अश्विनी बर्वे
माझी एक मैत्रीण मला सांगत होती की माझं वागणं कसं चुकीचं आहे. मी कुठं नेमकी चुकते याचं स्पष्टीकरणही तिच्याकडे होते. मी अमूक का करते आहे त्याविषयी माझी भूमिका मी तिला सांगितली. तरीही माझे कसे योग्य नाहीच याचेही तिच्याकडे स्पष्टीकरण होते. बरीच चर्चा झाली मी म्हणत होते माझंच बरोबर, ती म्हणत होती चूकच. दोघींकडे आपलं म्हणणं होतंच त्यासंदर्भात.त्यावर नंतर इमेल्सही झाल्या. पण कुणीच आपला मुद्दा सोडत नव्हतं. आपलंच खरं, आपलाच शब्द अंतिम असं होतं. मग माझ्या लक्षात आले की प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्टी साठी स्पष्टीकरण आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाला आपलाच शब्द शेवटचा वाटतो.
(Image : google)
उदा. कोणी अभिनेत्री-अभिनेते स्क्रीन वर सिगारेट का ओढतात याचे स्पष्टीकरण त्यांच्या कडे असेल. मी भाजीत मीठ जास्त का घालते याचे स्पष्टीकरण माझ्याकडे असेल आणि प्रत्येक पुरुषाचा राग हा कसा योग्य आहे याचे स्पष्टीकरण प्रत्येक नवऱ्याकडे असेल.प्रत्येकाकडे स्प्ष्टीकरण आहे आणि प्रत्येकाला स्वतःचा शब्द शेवटचा असावा असे वाटते. वस्तुस्थिती अशी आहे की आपण प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो आणि आपलाच शब्द हा शेवटचा असायला हवा असं आपल्याला वाटतं.आपण किती उर्जा,मेहनत यासाठी वाया घालवतो हेच आपल्याला माहित नसतं. सगळ्यांनी आपल्यासारखं व्हावं असं म्हणणं चुकीचं आहे की नाही? सगळे एकसारखे असले तर जगण्यात मजा काय? विविधतेत तर गंमत असते.
(Image : google)
मग असं म्हणू या की थोडं तुमचं बरोबर थोडं माझं.किंवा दोघांचही एकावेळी बरोबर असू शकतं. पण ते आपल्याला पटत नाही. आणि मग होणारा मनस्ताप, मतभेद आणि भांडणं अटळ होतात.तुझं चूक नसेलही पण माझं मत तुझ्यापेक्षा वेगळं आहे असं म्हणणं थोडं सोपं नाही का?
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)