कोरोनापुर्वीचा काळ खरोखरंच मस्त होता, असे आता जवळपास सगळ्याच महिला म्हणू लागल्या आहेत. नोकरदार महिलांचे या काळात ताण वाढलेले आहेतच. त्यांना घरून काम करताना अक्षरश: दुपटीने काम करावे लागत आहे. पण एकदा कामाला बसलो, की आपण आणि आपले काम असे म्हणत त्या स्वत:साठी थोडी स्पेस तरी राखून ठेवत आहेत.
पण गृहिणींची मात्र या काळात खऱ्या अर्थाने कुचंबना होत आहे. कोरोनाच्या आधी जवळपास सगळ्याच गृहिणींचे अगदी मस्त रूटीन सुरू होतं. सकाळची धावपळ एकदा संपली, नवरा, मुले आपापल्या वाटेने निघून गेली की, राहिलेली कामे आपल्या सोयीनुसार रमतगमत आटपायची, आपल्याला वेळ मिळेल तसं घर सजवायचं, दुपारी मस्तपैकी टीव्ही सिरियल्स पाहणे एन्जॉय करायचं. पुस्तकाचं, एखाद्या मासिकाचं वाचन, आपले छंद जोपासण्यासाठी काढून ठेवलेला भरपूर वेळ आणि दुपारी अगदी रिलॅक्स होत मारलेली डुलकी.. असे शेड्यूल अनेक महिलांचे ठरलेले असायचे. दुपार ही त्यांची हक्काची असायची आणि त्यांना त्यांची स्पेस अगदी हवी तशी जपता यायची.
स्पेस जपतच त्यांचे एकटीचे असे अनेक बाहेरचे प्रोग्राम ठरलेले असायचे. मैत्रिणीचा वाढदिवस, भिशी किंवा किटी पार्टी यांच्या जोडीला हातभार लावायला आपले सणवार आणि हळदी- कुंकू समारंभ असायचे. यातून वेळ मिळाला की, मग कुणाचा तरी वाढदिवस, लग्न, मुंज किंवा इतर समारंभाची तयारी, शॉपिंगचा आनंद, ब्युटी पार्लरची निवांत घेतलेली वेळ या सगळ्या ॲक्टीव्हिटी करताना त्या गृहिणीला दिवसाचे अगदी २४ तासही पुरायचे नाहीत. तिची प्रायव्हसी एन्जॉय करतच ती तिच्या तिच्या स्वतंत्र दुनियेचाही मनमुराद आनंद घ्यायची.
आता मात्र मुले त्यांची शाळा- कॉलेज आणि नवरा त्याचे ऑफिस घरातच घेऊन आल्याने अनेक गृहिणी हिरमुसून गेल्या आहेत. त्यांनीही लॉकडाऊनचा सुरूवातीचा काळ नवरा आणि मुलांसोबत एन्जॉय केला. कधी नव्हे ते एवढे दिवस सगळे घरात एकत्र आल्याने नवनविन पदार्थ बनवून सगळ्यांच्या रसना तृप्त केल्या. सगळ्यांच्या पुढे नाचत अगदी कंबर मोडेपर्यंत कामे केली. पण बास .....आता मात्र ती वैतागली असून या चक्रात कंटाळली आहे. सगळ्यांनी आपापली कामे हातात घेतली आणि सगळे घरकाम नकळत तिच्याकडे सरकवून दिले आहे. तिच्या मैत्रिणी, तिचे छंद सगळे माग पडत चालले आहेत. त्यामुळे अनेक गृहिणी आता हताश- निराश झाल्या आहेत.
असा काढा स्वत:साठी वेळ
१. गृहिणी असलात तरी तुम्ही तुमचे रूटीन फिक्स करून टाका.
२. प्रत्येक कामाची वेळ ठरवून द्या.
३. नवरा, मुले यांना त्यांच्या जबाबदाऱ्या असल्या तरी त्यांनाही काही कामे द्या आणि त्यांची कामे त्यांनाच करू द्या.
४. दुपारी अमूक एका वेळेला तुम्हालाच टीव्ही पाहायचा आहे, असे स्पष्टपणे सांगून टाका.
५. तुमचा छंद पुर्ण करण्यासाठी, तुमच्या आवडी- निवडी जपण्यासाठी दिवसातला एक तास हमखास राखून ठेवा आणि त्याकाळात फक्त तुम्हाला आवडते तेच करा.
६. नवनविन रेसिपी ट्राय करत अख्खा दिवस किचनमध्येच घालविणे सोडून द्या.
७. आवडीच्या ब्युटी ट्रिटमेंट्स घरच्याघरी करा.
८. मैत्रिणींशी मस्त गप्पा मारा आणि व्हर्च्युअल मिडियाद्वारे का होईना पण तुमचे स्वतंत्र जग एन्जॉय करा.