शाहीन आणि आलिया भट. दोघी सख्या बहिणी. शाहीन आलियापेक्षा पाच वर्षांनी मोठी. आलिया तिचे चित्रपट , अभिनय आणि ग्लॅमर यामूळे कायम चर्चेत आणि फोकसमधे. पण भट परिवारातील असूनही शाहीन मात्र कधीच चर्चेत किंवा लाइम लाइटमधे नव्हती. खरंतर शाहीन ही लहानपणी मस्तीखोर, बडबडी आणि खेळकर होती. कोणी काही करुन दाखव म्हटलं की ती लगेच तयारच असायची. मोठी होऊन मीच अभिनेत्री होणार असं ती म्हणायची. मात्र अचानक हे सर्व थांबलं. शाहीन अबोल राहायला लागली. एकटी राहायला लागली .वयाच्या बाराव्या वर्षापासून तर कोणामधे मिसळणं, उत्साहानं काही करणं या गोष्टी शाहीन विसरुनच गेली . ती अशी का वागतेय, हे घरच्यांनाही कळत नव्हतं, ना बहिणींना.. ना तिच्या आई बाबांना. शाळेत शाहीन तिच्या वाढत्या वजनामूळे विनोदाचा विषय झाली होती. बाहेर जर पूजा, शाहीन, आलिया एकत्र गेल्या तर फोटोग्राफर आणि त्यांच्या कॅमेऱ्याचा फोकस हा केवळ पूजा आणि आलियावरच असायचा. का ? तर दोघी सारख्या दिसायच्या. छान दिसायच्या. शाहीन मात्र वेगळी होती. त्यामूळे तिला कायम आउट ऑफ फोकस राहावं लागायचं.हे तिच्या मनाला डाचलं. यातून निर्माण होणारे विचार , भावना तिचं मन पोखरु लागल्या. वयाच्या बाराव्या वर्षापासून शाहीनने स्वत:ला याच विचार आणि भावनात घेतलं. हसणं, खेळणं, त्या वयाच्या उत्साहाला साजेसं वागणं हे सर्व काही शाहीन विसरुन गेली. अठरा वर्षांची असताना एका सकाळी शाहीनला झोपेतून उठल्यानंतर आपण काहीच नाही, आतून रिकामे आहोत, आपल्या जगण्याला काहीच अर्थ नाही असं वाटायला लागलं. आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळू लागले. एकदा आईशी बोलताना हे सर्व बाहेर पडलं आणि शाहीनबाबत काहीतरी गंभीर घडतंय, तिचं काहीतरी खूपच बिनसलंय याची चाहूल संपूर्ण कुटुंबाला लागली.
शाहीनला लगेचच मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आलं. तिथे तिला क्रॉनिक डिप्रेशन असल्याचं निदान झालं. औषधं सुरु झाली. काउन्सिलिंग सुरु झालं. शाहीन हळूहळू बाहेर पडू लागली. स्वत:ला जे होतंय त्याबद्दल कुटुंबाशी बोलू लागली. एकाकी झालेल्या शाहीनला मग कुटुंबाचा आधार वाटू लागला. कुटुंबालाही शाहीनला कसं सांभाळायचं, तिच्याशी कसं वागायचं हे कळू लागलं.
एका टप्प्यावर तिच्या वडिलांनी महेश भट यांनी ‘तू तूझ्या सहन केलेल्या वेदना वाया जाऊ देऊ नकोस, त्यावर लिही, व्यक्त हो’ असा सल्ला दिला. शाहीननं मग पहिल्यांदा फेसबूकवर पोस्ट लिहिली. मात्र या पोस्टसाठी ती स्वत:चे आनंदी मूडमधले फोटो शोधू लागली. शाहीनला हे आपलंच वागणं खटकलं. तेव्हा तिला जाणवलं की आपल्याला जे वाटतंय ते आपण का दाखवत नाही . तेव्हा तिने तिच्या भावनांशी जुळणारा फोटो टाकून फेसबूकवर पोस्ट टाकली. तिची ती फेसबूक पोस्ट गाजली. तिला खूप प्रतिसाद मिळाला. आणि तिला यातून पूस्तक लिहिण़्याची प्रेरणा मिळाली.
