Join us  

women's Day 2022: चौकटीतून बाहेर पडा आणि स्वत:लाच म्हणा 'जस्ट गो'! 5 भन्नाट कल्पना, जा फिरायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2022 9:02 PM

Women's Day 2022: जस्ट गो म्हणजे घरातून, नेहमीच्या चौकटीतून, त्यातून आलेल्या साचेबध्द आयुष्यातून , कंटाळ्यातून जरा बाहेर पडणं, भटकून येणं, रिफ्रेश होणं. 'जस्ट गो' तर भटकण्याचा एक बहाणा आहे!

ठळक मुद्देस्वत:च्या आनंदासाठी 'जस्ट गो' ही संकल्पना फार महत्त्वाची आहे.जस्ट गो ही संकल्पना प्रत्यक्ष आयुष्यात राबवून बायकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो, झाला आहे.जस्ट गो म्हणजे एक बहाणा आहे. बाहेर पडण्याचा.. बाहेर पडून आनंदी जगण्याचा.

- वीणा पाटीलवीणा वर्ल्डच्या  फाऊंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर

शब्दांकन: माधुरी पेठकर

संपूर्ण भारतभरात आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'वीणा वर्ल्ड'ने ज्या वूमन्स स्पेशल टूर्स आयोजित केल्या आहेत त्या सर्व फुल्ल आहेत. महिलांमध्ये घराबाहेर पडून चार आठ दिवस फिरण्याची इच्छा मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. आधी  वीणा वर्ल्डने वूमन्स स्पेशलच्या 19 टूर्स आयोजित केल्या होत्या. पण वेगवेगळ्या टूर्सवर जाऊ इच्छिणाऱ्या महिलांची संख्या इतकी होती , की 19 टूर्सच्या 26 टूर्स कराव्या लागल्या. 17 वर्षांपासून 70 वर्षांपर्यंतच्या महिला एकट्यानं बाहेर टूर्स करता आहेत. फिरण्याचा आनंद लुटत आहेत. घरापासून लांब ओळखी-अनोळखी महिलांच्या सहवासात सर्व महिला मोकळ्या होतात. फ्रिक आऊट होतात. रिफ्रेशिंग ब्रेक घेतात. देशात परदेशात एकट्यानं फिरुन महिलांना आनंद आणि अनुभव घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे टूर्ससोबत जाणं, किंवा वैयक्तिक पातळीवर आपल्या मैत्रिणींसोबत एकत्र एक दोन दिवसांसाठी  किंवा चार आठ दिवसांसाठी फिरायला जाणं याचं प्रमाण वाढतंय.

Image: Google

केवळ मैत्रिणींसोबतच नाही तर नातेवाईक महिला एकत्र मिळून फिरण्याचं प्लॅनिंग करतात आणि फिरायला जातात. टूर्सला देखील 60-65 च्या महिला आपल्या मुलींसोबत , सुनांसोबत फिरायला जातात. घराच्या चौकटी बाहेर पडून बाहेरच्या विश्वात एकमेकींच्या सहवासाचा आनंद घेतात. एकमेकींना समजून घेतात. अशा एकत्र फिरण्यातून नाती घट्ट होतात. इतकंच नाही तर मुलीचं लग्न ठरलंय, आता ती आपल्याला सोडून सासरी जाणार. ती सासरी जाण्याआधी तिच्यासोबत काही क्षण मुक्तपणे जगावेत म्हणून आया आपल्या लग्न ठरलेल्या मुलींसोबत बाहेर फिरायला जातात, टूर्स बरोबर फिरण्याचा आनंद घेतात. लग्न झालेल्या बहिणी एकत्र येऊन फिरायला जातात. महिलांमध्ये अशी फिरण्याची क्रेझ आता निर्माण झाली आहे.

स्वत:साठी वेळ, स्वत:साठी आनंद आणि फिरणं हे समीकरण तयार झालं आहे. खरंतर हे समीकरण नवं नाही. जुनंच आहे. 'जस्ट गो'मध्ये एक फार मोठी कृती आणि आनंद दडला आहे. आपलं आयुष्य , रोजची दिनचर्या, काम, घर, संसार, मुलंबाळं, नवरोबा हे सर्व आहेच पण स्वत:च्या आनंदासाठी 'जस्ट गो' ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. ही संकल्पना आधी मनात आणायची आणि मग अंमलात आणायची. जस्ट गो या संकल्पनेतून अनुभव, आत्मविश्वास, आनंद, मैत्री असा आनंदी होण्याचा खजिना सापडतो. यासाठी कुठल्या टूर्सबरोबरच गेलं पाहिजे असं नाही. पण आनंदासाठी बाहेर पडता येणं हे यात खूप महत्त्वाचं आहे. 

