एक प्रकारे अर्थ प्राप्त झाला.
(लेखक मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)