राग येणं ही अतिशय सामान्य गोष्ट असून हल्ली अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनाच सतत राग येत असतो. एखाद्या व्यक्तीचा, परिस्थितीचा आणि घटनेचा राग आला की आपल्याला अनेकदा तो अनावर होतो. हा राग चांगला नाही, तो कमी करायला हवा या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत असून प्रत्यक्ष वेळ आल्यावर मात्र आपण रागावर नियंत्रण करु शकत नाही. अनेक जण राग आल्यावर ओरडून बोलतात, शिव्या देतात, हात उगारतात तर काही जणांना राग अनावर झाला की ते चक्क रडायला लागतात. यामध्ये महिलांची संख्या सगळ्यात जास्त असते. अनेकदा आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग सहन झाला नाही आणि त्यावर रिअॅक्ट होणे शक्य नसेल तर हा राग आतल्या आत दाबला जातो आणि आपल्याला खूप रडू येते. असा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल (Why We Cry When We are Angry) .
जे लोक आपल्या रागावर नियंत्रण ठेवून वाद आणि भांडणं टाळण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बाबतीत प्रामुख्याने असे होते. याबाबत प्रसिद्ध क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉ. भावना बर्मी म्हणाल्या, जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्या शरीरात काही हॉर्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे अशावेळी आपला चेहरा लाल होतो, आपल्याला घाम यायला सुरुवात होते आणि काही वेळा अशा परिस्थितीत आपण बोलताना फंबल करतो. रडणे ही रागावर नियंत्रण मिळवण्याची एक पद्धत आहे. रडल्यानंतर आपल्याला आलेला राह काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला दु:ख होते तेव्हा आपण रडतो. पण राग आल्यावर असं रडण्यामागे नेमकी काय कारणं असतात याबाबत डॉ. बर्मी सांगतात...
१. इमोशनल इंटेंसिटी
राग ही एक शक्तीशाली भावना आहे. रागात आपले स्वत:वर नियंत्रण राहणे थोडे अवघड असते. अशावेळी आपल्या या भावना व्यक्त होण्यासाठी डोळ्यातील अश्रू हे एक माध्यम असते.
२. कॅथारसिस
रडल्यामुळे आपल्याला आलेल्या रागाचा निचरा होण्यास मदत होते. तसेच ज्या कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला ताण आलेला असतो तर रडल्याने हा ताण कमी होण्याची शक्यता असते. अनेकदा रागात आपल्याही नकळत आपल्या डोळ्यातून पाणी यायला लागतं, त्यामुळे आपल्या शरीराने दिलेली ती एकप्रकारची प्रतिक्रिया असते.
रडल्याने नेमके काय होते?
रागाच्या भरात रडणे ही सामान्य प्रतिक्रिया नाही, पण आपल्या स्वास्थ्यासाठी मात्र ते अतिशय चांगले असते. रडल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सीटोसिन आणि प्रोलेक्टीन यांसारखी रसायने निर्माण होतात. ही रसायने आपल्या हार्ट बीट कमी करुन मन शांत करण्यासाठी उपयुक्त असतात. अशा परिस्थितीत आपल्याला रडण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटना, लोक, विचार यांपासून दूर राहणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे राग येतो आणि तो येऊ नये म्हणून काय करायला हवे यावर आपल्याला काम करायला हवे. खूपच रडू येत असेल तर दिर्घ श्वासोच्छवास करावा.