- कांचन दीक्षित
(लेखिका टाइम मॅनेजमेंट तज्ज्ञ आणि प्रशिक्षक आहेत.)
मानसिक थकवा जाणवत असेल तर हळूहळू झिरपत तो शरीरातही जाणवायला लागतो. उत्साह वाटत नाही. करायचं खूप काही असतं पण एनर्जी कमी पडतेय, असं वाटायला लागतं. यामागचं कारण शोधून उपाय करायला हवा. थकव्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे उत्साहात सुरू केलेली कामं!
एक कागद आणि पेन घ्या आणि आपलं सगळं घरच नीट पहा. कपाटं, एक एक कप्पे, पुस्तकं, व्यक्तिगत वस्तू नीट पहा.
आता त्यात आपण कधीतरी सुरू केलेली कामं शोधा.
(Image: google)
ही पेंडिंग कामं आहेतच पण काही नवीकोरीही आहेत! हात न लावलेली कामं!
उदा. एखादं नवीन पुस्तक आणलं आणि हातात घ्यायलाच जमलं नाही ते तसंच पडून आहे.
उत्साहात लोकर आणली तशीच पडून आहे.
नवं ड्रेस मटेरियल शिवायला टाकायचंय.
नवीन साडी आणली फाॅल लावायला टाकायची राहिली. त्यामुळे नेसता येत नाहीये.
केक तयार करायचं साहित्य आणलं. पण स्टिकरसहित तसंच पडून आहे. केक कधी केला नाही.
अशी एक लिस्ट तयार करा. कामांची यादी झाली की एकतर ती कामं करा किंवा कधी करणार त्याचं प्लॅनिंग करा. नाहीतर त्याची योग्य विल्हेवाट तरी लावा. पण ते तसंच ठेवू नका.
यानं होतं काय?
तर एनर्जी ब्लाॅक होते. आपलाच ऊर्जा प्रवाह नीट वाहत नाही. समजा आपण ऑक्सिजन आत घेतला आणि बाहेर सोडला नाही तर जे होतं तेच आपल्या जगण्याचं होतं. उदाहरणार्थ, तुम्ही कार, टू व्हिलर किंवा बाइक चालवत असाल तर हे अनुभवता येईल. ती स्टार्ट करा आणि जागच्या जागी थांबा. पुढे जाऊ नका.
यानं काय होतं? तर ऊर्जा खर्च होते, शक्ती वाया जाते.
ही ना धड विश्रांती आहे ना काम !
याला फुकट खर्च म्हणता येईल.
अशा अनेक उत्साहानं सुरू केलेल्या पण पेंडिंग कामांना आपण निष्क्रीय समजत असलो, तरी मनाची तिथे गुंतवणूक असल्यानं मन तिथं ऊर्जा खर्च करतंय, हे विसरू नका. एका टाकीला सतरा लिकेज असल्यासारखी आपली ऊर्जा खर्च होते आणि आपल्याला माहीतही नसतं.
म्हणून घर आवरावं. तसाच मनातला पसारा आवरावा.
ऊर्जेचे ब्लाॅकेजेस् मोकळे झाल्यावर मनाला नवी ऊर्जा मिळेल. थकवा कमी होईल.
आठवून पाहा अशी कोणती सुरूवात करून तुम्ही विसरला होता? दुर्लक्ष झालं होतं? पडून राहिलं, वेळ नसल्यानं बोचणी देत होतं?
निर्णय घ्या, प्लॅन करा किंवा विल्हेवाट लावा. अनेक कामं पेंडिंग असतील तर त्यांचे योग्य नियोजन करूनच पूर्ण करता येतात.
(Image: google)
एकावेळी अनेक कामं!
मल्टीटास्किंगचे दोन प्रकार आहेत,
१) जबाबदारी नसलेले
२) जबाबदारी असलेले
आपण स्वतःच्या भूतकाळातल्या स्वत:शी स्वतःची तुलना करत असतो. पण वय वाढतं तशा जबाबदाऱ्याही वाढतात.
पूर्वी म्हणजे कधी? तर साधारण लग्नापूर्वी किंवा बाळंतपणापूर्वी असा अर्थ घेऊया. तेव्हा जबाबदारी असायचीच पण चुका दुरुस्त करायला आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, असा आतून विश्वास असतो. वय वाढत जातं तशी लवचिकता कमी होत जाते. स्वतःला माफ करणं अवघड होत जातं. मग प्रत्येक कामाच्या पर्फेक्शनची चिकित्सा वाढायला लागते. स्पर्धा वाढलेली असते. मन इमेज जपण्याचा ताण घेतं. या ताणानं थकवा येतो.
सर्वांत आधी स्वतःचे दोन भाग करून तुलना करणं बंद करा. हे स्वतःचं स्वतःला फटकारणं - मोटिव्हेशन नसून खच्चीकरण आहे.
‘ती बघ कसं छान करायची!’ असं स्वत:कडेच बोट दाखवणं, दोष देणं बंद व्हायला हवं.
सेल्फ टाॅक चांगला व्हायला हवा.
‘(स्वतःचं नाव घेत) व्वा, छान केलंस. जमतंय तुला, प्रयत्न चांगले होते.’ असा स्वसंवाद हवा.
(Image: google)
स्वत:ची काळजी घेतली का?
आरोग्याची काळजी घेतली का? शरीराचं मशीन नीट जपलं नाही आणि आता ते खडखड करतंय, पहिल्यासारखी स्पीड देत नाही, असं म्हणण्यासारखं आहे.
आधी लाइफस्टाईलवर काम करा. हे मशीन दीर्घकाळ कसं टिकेल, हे ध्येय ठेवा. नाहीतर अजून दहा-पंधरा वर्ष मल्टीटास्क करून यश आणि नंतरचं आयुष्य आजारपणात काढावं लागेल.
१. मल्टीटास्किंग करताना प्रायोरिटी लिस्ट तयार करून एकसारख्या कामांच्या जोड्या किंवा ग्रुप करा. ज्यानं मल्टीटास्किंग सोपं होईल.
२. कागदावर प्लॅनिंग नसेल तर मल्टीटास्किंगच्या वाटेलाच जाऊ नये, मग नुसती धावपळ आणि गोंधळ !
३. रात्री झोपण्यापूर्वी उद्याचा दिनक्रम व्हिज्युअलाइज करणे आणि मी कशा नंतर काय करत असेन, याचा सिक्वेन्स लावणे हे केल्यानं मनाची तयारी होईल.
४. (डेलिगेशन) कामं सोपवणं हे कौशल्य शिकावं लागेल, सगळं आपणच केलं पाहिजे, असा नियम नाही.
५. पैशाचा अभ्यास करावा लागेल. कारण जास्त काम केल्यानं जास्त पैसा मिळेल ही समजूत असेल तर मल्टीटास्किंग साफ चुकीच्या पायावर उभं आहे, असं समजावं.
६. आपण जास्त कामं केल्यानं कुणाचा फायदा होणार आहे? कोण यासाठी पाठी लागलंय? हे तपासा. लोकं वापरून घेतात आणि तुम्ही मल्टीटास्क करावा, असा घोषा लावतात. त्यानं त्यांना निवांत आराम करता येतो.
७. मला खरंच गरज आहे का? हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा! चुकीचे रोलमाॅडेल पाहून इम्प्रेस झालोय का? तपासा. आपण माणूस आहोत रोबोट व्हायची धडपड कशाला?
kanchan4816@gmail.com