Join us  

Women’s Day 2022 : Women's day celebration ideas आई-बहीण-बायकोसाठी करा फक्त 4 गोष्टी, त्या वर्षभर खुश आणि नाते मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 1:31 PM

Women’s Day 2022 : Women's day celebration ideas गिफ्ट देऊन किंवा तोंडी शुभेच्छा तर सगळेच देतात, त्यापेक्षा थोडे वेगळ्या अशा कोणत्या गोष्टी करुन तुम्ही आपल्या कुटुंबातील महिलांना खूश करु शकता याविषयी...

ठळक मुद्देमहिला दिनाच्या निमित्ताने कुटुंबातील महिलेला थोडा आराम देण्यासाठी तुम्ही मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना क्लासेसना सोडणे, त्यांना बाहेर फिरायला नेऊन आणणे अशी जबाबदारी घेऊ शकता. ती रोज करत असलेल्या साफसफाईच्या कामांपैकी एखादे काम आपण केले तर तिला आराम मिळेल.

जागतिक महिला दिन (Women’s Day) म्हणजे महिलांचा सन्मान करण्याचा खास दिवस. आता एकाच दिवशी सन्मान करुन काही बदल होणार आहे का? तर नक्कीच नाही. पण किमान तिचा आदर, सन्मान करण्याची आजच्या दिवसाची संधी साधू शकतो. वर्षभर आपण तिला सन्मान देऊ हे वचन तर महिला दिनाच्या निमित्ताने आपण नक्कीच घेऊ शकतो. आता महिला दिन म्हटल्यावर आपण कुटुंबातील, ऑफीसमधील महिलांना या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गिफ्ट (Women's Day Gift) देतो किंवा मेसेज फोन करुन शुभेच्छाही देतो (Women's day celebration) . पण नुसत्या शुभेच्छा देऊन उपयोग नाही. तर आपल्या कृतीतून आपण तिचा आदर करतो हे व्यक्त होऊद्या. आता कृतीतून शुभेच्छा देणे म्हणजे काय असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडेल. तर कोणत्या गोष्टी करुन तुम्ही आपल्या कुटुंबातील महिलांना खूश करु शकता (womens day surprise) याविषयी...

(Image : Google)

१. सकाळी लवकर उठून चहाचा कप हातात द्या 

घरातील सगळे उठायच्या आधी घरातील स्त्री उठलेली असते. इतकेच नाही तर प्रत्येकाला उठल्यापासून पाणी, चहा, नाश्ता हातात देण्याची जबाबदारी ती अतिशय निरलसपणे पार पाडत असते. पण हे करताना तीही थकू शकते. तिलाही कंटाळा येऊ शकतो. आपल्यालाही कोणीतरी सकाळी उठल्यावर आयता चहाचा कप हातात द्यावा असे तिलाही वाटते. तेव्हा महिला दिनाला तुम्ही सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरातील महिला म्हणजे आई, बायको, बहिण, मुलगी यांच्यासाठी फक्कड चहा तयार करा. त्या झोपेतून उठल्यावर त्यांच्यासमोर हा वाफाळता चहाचा कप दिल्यावर त्यांनाही मनोमन आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. यामुळे त्यांची दिवसाची सुरुवात नक्कीच छान होईल. 

२. ब्रेकफास्ट किंवा एखादा सोपा पदार्थ तयार करा 

एरवी वर्षाचे ३६५ दिवस आपल्या आवडीनिवडीप्रमाणे आपल्या सगळ्या वेळा पाळून आपली आई किंवा बायको आपल्याला खायला घालत असते. तिलाही सतत स्वयंपाक करायचा कंटाळा येऊ शकतो. ती थकली म्हणून तिला जेवायला बाहेर नेण्यापेक्षा तुमच्या हातचे काहीतरी बनवून आजचा दिवस सेलिब्रेट करा. ब्रेकफास्ट किंवा एखादी छानशी भाजी करुन तिला तुम्ही खूश करु शकता. तिलाही तिच्यासाठी कोणीतरी छान काही बनवले आणि आयते खायला दिले तर खूप आनंद होईल. यासाठी तुम्ही युट्यूबवर असणाऱ्या रेसिपीच्या व्हिडिओजचा नक्कीच आधार घेऊ शकता. 

३. साफसफाईचे काम 

घराची सगळी जबाबदारी महिलांची असे मानत वर्षानुवर्षे महिला घरातील साफसफाईची आणि स्वयंपाकाची कामे करत असतात. महिला पुरुषांच्या बरोबरीने घराबाहेर पडली खरी. पण म्हणून तिला घरातील कामे चुकतात का? तर नाही. घरातील सगळी कामे करुन ती नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर पडते. त्यामुळे एका अर्थाने तिच्यावर दुहेरी जबाबदारी असते. अशावेळी ती रोज करत असलेल्या साफसफाईच्या कामांपैकी एखादे काम आपण केले तर तिला आराम मिळेल. इतकेच नाही तर तुम्ही आवर्जून तिची काळजी घेता असा फिल आल्याने ती आतून आनंदी होईल.

(Image : Google)

४. मुलांची जबाबदारी घ्या 

मुले म्हणजे घरातील स्त्री ची जबाबदारी असा एक अलिखित नियमच असतो. त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते त्यांचा अभ्यास, क्लासेस अशी सगळी जबाबदारी महिला पार पाडत असतात. पण महिला दिनाच्या निमित्ताने कुटुंबातील महिलेला थोडा आराम देण्यासाठी तुम्ही मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना क्लासेसना सोडणे, त्यांना बाहेर फिरायला नेऊन आणणे अशी जबाबदारी घेऊ शकता. त्यामुळे महिलेला स्वत:साठी थोडा वेळ मिळेल आणि त्या वेळात ती तिच्या आवडीची एखादी गोष्ट नक्की करु शकेल. 

 

 

टॅग्स :जागतिक महिला दिनगिफ्ट आयडियामहिला