Join us  

आपल्यासमोर आता काही पर्यायच नाही, रस्ताच दिसत नाही, असं वाटतं तेव्हा काय करायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 2:54 PM

प्रभात पुष्प : कधी कधी वाटतं रस्ते हरवले, समोर काही मार्गच उरला नाही, पण खरंच तसं असतं का?

ठळक मुद्देदुसऱ्याच्या हातात असणारा गुलाब आपल्याला दिसतो पण त्याचे काटे त्यालाच माहीत असतात.

अश्विनी बर्वे

‘रस्ता कोणी दाखवला काय किंवा आपला आपणच शोधला काय, शेवटी चालावे आपले आपल्यालाच लागते.’ असा मेसेज आज सकाळी सकाळी आला. एवढ्या सकाळी कामाच्या गडबडीत या फिलोसॉफीकल मेसेजकडे लक्ष द्यायला नको म्हणून मी काहीच प्रतिसाद दिला नाही. लोक उगीच इकडचे मेसेज तिकडे करण्यात सकाळचा चांगला वेळ वाया घालवतात, असंही वाटलं.त्या मेसेजकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही, असं कितीही मी म्हटलं तरी माझ्या मनात त्याचा विचार चालूच होता.कितीतरी वेळा आपल्याला वाटतं ना की, मला जर कोणी आधी सांगितलं असतं तर मी त्या मार्गाने गेले असते किंवा शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला असं वाटतं की, कोणीतरी योग्यवेळी मार्गदर्शन करायला असते तर आज मी कोणीतरी वेगळीच झाले असते किंवा झालो असतो. पण समजा कोणी दाखवलेल्या मार्गावरून गेलो असतो तरी काम आणि कष्ट आपले आपल्यालाच करावे लागतात.

(Image : Google)

बऱ्याचवेळा आपलं असंच होतं. समोरच्या दुकानात किंवा समोरच्या माणसाकडे जे काही आहे ते जास्त आकर्षक वाटतं. तेच आपल्याला इतके दिवस हवं होतं, असं वाटत राहतं. दुसऱ्याच्या हातात असणारा गुलाब आपल्याला दिसतो पण त्याचे काटे त्यालाच माहीत असतात.एक साधा मेसेज माझ्या मनात विचारांच्या एवढ्या लहरी घेऊन आला. लहरीच त्या क्षणात निर्माण होतात आणि क्षणात लयाला जातात. पण जेव्हा येतात तेव्हा मन अगदी भरून जातं. काहीतरी गवसलं आहे, याचा एक आनंद मनभर, शरीरभर पसरत जातो. आपण गोष्टींकडे नव्याने बघत आहोत, असं वाटतं.म्हणजे माझ्याच मनात आलेल्या या विचारांच्या लहरी यांना मलाच शांत करावं लागणार आहे. जसा आपला रस्ता आपल्यालाच चालावा लागणार आहे अगदी तसंच.

ashwinibarve2001@gmail.com

टॅग्स :मानसिक आरोग्य