Join us  

सतत सुटी मागते, कामावरून काढून टाका ‘तिला?’- असे शेरे ऐकत महिलांना काम करावं लागतं तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 5:37 PM

women at workplace 2023 : विमेन हेल्थ ॲट वर्कप्लेस हा २०२३ मध्ये जगभर अत्यंत चर्चेचा, काळजीचा विषय आहे, कारण..

ठळक मुद्देकरिअर आणि मानसिक, शारीरिक फिटनेस यासाठी येणारा काळ महिलांसाठी अतिशय आव्हानात्मक असणार आहे.

‘ओह, शी ऑलवेज गिव्हज एक्सक्यूज !’ हे वाक्य कुणाही ‘तिला’ उद्देशून कुणीतरी ऑफिसमध्ये म्हणणं तसं काही नवीन नाही. आता नव्या वर्षातही तीच चर्चा आहे. साधारण नवीन वर्ष सुरू झालं की अनेक ट्रेण्ड प्रसिद्ध होतात. गेल्या महिनाभरात वर्क लाइफ बॅलन्स, प्रॉडक्टिव्हिटी आणि मानसिक आरोग्याचे २०२३ ची आव्हानं असे ढिगाने अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. यंदा हे अभ्यास महत्त्वाचे आहेत. कारण प्रचंड ‘ले -ऑफ’ सर्वत्रच होत आहे. तुम्हीही एव्हाना कहाण्या वाचल्याच असतील की कुणीतरी मॅर्टनिटी लिव्हवर असताना तिला ईमेल आला की तुमची सेवा आता पुरे. कुणी तरी हनिमूनला गेली होती तेव्हा लाल स्लिप मिळाली. कुणाकडे तर आई-वडील गंभीर आजारी असताना सुटी घेतली असल्याच्या काळातच नोकरी गेली.

(Image : google)

कहाण्या अनेक, मात्र त्यांच्या पोटात एक नवीन वादळ आहे. कामाच्या ठिकाणी बायकांचं आरोग्य. कार्पोरेट जगतात कामाचे स्ट्रेस हे पूर्वीच्या ९ ते ५ नोकऱ्यांपेक्षा पूर्णत: वेगळे आहेत. मात्र कुटुंबाचे प्रश्न तर तेच आहेत. मुलं कुणी सांभाळायची, म्हातारे होत जाणारे आई-वडील अचानक आजारी पडले तर रजा कुणी घ्यायची? एकाएकी मासिक पाळीचा त्रास व्हायला लागला तर रजा कोण देणार?युव्हीए हेल्थ नावाच्या एका अमेरिकन कंपनीने केलेला एक अभ्यास धक्कादायक आहे. अमेरिकेतल्या ४५.२ टक्के बायकांना मासिक पाळीच्या दिवसात इतका त्रास होतो की, त्यांना सुटी घ्यावी लागते आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या उत्पादन क्षमतेवर होतो. त्याच काळात होणारे मूड स्विंग्ज थेट कार्यालयीन वातावरणावर परिणाम करतात.आता प्रश्न असा आहे की, जगभरात चर्चा आहे की, महिलांना मासिक पाळीची सुटी द्या. जपानसारखा देश तशी सुटी देतोही. पण चर्चा अशी की दरमहा जर अशी चार दिवस पगारी सुटी द्यावी लागली तर या नव्या हायर ॲण्ड फायर काळात बायकांना नोकरीवर ठेवण्याचे प्रमाणच कमी झाले तर?मुळात रिप्रॉडक्टिव्ह एज म्हणजेच प्रजननक्षम वयातल्या प्रत्येक महिलेला कार्यालयीन ठिकाणी काही ठळक समस्या कायम येतात, त्याची उत्तर शोधावी लागतात. मासिक पाळी, बाळंतपण, मानसिक आणि शारीरिक फिटनेस आणि तिथंच गाडी घसरते. ‘वूमेन्स हेल्थ ॲट वर्क प्लेस’ हा या वर्षात जगभरातल्या चर्चेचा विषय आहे.काही कंपन्या त्यावर तोडगा शोधत अनेक हेल्थ सोल्यूशन देणाऱ्या कंपन्यांचे सल्ले घेत धोरण बदलत आहेत. फॅमिली लिव्ह पॉलिसी, फॅमिली मेंबर सिक लिव्ह पॉलिसी अशी धोरणंही राबवत आहेत. मात्र एक नक्की, करिअर आणि मानसिक, शारीरिक फिटनेस यासाठी येणारा काळ महिलांसाठी अतिशय आव्हानात्मक असणार आहे.

टॅग्स :रिलेशनशिपमानसिक आरोग्य