‘ आय हॅव नेव्हर बीन (अन) हॅपिअर’ हे शाहीन भट हिने लिहिलेलं पूस्तक प्रकाशित झालं. त्याचा उद्देश शाहीन भट प्रसिध्द व्हावी हा नव्हता. तर डिप्रेशन या आजारावर अनुभवातून केलेलं लेखन लोकांच्या कामास यावं, ज्यांना ज्यांना असं वाटतंय त्यांनी व्यक्त व्हावं, बोलावं हा होता. हे पूस्तक प्रसिध्द झाल्यानंतर आलिया, शाहीन या एकत्रितपणे अनेक कार्यक्रमात सहभागी झाल्या, मुलाखती दिल्या. डिप्रेशन, पूस्तक लेखन, कुटुंबानं समजून घेण्याच्या प्रवासाबद्दल मनमोकळ्या बोलल्या. जाहीरपणे बोलताना रडू आल्यावर लोकांना काय वाटेल असा विचार न करता एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्याही. जिच्यावर आपलं जिवापाड प्रेम आहे त्या मोठ्या बहिणीला काय होतंय हे आपल्याला कळूच नये या अपराधी भावनेने आलिया व्यथित झालेली दिसली. आपल्या बहिणीला कशातच उत्साह नसतो, ती कोणातच मिसळत नाही, स्वत:च्या रुममधून बाहेर पडत नाही , ती असं का वागते हे न कळल्यानं आपली चिडचिड व्हायची असं आलिया सांगते. पण आपली बहिण कोणत्या मानसिक अवस्थेतून चालली आहे याची जाणीव झाल्यावर मात्र आलियातील त्राग्याची जागा अपराधी भावनेने घेतली. पण याबाबत शाहीन मात्र आलियाला दोष देत नाही. मला काय होतंय हे मलाच कळत नव्हतं. काहीतरी राक्षसारखं आपल्याला छळतंय एवढंच जाणवायचं. जे मलाच नीट उमगत नव्हतं, ते घरच्यांना समजावं ही अपेक्षाच चूकीची होती.
शाहीन म्हणते की उपचारादरम्यान मी वेगवेगळ्या मानसोपचार तज्ज्ञांकडे, थेरिपिस्टकडे जायची, तेव्हा आलिया मला विचारायची की तूला काय मिळतं? यातन्? तर मला प्रत्येकाकडून नवीन विचार मिळतं? होता. स्वत:च्या आयूष्याकडे बघण्याचा, स्वत:कडे बघण्याचा, व्यक्त होण्याचा मार्ग मिळतं? होता. मनातलं सर्व बाहेर येत होतं. हळूहळू समजत गेलं की डिप्रेशन म्हणजे मेंदूतल्या केमिकलमधील गडबड, गोंधळ असतो. पण डिप्रेशन ही अशी एक रुग्णाची वैयक्तिक समस्या नाही. यात समाजाची खूप मोठी भूमिका आहे. समाजानं मानवी मूल्यांच्या दृष्टिकोनातून डिप्रेशन आणि त्याने ग्रासलेल्या रुग्णांकडे पाहायला हवं. ती पुढे म्हणते की, आज प्रत्येकजण जे नाही आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.दूखी असलो तरी आनंदी भासवण्याचा अट्टाहास सुरु आहे. ही फसवाफसवीच डिप्रेशनसारख्या आजाराला जन्म देते. जसं आहे तसं दाखवलं, जे वाटतंय त्याबाबत व्यक्त झालं तर मनातले गूंते तिथेच सूटतात, त्याच्या गाठी होत नाहीत.
शाहीनच्या या मताशी सहमत असलेली आलियाही डिप्रेशनबद्दल बोललं जाण्याची गरज महत्त्वाची असल्याचं सांगते. आलिया म्हणते की दर महिन्याला पाळीच्या चार दिवसात एक दोन दिवस तरी मला लो फील होतं. उत्साह वाटत नाही. पूर्वी मी टामटूम कारणं देत कार्यक्रम रद्द करायचे. पण आता मी सरळ सांगते की मला आज लो फील होतंय, उदास वाटतंय म्हणून मी येणार नाही.
लो फील होतंय हे सांगण्यात कसली आलीय लाज आणि भीती? असा प्रश्न विचारणारी आलिया हे लो फील होणं हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं असं म्हणते. फक्त आपण या भावनेबद्दल बोलायचं टाळतो. ते बोलायला हवं. आपल्याला होणारं हे लो फीलिंग आपलं आपण जेव्हा समजून घेऊ तेव्हाच व्यापकपणे डिप्रेशन हा आजार आणि त्या रुग्णाच्या भावना समजून घेण्यास सक्षम होऊ शकतो. आलिया म्हणते की डिप्रेशन असणाऱ्या रुग्णासाठी समोरच्यानं त्याचं ऐकणं, त्याला काय वाटतंय हे ऐकून घेणं महत्त्वाचं असतं. त्याला त्याच्यावर प्रतिवाद नको असतो. सल्ले नको असतात. त्यांना त्यांचं ऐकून घेणारा कान हवा असतो, त्यांना समोरच्याकडून केवळ लिस्टनिंग नाहीतर हिअरिंग हवं असतं. ‘तूझं ऐकायला मी इथे आहे, तू हवं ते बोल ’ हा विश्वास या रुग्णांसाठी खूप महत्त्वाचा असतो. तो मिळाला तर ते बोलतात, मोकळे होतात. या आजारातून बाहेर पडण्यास त्यांना मदत होते.
शाहीन आणि आलिया गेल्या दोन वर्षांपासून डिप्रेशनवर व्यापकपणे बोलू लागल्या आहेत. हा आजार रुग्णाचा वैयक्तिक आजार नसून त्यात कुटुंबाची, समाजाची भूमिका महत्त्वाची आहे हे सांगण्याचा दोघीही प्रयत्न करत आहे.