Join us  

सकाळी झोपेतून उठल्या उठल्या हातात मोबाइल घेता? मग तुमचा दिवस वाईटच जाण्याची शक्यता आहे, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2022 11:00 AM

दोष मोबाइलचा नाही तर आपला वेळ आणि मूड आपण इतरांचं काय चाललं आहे हे पाहण्यात घालवतो आणि मग सगळ्या दिवसाचा तोल जातो.

तुम्ही कधी बारकाईने पाहिलं का, सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो? झोपेतून उठता क्षणी आपण जवळच ठेवलेला, उशीखाली ठेवलेला फोन हातात घेतो. झोपेचे जे काही चार-पाच सात तास आपल्याला मिळालेले असतात, त्यानंतर इतक्या तासांनी आपण फोन हातात घेत असतो. म्हणजे पाच-सहा तासात जगात असं काहीतरी घडलं असेल ते आपण मिस केलं किंवा आपल्याला कळलंच नाही तर काय होणार अशा धास्तीनं आपण फोन हातात घेतो. मग कोणाचे स्टेटस अपडेट काय, कुणी व्हाट्सॲपवर काय गुड मॉर्निंग मेसेज केला, काय मोटिव्हेशनल, भक्तीपर मेसेज केला हे आपण पाहतो. म्हणता म्हणता काहीतरी आपल्याला खटकतं, आणि आपला मूडच बदलून जातो. कधी चिडचिड होते, कधी उदास वाटतं, कधी जेलसी वाटते. म्हणजे आपली मनोवस्था, आपण आज आनंदी रहायचं की दिवसभर कटकटत रहायचं हे ती सकाळची वेळ ठरवते. आणि तो कंट्रोल आपण मोबाइलच्या आणि ज्यांचा आपल्याशी थेट संबंध नाही ते ठरवतात..

(Image : Google)

एरवी आपले खूप प्लॅन असतात. हे करू, ते करू. पण ते सगळं कधी करायचं, कुठून सुरुवात करायची ह्याचा आपल्याकडे कुठलाही प्लॅन नसतो. फक्त मनातच मांडे खायचे.  सकाळी उठून आपण व्यायाम, मेडिटेशन, डे प्लॅन करत नाही. आपण मोबाइल हातात घेतो. आणि मग म्हणतो मला वेळच मिळत नाही. मला उशीरच होतो. अनेकांना तर नाश्त्यालाही वेळ नसतो. पण आपला वेळ नक्की कशात जातो हे मात्र आपण पाहत नाही.आता सकाळ अशी गेली म्हणून मग रात्री झोपताना पुन्हा तेच. दिवसभर इकडे तिकडे काय चाललंय, काय न्यूज अपडेट आहेत वगैरे करण्यात गेल्यावर रात्रीच्या वेळीच आपल्याला आपल्या सिनेमांचा बॅकलॉग भरून काढायची हुक्की येते. ते संपेपर्यंत अर्धी रात्र ओलांडते. झोपायला उशीर झाल्याने उठायला देखील उशीर. परत तेच चक्र. करू करू म्हणून लटकवून ठेवलेल्या याद्या तशाच लटकलेल्या असतात. मग आपण म्हणतो की इतरांच्या आयुष्यात सगळं चांगलं घडतं आणि आपण पुन्हा तिथंच, काहीच नाही आपल्या जगण्यात भारी.

(Image : google)

आता यावर उपाय काय?

१. सकाळी उठता क्षणी मोबाइल हातात घ्यायचा नाही.२. आपला मूड आपण ठरवायचा. आपल्या कामांची यादी करायची.३. आजचा दिवस कसा आनंदात गेला पाहिजे हे आपण ठरवून तसा ॲक्शन प्लॅन करायचा.४. सगळ्यात आधी आपल्याला आपल्या पेंडिंग लिस्टवर एक नजर टाकून तिची उजळणी करुन पटापट कामं करायला घ्यायची.५. त्यातल्या राहून गेलेल्या गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. एकदा हे ठरलं की आपण त्या यादीमधून ज्या गोष्टी सहज करून टाकण्यासारख्या आहेत, ते लगेच करा.६. सोप्या कामाकडून, रोजच्या कामाकडून जरा अवघड कामांकडे जायचं. ज्यांना थोडा जास्त वेळ देणं गरजेचं आहे, अशी कामं निवडायची. रोज त्यासाठी किमान अर्धा, एक तास वेळ आपण द्यायचा. काम पूर्ण झाल्याचा आनंद खूप मोठा असतो.७. कटकट मोड बंद करायचा, आनंदी मोडवर स्वत:ला स्विच करायचं. 

टॅग्स :मानसिक आरोग्यमोबाइल