“बास झाले तुझे नाटक”, “बाकी काही करायला जमत नाही म्हणून असली नाटकं करावी लागतात”, “सततची सहानुभूती लागते कशाला, नाटक आहे सगळं”. असे एक ना अनेक डायलॉग महिलांना मारताना आपण ऐकले असेल. मानसिक आरोग्याच्या बाबतीत स्वत:ची मदत करु इच्छिणाऱ्या महिलांकडे कायम चुकीच्या पद्धतीने पाहिले जाते. कोणत्याही व्यक्तीला उदास राहणे, पॅनिक अॅटॅक येणे आवडत नाही. त्यामुळे आपल्याला आलेल्या नैराश्यासाठी एखादी स्त्री त्यावर उपचार घेत असेल तर आजुबाजूचे सगळेच तिच्यावर चुकीचे आरोप करतात नाहीतर सल्ल्यांचा भडीमार करतात. या महिलेचे कुटुंब, समाज आणि काही वेळा समुपदेशकही तिच्याबाबतीत चुकीचे बोलायला सुरुवात करतात. अशावेळी त्या स्त्रीने कोणाकडे जायचे असा प्रश्न असतो (Women Seeking Mental Health Help Labeled Dramatic according to Survey).
नुकत्याच झालेल्या आत्महत्या प्रतिबंधक चॅरिटी कॅम्पेन अगेन्स्ट लिव्हिंग मिझरॅबली (शांत) YouGovसर्वेक्षणातून समोर आले आहे की, मानसिक आरोग्यासाठी मदत मागणाऱ्या तरुणींपैकी प्रत्येक पाचवी महिला नाटकी आहे असे तिला म्हणण्यात येते. सर्वेक्षणात 2,000 हून अधिक महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि त्यांना असलेल्या मानसिक आरोग्य संकटाशी त्यांनी कसा सामना केला याबाबत विचारण्यात आले. त्यातून काही आश्चर्यकारक निरीक्षणे समोर आली.
मानसिक आरोग्याबाबत उपाय शोधणाऱ्या महिलांना एकतर बाद करण्यात आले किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. या समस्या स्त्रियांच्या मासिक पाळीच्या आरोग्याशी आणि भावनिकतेशी संबंधित होत्या. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा विचार आणि उपचार करण्याऐवजी या समस्या 'हार्मोनल', 'भावनिक', 'नाटकी', 'ओव्हरथिंकिंग' किंवा मासिक पाळीच्या कारणामुळे उद्भवत असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
मानसिक आरोग्यासाठी मदत घेणार्या 27% महिलांना त्यांच्या समस्या हार्मोनल असू शकतात असे सांगण्यात आले, 20% महिलांना मासिक पाळी सुरू आहे का असे विचारण्यात आले. तर 33% महिलांना त्या गोष्टींचा अतिविचार करतात का असे विचारण्यात आले आणि 20% महिलांना नाटकी असल्याचे विचारण्यात आले. महिला जेव्हा मदत घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही असे या सर्वेक्षणातून समोर आले. जवळपास 22% महिलांकडे अटेंशन सिकर म्हणून पाहिले जाण्याची भीती वाटते. सोशल मीडियाच्या युगात अनेकींना स्वत:हून नैराश्यात असावे असे वाटते असे म्हटले होते.
समाजातील एका विशिष्ट वृत्तीमुळे मानसिक आरोग्याच्या समस्या कायम दुर्लक्षित राहील्या. ज्यांना मदतीची गरज आहे अशांवर कायम टिका झाली आणि त्यांना मानसिकरित्या आजारी म्हणून हिणवले गेले. महिलांसाठी खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी एकप्रकारची चौकट आखण्यात आल्याने त्यांच्यासाठी तर ही परिस्थिती जास्तच अवघड होती.