नको नको जीव झालाय. वैताग आलाय नुसता एक झालं की एक सुरुच. आयुष्यात किती प्रॉब्लम्स आहेत. आणि ऑफिसात तर फार प्रॉब्लम्स आहेत, प्रचंड प्रेशर आहे. खूप स्ट्रेस आहे असं म्हणता तुम्ही? काहीही अडचण समोर आली की आधी प्रॉब्लमचा विचार करता की सोल्यूशनचा? आपल्यालाच कशा काय अडचणी येतात, आपल्यालाच काय त्रास असे प्रश्न पडतात की आपण काढू यातून मार्ग, चालवू डोकं असा विचार करता? परिस्थिती बदलत नाही त्यामुळे पण निकाल बदलूशकतो. आणि त्यासाठी आपल्याकडे आवश्यक असतं क्रिएटिव्हिटी नावाचं सॉफ्ट स्किल. अनेकांना वाटतं की ते तर कलाकार लोकांकडे असतं मी काही इतका/इतकी क्रिएटिव्ह नाही. मात्र बदलत्या जगात हे सॉफ्ट स्किल सगळ्यांकडे असणं आवश्यकच आहे. वर्कप्लेस क्रिएटिव्हिटी अशी ही नवीन संकल्पना. ती आपल्याला कळली पाहिजे आणि अंगिकारताही आली पाहिजे!
(Image : google)
वर्कप्लेस क्रिएटिव्हिटी म्हणजे काय?
त्यासाठी ५ गोष्टींचा विचार कायम सकारात्मक दृष्टीने करायला हवा. सतत कटकट-तक्रार करणारा स्वभाव असेल तर हे कौशल्य शिकता येणं अवघडच.
१. नवे कनेक्शन्स-माणसं जोडणं
माणसं मनापासून जोडता आली पाहिजे. आपल्या कामाशी जितकी अधिकाधिक माणसं जोडता येतील, त्यांना ते काम आपलं वाटेल असं ते काम करता आलं तर आपण क्रिएटिव्ह कामाला सुरुवात केली असं समजा. आपण माणसं जोडली नाही तर काम मोठं होत नाही.
२. प्रश्न विचारा
म्हणजे सिनिअर्स आणि सहकाऱ्यांना उध्दट प्रश्न विचारुन कात्रीत पकडा, नावं ठेवा असं नाही. तर आपण काल जसं काम करत होतो त्यापेक्षा वेगळं काम, वेगळं सोल्यूशन, वेगळे रिझल्ट आणणण्यासाठी काय करता येईल असे प्रश्न विचारुन त्यातून नवे मार्ग शोधा. एकाच पद्धतीचं जुनं काम नवीन रिझल्ट देऊच शकत नाही.
३. निरिक्षण
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. काम उत्तम आणि यशस्वी होण्यासाठी निरिक्षण, अभ्यास, वाचन आणि समज वाढवा. आपल्या रुटीन कामाला वेगळा ॲँगल देता येईल का हे तपासा. आणि तो द्या. कामात नाविन्य नसेल तर नवीन एआय काळ तुमच्यासाठी धोक्याचा आहे.
४. प्रयोग
कामातलं नाविन्य, प्रयोग आणि ओरिजनल काम आपण किती करतो हे जर जमलं नाही तर एआयचा धोका एकसाची कामाला आहे. आपली क्रिएटिव्हिटी आपल्याला आपल्या प्रयोगातून सिध्द करता आली पाहिजे.
५. चुका
चूक करायला घाबरु नका. जाे माणूस नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतो तोच चुकतो. जर चुकलंच नाही तर नवीन काही करणार कसं? क्रिएटिव्ह कामात चुका होणारच, पण एकच चूक पुन्हा पुन्हा न करण्याचं पत्थ्य तेवढं पाळा.
नव्या काळात आपल्या कामात क्रिएटिव्हिटी नसेल तर आपली रोजीरोटी कृत्रिम बुद्धिमत्ता खाऊन टाकेल, हे सांगायला कुणा तज्ज्ञाची गरज नाही.