Lokmat Sakhi >Mental Health > आज काय भाजी करायची ? - हा प्रश्न फक्त बायकांच्याच डोक्याला ताप का देतो ?

आज काय भाजी करायची ? - हा प्रश्न फक्त बायकांच्याच डोक्याला ताप का देतो ?

Mental Load - स्वयंपाक करणं हे काम लहान दिसत असलं तरी प्रत्यक्षात स्वयंपाकाचं नियोजन आणि त्याची तयारी, घरातल्यांच्या आवडीनिवडी हे सारं वाटतं तितकं सोपं नाहीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 01:43 PM2021-05-15T13:43:58+5:302021-05-15T13:59:07+5:30

Mental Load - स्वयंपाक करणं हे काम लहान दिसत असलं तरी प्रत्यक्षात स्वयंपाकाचं नियोजन आणि त्याची तयारी, घरातल्यांच्या आवडीनिवडी हे सारं वाटतं तितकं सोपं नाहीच..

women -mental load- kitchen management, cooking & house work tension | आज काय भाजी करायची ? - हा प्रश्न फक्त बायकांच्याच डोक्याला ताप का देतो ?

आज काय भाजी करायची ? - हा प्रश्न फक्त बायकांच्याच डोक्याला ताप का देतो ?

Highlights ‘भाजी काय करू?’ आणि या प्रश्नापासून सुरु होत तिथेच येणारा मेंटल लोड काही संपत नाही.

गौरी पटवर्धन

घर नावाच्या यंत्रणेचं प्लॅनिंग सुरु होतं ते स्वयंपाकघरात. घरातली जी व्यक्ती स्वयंपाकघरात काम करत नाही तिच्या दृष्टीने नाश्त्याला उपमा-पोहे आणि दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाला भाजी पोळी वरण भात एवढं असलं म्हणजे झालं. त्याच्या प्लॅनिंगचा इतका काय इश्यू आहे? हेच त्यांना कळत नाही.
जे घरकाम करत नाहीत त्यांना तर हे कळत नाहीच, पण ज्या बायका वर्षानुवर्षं, सतत स्वयंपाकघरात काम करत असतात आणि त्याहीपेक्षा २४ तास त्याचा विचार सतत मनात बाळगत असतात त्यांनाही हे लक्षात येत नाही की त्यांच्या मेंदूचा किती मोठा कप्पा घरकाम या प्रकाराने अडवलेला असतो. त्या कामाचा त्यांना सतत किती मानसिक ताण असतो. आणि त्याचा किती थकवा येतो. कारण हा ताण, हा थकवा नसलेलं आयुष्य त्यांनी मोठेपणी कधीच अनुभवलेलं नसतं. आणि म्हणूनच एकीकडे बायकांना ‘घराची राणी’ म्हंटलं जातं, तर दुसरीकडे मात्र त्या ‘सून आली की मी जरा आराम करणार आहे’ याचं स्वप्न बघण्यात गर्क असतात.
सून आल्यावर त्या तिला स्वयंपाकघराचा ताबा देतात का आणि खरंच आराम करतात का हा अजून वेगळा विषय आहे. पण ज्या अर्थी सुनेचा पर्याय मिळाल्याबरोबर आपण या कामातून अंग काढून घ्यावं असं त्यांना वाटतं, त्या अर्थी ते काम अत्यंत तणावपूर्ण आणि कंटाळवाणं असणार हे तर उघडच आहे ना? पण तरीही, आपण सगळेच जण त्याच घर नावाच्या, बायकांच्या जिवावर उभ्या असणाऱ्या यंत्रणेचा पिढ्यानुपिढ्या फायदा घेत असलो, तरी त्यात नेमकी काय काय कामं असतात हे मात्र आपल्याला लक्षात येत नाही. अगदी ठरवून यादी करायला घेतली तरीही ती यादी परिपूर्ण करणं जवळजवळ अशक्य आहे. कारण मुळात घर नावाच्या यंत्रणेचे अनेक विभाग असतात आणि त्या प्रत्येक विभागात पुन्हा अनेक कामं असतात आणि हे सगळे विभाग आणि ही सगळी कामं एकमेकांवर अवलंबून असतात.

