कोरोना आला आणि अख्खे जग घरात बसले. मागील एक वर्षापासून कधी लॉकडाऊन होतेआहे, तर कधी अनलॉक होते. मागील एक वर्षापासून जवळपास सगळे जगच या चक्रातून जात आहे. घरात बसून बसून आता अनेक लोक प्रचंड बोअर पण झाले आहेत. पण म्हणून ऑफिसला जावे, असे बहुसंख्य लोकांना वाटत नाही. विशेषत: ज्या वर्किंग वुमन आहेत आणि ज्यांची मुले १० वर्षांच्या आतील आहेत, त्यांना तर मुळीच ऑफिसला जाण्याची नाही. घरीबसून हवे तेवढे काम सांगा, आम्ही सगळे काम करायला तयार आहोत, पण ऑफिसला मात्र बोलावू नका, असे बहुसंख्य वर्किंग वुमनचे म्हणणे आहे. ऑफिस आणि घर ही दोन्ही कामे घरी बसून सांभाळताना जवळपास सगळ्याच वर्किंग वुमनची तारेवरची कसरत होत आहे. पण ही ओढाताण आणि घरी बसणे एकवेळ परवडले. पण घडाळ्याच्या काट्यावर पळून धावतपळत ऑफिस गाठणे, आपल्या मुलांना डे केअर सोडणे आता अनेक वर्किंग वुमनला नकोसे झाले आहे. म्हणूनच तर कोरोना गेला तर जाऊ द्या, पण आम्हाला मात्र घरी बसूनच काम करण्याची परवानगी द्या, अशी बहुतांश महिलांची मागणी असल्याचे अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एक सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
भारतीय महिलांचे म्हणणेही यापेक्षा वेगळे नाही. घर आणि ऑफिस ही दोन्ही कामे खंबीरपणे हाताळणे आता त्यांना परफेक्ट जमले आहे. yougav या अमेरिकेतील एका वेबसाईटवरून झालेल्या सर्वेक्षणानुसार ३९ टक्के लोकांनी आम्ही घरी बसूनच काम करण्यास तयार आहोत, असे सांगितले आहे. तर ३० टक्के लोकांचे म्हणणे आहे की, आठवड्यातून एखाद्या दिवशीच ऑफिसला येण्यास हरकरत नाही. परंतू आम्ही अधिकाधिक काम घरूनच करू. आठवड्याचे निम्मे दिवस घरी आणि निम्मे दिवस ऑफिसला, अशी तयारी १४ टक्के लोकांनी दाखविली आहे. तर केवळ ५ टक्के लोकांनाच पुर्णवेळ ऑफिसमधूनच काम करावे, असे वाटते.
वर्क फ्रॉम होमचे फायदे- वर्किंग वुमनला सर्वात जास्त काळजी असते ती त्यांच्या मुलांची. आपण ऑफिसला गेलो तर या पॅण्डामिकच्या काळात मुलांना ठेवायचे कुठे या विचारानेच त्या घाबरून जातात.- मुलांप्रमाणेच घरातील ज्येष्ठ आणि इतर सदस्यांच्या काळजीनेही वर्क फ्रॉम होमच बरे असे महिलांना वाटते.- घर सांभाळून काम करता येत असल्याने बहुसंख्य वर्किंग वुमनचे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य आहे.
वर्क फ्रॉम होमचे तोटे- मुलांचा गोंधळ, टीव्हीचा आवाज, इतर सदस्यांचे गप्पा मारणे या सगळ्यांचा सामना करत काम करणे महिलांना सुरूवातीच्या काळात कठीण जात होते. पण आता मात्र महिलांनी या समस्येवर मात केली आहे.- घरकाम आणि ऑफिसचे काम यासाठी वेळेची विभागणी कशी करावी असेही महिलांना वाटते.- एकाग्रता नसल्याने आणि वारंवार कामात अडथळे येत असल्याने खूप अधिक वेळ काम करावे लागते आणि दिलेले टार्गेट पुर्ण करावे लागते, असे काही वर्किंग वुूमन म्हणतात.
स्ट्रेस प्रेशरकाम पुर्ण न झाल्यामुळे येणारे डिप्रेशन, पीअर प्रेशर, बॉसची चिडचिड, डेडलाईन न गाठता येणे, यासारखा त्रास अनेक महिलांना सहन करावा लागत आहे. यामुळे अनेकींची रात्रीची झोप देखील गायब झाली आहे. असे असले तरी आम्ही घरूनच काम करायला तयार आहोत, असे वर्किंग वूमनचे म्हणणे आहे.