Image: Google

जस्ट गो ही संकल्पना अमलात आणताना अनेकींच्या मनात येतं, की असं कसं आपण एकटं फिरायला जायचं? घरातलं, घरातल्यांचं कोण बघणार, त्यांना काय वाटेल? असे अनेक विचार, अपराध भाव मनात येतात. पण यातून बाहेर पडून जरा फिरुन आलं की आपणच आपल्याकडे नव्यानं बघू लागतो.  तेच आयुष्य जगण्याची नवीन ऊर्जा मिळते.  यासाठी कुठे लांबवर, खूप दिवसांच्या सहलीला जाण्याची गरज नसते. जस्ट गो ची सुरुवातच करणार  असाल तर मैत्रिणींसोबत मुंबईला भटकायला जाणं, किंवा मुंबईला जाऊन रोरो बोटीतून अलिबागला जाणं. तिथे खाण्याची मजा घेऊन पुन्हा रोरो बोटीतून प्रवास करत मुंबईला येणं आणि आपआपल्या घरी परतणं, ही देखील खूप मोठा आनंद मिळवून देणारी कृती आहे. 

Image: Google

जस्ट गो म्हणजे घरातून , नेहमीच्या चौकटीतून, त्यातून आलेल्या साचेबध्द आयुष्यातून , कंटाळ्यातून जरा बाहेर पडणं, भटकून येणं. जस्ट गो म्हणत बाहेर पडणं, मजा करणं यातून आपल्याला आपण गवसतो. आपला आनंद गवसतो. आत्मविश्वास येतो. व्यक्तिमत्त्व बहरतं फुलतं. जस्ट गो ही संकल्पना प्रत्यक्ष आयुष्यात राबवून बायकांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतो, झाला आहे. दिसणं वागणं यात जस्ट गो मुळे झालेला विकास हा स्वत:च्या आणि इतरांच्याही नजरेत भरणारा असतो. हा बदल कसा घडतो हे अनुभवायला, जगायला देण्याची ताकद जस्ट गो मध्ये असते. किमान या बदलासाठी, असा बदल जगण्या अनुभवण्यासाठी तरी एकट्यानं घराबाहेर पडून मैत्रिंणीसोबत जरा फिरुन यायला हवं. 

जस्ट गो अनुभवताना...

1. ट्रेकिंग-हायकिंगला जाणं., मैत्रिणींसोबत गड किल्ल्यावर जाणं. गड चढणं- उतरणं. यातून व्यायाम, गप्पा टप्पा, नवीन जागा अनुभवण्याचा, साहस करण्याचा आनंद घेता येतो. 

2. मौजमजेसाठी बाहेर पडणं. एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मैत्रिणींसोबत  मौजमजेसाठी बाहेर पडावं. इमॅजिका हे काही फक्त लहान मुलांनाच घेऊन मजा करण्याचं ठिकाण नाही.  मैत्रिणींसोबत जाऊन दिवसभर मस्त मौजमजा करता येते. आपल्या शहरातील अशी मौजमजेची ठिकाणं हुडकून तिथे जाऊन त्याचा आनंद घेणं. 

Image: Google

3. शहरातल्या प्रसिध्द ठिकाणांची वाॅकिंग टूर काढणं. एका ठिकाणी सगळ्या जणींनी जमून शहरातल्या प्रसिध्द ठिकाणी चालत जायचं. 4-5 ठिकाणची मस्त भटकंती  खाण्याच्या मौजमजेसह करता येते. चालण्याचा, चालतान आपली ओळखीची जागा मैत्रिणींच्या सहवासात नव्यानं अनुभवण्याची संधी या अशा भटकंतीतून मिळते. 

4.शहराच्या बाहेर पडून लोकप्रिय हाॅटेल किंवा धाब्यावर फक्त जेवणासाठी जाणं. तिथे जाऊन मैत्रिणींसोबत  गप्पा मारत, मौज मजा करत, हसत खेळत एकत्र जेवण्याचा आनंद घेणं यातूनही रिफ्रेश होता येतं. 

5. मैत्रिणींसोबत लांबवर सायकलिंगला जाणं. लांबवर जाऊन तेथील स्वीमिंग पूलमध्ये पोहोण्याचा -पहुडण्याचा आनंद घेता येतो.जस्ट गो म्हणजे एक बहाणा आहे. बाहेर पडण्याचा.. बाहेर पडून आनंदी जगण्याचा. जस्ट गोच्या नवीन आयडिया तुम्ही विचार केला तर तुम्हालाही नक्की सूचतील. 

टॅग्स :मानसिक आरोग्यट्रॅव्हल टिप्समहिला