हे विभाग कुठले हे बघण्याच्या पूर्वी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यातले अनेक तपशील जात, धर्म, प्रांत, पद्धती, सामाजिक स्तर, आर्थिक स्तर, घरातील सदस्य संख्या, घरातील सदस्यांचा वयोगट (मुलं किती आणि कुठल्या वयाची, ज्येष्ठ नागरिक) अश्या अनेक घटकांवर अवलंबून बदलू शकतात. मात्र या सगळ्या कामांना, त्यासाठी लागणाऱ्या रिसोअर्सेसना घराच्या आर्थिक उत्पन्नाची अभेद्य चौकट कधीच ओलांडता येत नाही. घरात जेवढे पैसे येतात त्यातच हे सगळं भागवायला लागतं. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची अपेक्षा वेगळी असते, घरात येणारे पैसे किती हे ठरलेले असतं आणि त्यातल्या त्यात सगळ्यांच्या मनाप्रमाणे आणि आवडीनिवडीप्रमाणे करण्याचं किचकट आणि भावनिकदृष्ट्या थकवणारं काम मात्र बहुतेक वेळा घरातल्या स्त्रीला करावं लागतं.
या सगळ्याशिवाय प्रथा, परंपरा, संस्कृती आणि ‘आमच्याकडे हे चालत नाही’ किंवा ‘आमच्याकडे असंच लागतं’ अश्या गोष्टींचे कंगोरेही बाईच्या भोवती असतात. या सगळ्यातून वाट काढत तिला घर नावाचा कधीही न संपणारा गाडा हाकायचा असतो.
आणि सुरुवातीला म्हंटलं तसं घराचं प्लॅनिंग सुरु होतं स्वयंपाकघरात!
याशिवाय घर चालवण्यासाठी लागणारे विभाग कुठले असतात? तर
स्वयंपाकघर, स्वच्छता, कपडे, शाळा, घरचा अभ्यास, प्रोजेक्ट्स वगैरे,मुलांच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज,
मुलांचे छंद, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, आजारी व्यक्तींची काळजी,पाहुणे, सणवार,लग्न वगैरे कार्य, घरातील दुरुस्ती, बाग, झाडं, पाळीव प्राणी व पक्षी
घरात कुठल्या प्रकारची कामं केली जातात त्याची ही ढोबळ यादी आहे. पण यातल्या एका एका विभागात काय येतं हे बघितलं तर त्यात किती कामं प्रत्यक्षात केली जातात त्याचा अंदाज येऊ शकतो. यातला पहिलाच विभाग आहे तो म्हणजे स्वयंपाकघर.
स्वयंपाकघरातला पहिला विषय असतो तो म्हणजे रोज “जेवायला काय करायचं?” याचं उत्तर भाजी पोळी वरण भात इतकं सोपं नसतं. पहिलाच प्रश्न येतो तो म्हणजे “कसली भाजी?” याचं उत्तर ठरवतांना घरातल्या बाईला अनेक गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. म्हणजे उदाहरणार्थ, घरात सदस्य किती? समजा घरात ६ व्यक्ती राहत असतील, तर पालेभाजी करायला जरा प्लॅनिंग करावं लागतं. कारण सहा माणसांना लागणारी पालेभाजी निवडायला बराच वेळ लागतो. त्यामुळे सोमवारी दुपारच्या जेवणाला मेथीची भाजी करायची असेल, तर शक्यतो रविवारी संध्याकाळी ती निवडून ठेवण्याचा विचार करायला लागतो. बरं एवढं करून सगळ्यांना मेथी चालतेच असं नाही. काही वेळा मुलांना मेथी आवडत नाही, तर काही वेळा घरातल्या ज्येष्ठ सदस्यांना त्याने ऍसिडिटी होते. मग परत प्रश्न येतो, ‘भाजी काय करायची?”
जी गत पालेभाज्यांची, तीच गत इतर भाज्यांची असते. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे वाटेल तेवढ्या भाज्या मिळतात. मग तरीसुद्धा ‘आज भाजी काय करू?’ हा गहाण प्रश्न घरोघरीच्या बायकांना रोज का बरं सोडवावा लागतो?
कारण तिने भाजी केली आणि आपण खाल्ली इतकं साधं गणित कधीच असत नाही. एकाला सुरण नको, दुसऱ्याला पडवळ - गिलके - दोडकं नको, मुलांना खरं म्हणजे बटाटा सोडून काहीच नको. त्यात भाज्या महाग होतात. त्या परवडायलाही पाहिजेत. त्यात पुन्हा जर का डब्यात भाजी द्यायची असेल तर तिला रस्सा नको. ज्येष्ठ नागरिकांना कोरडी भाजी खाववत नाही त्यामुळे त्यांना कोरडी भाजी नको… मग पुन्हा प्रश्न येतो, ‘भाजी काय करू?’
आणि या प्रश्नापासून सुरु होत तिथेच येणारा मेंटल लोड काही संपत नाही.

(लेखिका पत्रकार आहेत.)

Web Title: women -mental load- kitchen management, cooking & house work tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.