Join us  

ती ना ‘तशीच’ वागते, तो मुद्दाम छळतो! - असा सतत इतरांचा रागराग केला तर आपण सुखी होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2024 8:00 AM

मनात कुढत राहणं, इतरांच्या चुका काढणं यामुळे आपलं आयुष्य कुठं सुखी होतं?

ठळक मुद्देइतरांचा राग, हेवा करत कुढत बसलो तर त्यांच्या आयुष्यात काहीच बदलत बिघडत नाही.

आपल्या अवतीभोवतीच्या प्रत्येक माणसाविषयी आपलं एक मत असतं. अगदी आपल्या प्रेमाच्या माणसांविषयीही. त्यात अगदी ऑफिसातले सहकारीही आले. अमूक माझ्याशी असं का वागला, तमूक तसं का म्हणाला? असाच लूक का दिला? तसाच शब्द का वापरला. अमूक मला भावच देत नाही. तमूक माझ्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करतो, बॉस असंच का म्हणाला हजार गोष्टी. आणि ते सारं डोक्यात असतं. आपण कुढतो. समोरच्याला कळतही नाही आपलं काय बिनसलं. आपण मात्र राग-जेलसी आणि अमूक असं का वागतो या विचारातच हरवून जातो.

 

 (Image :google)

एकदा आपल्या डोक्यानं घेतलं की लोक आपल्याशी वाईट वागतात की मग शंका- कुशंका भंडावून सोडतात. मनात जे सुरु असतं, ते समोर दाखवायचं नाही, नीट मनमोकळं बोलायचं नाही. वरतून, समोरच्याने काय करावं, कसं वागावंयाची आपल्या सोयीनुसारची भली मोठी जंत्रीच सतत तयार असते.मग येतो तो स्ट्रेस. मला वाटतंय तेच खरं आहे, असं जाणवून देणारी एखादी घटना घडली की आपण आपली मतं पक्की करतो. दुसऱ्याकडूनच्या अपेक्षा आणि स्वतःचं ते सर्व बरोबरच आहे,असं वाटतं.

आणि मग साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण एरवी आवडलेल्या माणसांना जोखत राहतो. स्ट्रेस वाढतो. इतरांचा राग राग करण्यात आणि अतीविचार करण्यातच आपली सगळी क्षमता वाया जाते. जे नातं छान फुलू शकतं ते आपण केवळ आपल्या मनानं करुन घेतलेल्या गैरसमजामुळे पोखरुन टाकतो. आपण हे कुढणंच बंद केलं. जे वाटलं ते मोकळेपणानं बोललो. इतरांवरचा फोकस हलवून जर तो स्वत:कडे वळवला. आपल्या आनंदासह इतरांना आनंद दिला.

कुणाला मदत केली. इतरांनी आपल्याशी जसं वागावं असं वाटतं तसं आपण त्यांच्याशी वागलो तर गोष्टी अतिशय वेगळ्या होतील.तसं न करता इतरांचा राग, हेवा करत कुढत बसलो तर त्यांच्या आयुष्यात काहीच बदलत बिघडत नाही. आपण मात्र स्वत:चा आनंद कायमचाच हरवून बसतो. मग सांगा चूक कुणाची? 

टॅग्स :मानसिक आरोग्य