Join us  

बाईच्या जातीचे भोग ? -आपल्या जगण्याचे निर्णय घेण्याचे हक्कही बायका का नाकारतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 1:54 PM

लहानपणापासून मुलींना शिकवलं जातं, मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही. घरच्यांचं ऐकायचं, सांगितलं तेच करायचं, मग त्यातून सुरु होतो एक मानसिक झगडा..

ठळक मुद्देविरोध सहन करणं किंवा त्याविरोधात आवाज उठवणं दोन्हीमध्ये मानसिक कोंडी अटळ असते.

डॉ. निलेश मोहिते

मी घरचांच्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. ते म्हणतात तोच माझ्यासाठी शेवटचा शब्द. घरचे काय माझं वाईट व्हावं म्हणून विचार करत नाहीत. -संगीताा मला रडून रडून सांगत होती. संगीता ही एका मल्टिनेशनल कंपनीत इंजिनिअर म्हणून नुकतीच रुजू झाली होती. त्याचवेळी  पुढच्या उच्च शिक्षणासाठी एका नावाजलेल्या संस्थेतही तिची निवड झाली. फार कमी जणांना त्या नावाजलेल्या संस्थेमध्ये शिकायची संधी मिळते. पण घरच्यांना संगीताचं उच्च शिक्षण घेणं मान्य नव्हतं. ते म्हणत होते, झाली ना इंजिनिअर, नोकरी पण लागली, आता कशाला शिकायचं? मुलगी जास्त शिकली  लग्न जमणं अवघड. कुठून आणायचा जास्त शिकलेला मुलगा? 

तसंही खूप हट्ट करून संगीता कशीतरी इंजिनिअरिंगची पदवी घेऊ शकली होती. आई-वडिलांना न सांगताच तिने उच्चशिक्षणासाठी अर्ज भरला होता. आई-वडिलांना समजावून सांगणं तिच्यासाठी महाकठीण होतं. ते ऐकत नाहीत म्हणून तिनेही  तिची इच्छा मारून टाकली.

तिचं काउन्सिलिंग करत असताना मी तिला सतत सांगत होतो, की धीर सोडू नकोस. आपण तुझ्या आई-वडिलांशी बोलू परत.  तेवढ्यात ती मला थोडी त्रासिकपणे म्हणाली " तुम्ही पुरुष आहात तुम्हाला नाही समजायचं बाईच्या जातीला कशा कशा मधून जावं लागतं" हे सांगत असतानाच ती रडायला लागली. तिला असं वाटत होतं कारण लहानपणापासून तिनं भेदभाव सहन केला. मुलीच्या जातीने बाहेर जाऊ नये, असेच कपडे घालावे, घरची सगळी कामं करावीत, घरच्यांना उलट बोलू नये, घरच्यांनी म्हणजेच पुरुषांनी सांगितलेली सगळी कामं ऐकावी असं ऐकतच, धाकात राहतच लहानची मोठी झालेली.

तिने स्वतंत्रपणे कोणताही विचार करू नये आणि कोणताही विचार करण्या अगोदर घरच्यांचा विचार करावा या संस्कारांचा पगडा असल्यामुळे स्वतः कोणताही निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य संगीताकडे नव्हतं. त्यामुळे आयुष्यातले इतर छोटेमोठे निर्णय घेताना सुद्धा ती खूप कन्फ्युज व्हायची. 

हे जे संगीताचं होतं ते अजूनही अनेक महिलांचं होतं. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यावे हा मूलभूत अधिकार सुद्धा स्रियांना नाकारला जातो. धर्माचा, संस्कारांचा, कुटुंबाचा आणि पुरुषसत्ताक मानसिकतेचा पगडा स्त्रियांच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या आड येतो. 

त्यातून तीन प्रकारची स्त्रियांची मानसिकता तयार होते.

1) पहिल्या प्रकारामध्ये - आपण स्वतः विचार करू शकतो किंवा विचार करणं हा आपला मूलभूत अधिकार आहे हेच या स्रियांना लक्षात येत नाही. त्यामुळे आपलं नशिब म्हणत त्या वाटयाला आलेल्या गोष्टी निमूटपणे कोणतीही तक्रार न करता स्वीकारतात. आणि नकळतपणे अन्यायला बळी जातात.आपल्याला निर्णय स्वातंत्र्य नाहीय याची जाणीवसुद्धा त्यांना नसते. आपल्या अज्ञानातच त्या सुख शोधत राहतात.

2) दुसऱ्या प्रकारात स्रियांना आपल्यावरील अन्यायाची आणि अधिकारांची जाणीव झालेली असते पण त्याविरुद्ध बोलण्याची किंवा काही करण्याची पुरेशी ताकद तिच्यात नसते. ताकद नसते म्हणजे पुरुषसत्ताक व्यवस्थेने अशी ताकद निर्माण होऊ नये याची पूर्ण तरतूद केलेली असते. अश्या स्रियांना प्रचंड मानसिक तणावातून जावं लागतं कारण त्यांना "आपण काही करू शकत नाही" ही टोचणी लागून राहते. त्यांना प्रचंड हेल्पलेस वाटतं.

3)तिसऱ्या प्रकारच्या महिला त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुध्द आवाज उठवतात किंवा विरोध करतात परंतु त्यामुळे त्यांना स्वतःला बदनामीला सामोरं जावं लागतं. त्यांच्या विरोधाला चुकीच्या पद्धतीने असंस्कारी ठरवलं जातं. विरोध करणाऱ्या या स्रियांना समजविरोधी ठरवून एकटं पाडलं जातं. आपल्या हक्कांसाठी लढतांना त्यांचं मानसिक खच्चीकरणही केलं जातं.

विरोध सहन करणं किंवा त्याविरोधात आवाज उठवणं दोन्हीमध्ये मानसिक कोंडी अटळ असते. या मानसिक कोंडीचा परिपाक उदासीनता, भयगंडता किंवा हिस्टेरिया या आजारंमध्ये होऊ शकतो. फक्त गोळ्या औषध किंवा काउन्सलिंग घेऊन या आजरांचा उपचार शक्य नसतो. 

या मानसिक आजाराचं मुळं बऱ्याच वेळा सामाजिक मानसिकतेत दडलेली असतात. आपल्या जवळच्या, अवतीभोवती वावरणाऱ्या अनेकींना या मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी  आपण त्यांना कशाप्रकारे वाचवू शकतो हे आपण पुढच्या लेखात समजून घेऊ...

 

(लेखक सामाजिक मनोविकार तज्ज्ञ असून आसाम आणि अरुणाचल प्रदेशातल्या दुर्गम भागात मानसिक आरोग्य याचविषयात काम करतात.)

nmohite9@gmail.Com

टॅग्स :मानसिक आरोग्यमहिला